भेटीलागी जीवा

0
39
  • ज. अ. रेडकर

काहीजणांना भेटीगाठी घेता येत नसल्या तरी वर्षानुवर्षे कृतज्ञता त्यांच्या मनात साठून राहिलेली असते आणि कधीतरी ती उघड होते हे आजच्या ‘त्या’ आठ शिक्षकांच्या भेटीतून जाणवले. ‘ज्याचे कर्म भले त्याचे सगळेच भले’ असे म्हटले जाते आणि ते खरे आहे!

भक्तिरसात जे रमलेले असतात त्यांना परमेश्वराच्या भेटीची आस लागलेली असते. संत तुकाराम तर पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी इतके आतुर झाले होते की त्यांनी देहभान विसरून विठ्ठलाला ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ अशी आर्त साद घातली होती. परमेश्वराच्या भेटीसाठी भक्त जसा आतुर असतो, तशीच कोणतीही व्यक्ती आपल्या जिव्हाळ्याच्या गणगोताला भेटण्यास आतुर असते. अशा भेटीगाठी म्हणजे आनंदाचा सोहळा असतो. खूप दिवसांनी अशा भेटी झाल्या की या आनंदाला अधिकच उधाण येते. उतारवयात माणसे भेटणे हा दुर्मीळ योग असतो. अशा भेटी म्हणजे वृद्धांसाठी विरंगुळा असतो. या भेटीगाठी म्हणजे रखरखीत वाळवंटातील हिरवळ किंवा डोंगर-कपारीतील निर्मळ झर्‍यासारख्या असतात.

वृद्धत्वाच्या काळात नेत्र पैलतीरी लागलेले असतात. घरातील इतर माणसांना वृद्ध माणसे कधीकधी ओझे वाटतात, नकोशी वाटतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. वयानुरूप त्यांना येणार्‍या आजारांचा घरातील इतरांना त्रास वाटत असतो. त्यांच्या उपचारासाठी होणार्‍या खर्चामुळे कर्त्या व्यक्तीची चिडचिड होत असते. या वृद्धाच्या नावावर अमाप संपत्ती असेल, त्याच्यापाशी उत्पन्नाचा नियमित स्रोत असेल तर मात्र त्याची योग्यती देखभाल केली जाते. निर्धन माणसाकडे मात्र पूर्णपणे डोळेझाक केली जाते. त्याच्या औषधोपचाराच्या बाबतीत हेळसांड केली जाते. काहीजण तर म्हातार्‍याची घरात कटकट नको म्हणून त्याला वृद्धाश्रमात ठेवण्याची तयारी करतात. वृद्धांनी दिलेले सल्ले कुटुंबातील तरुण मंडळीला कुचकामी आणि कालबाह्य वाटत असतात. मात्र हे सल्ले अनुभवसमृद्ध असतात हे विसरले जाते. आपलेच रक्त अशाप्रकारे आपले शत्रू होते तेव्हा मायेचा ओलावा नष्ट होतो. भरलेल्या घरात वृद्ध माणूस एकटा, एकाकी पडतो. अशावेळी अनपेक्षितपणे कुणी आपली ख्याली-खुशाली घेण्यासाठी आपला जुना मित्र, एकेकाळचा परिचित किंवा दूरचा नातलग येतो तेव्हा वृद्ध माणसाचा आनंद गगनात मावत नाही.

