ग्रामसभेत ग्रामस्थांची जोरदार मागणी
भोम राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या निमित्ताने बांधकाम खात्याने केलेले मोजमाप अमान्य असून बगल रस्ता शेतामधूनच करावा. तसेच राष्ट्रीय महामार्गाबद्दल सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत सरकारने रस्त्याबद्दलचे कामकाज बंद करण्याचा महत्वपूर्ण ठराव काल रविवारी झालेल्या भोम – अडकोण पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला. काल दि. 25 रोजी भोम, अडकोण पंचायतीची ग्रामसभा झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तयार केलेला बगल रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उत्पल पर्रीकर यांनी प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थांंनी केली आहे.
भोमा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाला विरोध करून ग्रामस्थ बगल रस्त्याची मागणी कित्येक वर्षांपासून करीत आहेत. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करीत असले तरी अजूनपर्यंत सरकारला ठोस उपाय काढण्यात यश आलेले नाही. काल रविवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी बगल रस्त्याच्या मागणीवर ठाम राहून शेतामधून बगल रस्ता करण्याची मागणी केली. ती शेती विनावापर (पडीग) असल्याने शेतातून बायपास नेण्याची त्यांनी आग्रही मागणी केली. तसेच मागणी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रीय महामार्गाबद्दल सरकारकडून ठोस निर्णय येईपर्यंत रस्त्याबद्दलचे सर्व कामकाज पंचायतीमधून बंद करण्याचा ठराव ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेऊन पंचायत मंडळाला ठराव घेण्यात भाग पाडले.
ग्रामसभा संपल्यानंतर पत्रकारांना माहिती देताना पंच सदस्य दामोदर नाईक यांनी ग्रामस्थांनी यापूर्वीसुद्धा बगल रस्त्याचीच मागणी केली होती. यापूर्वीसुद्धा अनेक वेळा बगल रस्त्याच्या मागणीचा ठराव पंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आले होते असे सांगितले.
संजय नाईक यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही वर्षांपूर्वी भोमवासीयांचा प्रश्न बगल रस्त्याचा आराखडा तयार करून सोडविण्याचा प्रयत्न केला होता. पण विद्यमान सरकार त्या आराखड्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. बगल रस्त्यासाठी उत्पल पर्रीकर यांच्याकडून ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या असल्याचे सांगितले.