कधीकाळी आपण सरकारी नोकरीत असताना कामाचा एक भाग म्हणून कुणाला मदत केलेली असेल तर त्याची जाणीव काहीजण कृतज्ञतापूर्वक ठेवतात (काही कामापुरते मामा म्हणून केलेली मदत विसरून जातात). व्यक्तीच्या निवृत्तीनंतर यापैकी कुणी त्याची साधी चौकशीदेखील करीत नाही. लाच घेऊन एखाद्याने आपले काम केलेले असेल तर एक वेळ आपण समजू शकतो; मात्र निःस्पृहतेने, प्रामाणिकपणे आणि कुणाकडून चहाचा एक कपदेखील न घेता एखादा सरकारी अधिकारी जेव्हा आपले काम करतो- जरी ते त्याचे कर्तव्य असले तरी- त्याचे ऋण मानलेच पाहिजे. मी मात्र याबाबतीत नशीबवान आहे. सरकारी हायस्कूलमध्ये मी सुमारे बारा वर्षे शिक्षक म्हणून काम केले. पुढे बढती मिळून क्रमाक्रमाने प्रथम श्रेणी राजपत्रित शिक्षणाधिकारी बनलो. एकूण पस्तीस वर्षांच्या माझ्या सरकारी नोकरीत अनेक माणसे भेटली. अनेकांशी जिवलग मैत्री झाली. निवृत्त झालो तरी यातील अनेक लोकांशी असलेला स्नेह आजही कमी झालेला नाही किंवा त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला नाही. शिक्षकीपेशातून मोकळा होऊन आता सुमारे चाळीस वर्षे उलटली आणि निवृत्त होऊन अठरा वर्षे मागे पडली. त्यावेळचे विद्यार्थी आता तर मोठे बाप्ये झालेत. त्यांची लग्नकार्येदेखील झालीत. त्यांची मुलेबाळे मोठी झालीत. इतकी वर्षे होऊनदेखील यातील माझे काही विद्यार्थी आपल्या परिवारासह माझ्या घरी येतात. चरण स्पर्शून आशीर्वाद घेतात. आपल्या पत्नीला आणि मुलांनादेखील पाया पडायला लावतात. आणि ‘या सरांच्यामुळे मी घडलो’ असे आपल्या मुलांना अभिमानाने आणि कृतज्ञतेने सांगतात. मला अवघडल्यासारखे होते, पण त्यांचे मन दुखवायचे धाडस मला होत नाही.

या सगळ्याची आठवण आज होण्याचे कारण म्हणजे, दोन दिवसांपूर्वी अचानक मोबाईल किणकिणला. ‘हॅल्लो, मी अमुक अमुक बोलतोय. मी माझ्या काही अन्य सहकार्‍यांसह आपल्याला भेटू इच्छितो, वेळ द्याल का?’ वेळ देण्या न देण्याचा प्रश्‍नच नव्हता. निवृत्तीनंतर माणसाकडे वेळच वेळ असतो. आहे तो वेळ घालवायचा कसा हाच वृद्ध माणसापुढे प्रश्‍न असतो. म्हटले, ‘इतक्या दिवसांनी माझी कशी काय आठवण झाली बुवा?’ ‘तसे नाही सर, खूप दिवस आम्ही सर्व आपणाला भेटायला येऊ पाहात होतो, परंतु अचानकपणे प्रत्येकाची काही ना काही अडचण यायची आणि त्यामुळे भेट लांबणीवर पडत गेली. क्षमस्व!’ पलीकडून आवाज आला. मी म्हटले, ‘ठीक आहे, ठीक आहे. अवश्य या!’
तालुका शिक्षणाधिकारी म्हणून मी काहीकाळ एका तालुक्यात काम केले होते. त्यावेळी तिथल्या एका खाजगी संस्थेतील संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यात वाद निर्माण झाला होता. संस्थाचालकाचे शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी लागेबांधे होते. या बळावर हा संस्थाचालक शाळेतील काही शिक्षकांना त्रास देत होता. त्यांना नोकरीतून काढून त्यांच्या जागी त्याला आपल्या नातेवाइकांना किंवा मोठ्या रकमेची देणगी देणार्‍या लोकांना शिक्षक म्हणून नियुक्त करायचे होते. संस्थेने एकप्रकारे बहिष्कृत केलेले हे शिक्षक शाळेच्या वेळेत जरी आले तरी त्यांना शाळेच्या आवारात प्रवेश करायला बंदी त्याने घातली होती. त्यामुळे दैनिक हजेरीपटावर (मस्टर रोल) ते सह्या करू शकत नव्हते. म्हणजेच ते शाळेत विनापरवानगी गैरहजर राहातात हे कारण दाखवून त्यांना नोकरीतून बरखास्त करायचे हे त्याचे कारस्थान होते. हे सर्व शिक्षक शाळेची वेळ संपेपर्यंत उन्हापावसात शाळेच्या आवरापाशी उभे राहायचे. शाळेतील विद्यार्थी त्यांच्याकडे टुकूटुकू बघायचे. असे हे बरेच दिवस चालले होते. या शिक्षकांची कुणी दखल घेत नव्हते. स्थानिक वर्तमानपत्रांतून अधूनमधून बातम्या झळकायच्या (सोशल मीडियाचा त्यावेळी आजच्यासारखा सुळसुळाट झाला नव्हता), पण सरकार किंवा शिक्षण खाते काहीच कारवाई करीत नव्हते. कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी संस्थाचालकाच्या बाजूने होते.

एक दिवस ही शिक्षक मंडळी माझ्या तालुका कार्यालयात आली. त्यांनी सगळी हकीगत माझ्या कानावर घातली. मी या शिक्षकांना शिक्षण खात्याकडे रजिस्टर पत्राद्वारे तक्रार करण्याचा सल्ला दिला. शिक्षण खात्याच्या कायद्याचा कसा उपयोग करून घेता येईल याचे मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे या शिक्षकांनी रीतसर शिक्षण खात्याकडे आपली कैफियत मांडली. नियमानुसार तक्रारीची चौकशी करण्यासाठी तालुका शिक्षणाधिकारी असल्याने हे प्रकरण माझ्यापाशी आले. मी त्या शाळेला भेट दिली. दिवस पावसाळी होते. भर पावसात हे शिक्षक गेटच्या बाहेर चिंताक्रांत मुद्रेने उभे होते. सुविद्य शिक्षकांची एका आडमुठ्या संस्थाचालकाने अशी दयनीय अवस्था करून ठेवली होती हे पाहून वाईट वाटले. मी त्या सर्व शिक्षकांना माझ्या सोबत शाळेच्या कार्यालयात घेऊन गेलो. मी तालुका शिक्षणाधिकारी असल्याने मला अडविण्याची कुणाची हिम्मत नव्हती. मी संबंधित कारकुनाला शिक्षकांचा हजेरीपट (मस्टर रोल) आणायला लावला आणि त्या सर्व शिक्षकांना सह्या करायला लावल्या. सतत आठ दिवस मी या अनुदानित शाळेला भेट देत होतो. त्या शिक्षकांना शाळेत प्रवेश देत होतो. यानंतर मी सविस्तर अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवला आणि यात शिक्षकांना व्यवस्थापन कसे त्रास देते आणि मी कोणती कारवाई केली याचे सविस्तर वर्णन यात केले.

पुढे संस्थाचालकाने या शिक्षकांच्या विरुद्ध स्ट्रेसपास कलमाखाली केस दाखल केली. कोर्टाची सुनावणी सुरू झाली. या सुनावणीत माझा अहवाल कोर्टाने ग्राह्य धरला आणि केस डीसमिस झाली. ते बहिष्कृत झालेले आठही शिक्षक जिंकले. व्यवस्थापनाला त्या शिक्षकांना पूर्ववत शाळेत हजर करून घ्यावे लागले. अनुपस्थिती दाखविलेल्या सर्व दिवसांचा पगार त्यांना द्यावा लागला. त्यांची सेवा नियमित झाली. गेल्या पाच ते दहा वर्षांत हे सर्व शिक्षक क्रमाक्रमाने निवृत्त झालेत. सातव्या वेतन आयोगाचा त्यांना लाभ झाला. निवृत्तीचे सर्व फायदे त्यांना मिळाले.

शाळेच्या त्या घटनेला तब्बल बत्तीस वर्षे झाली. काल अचानक फोन आला आणि मागचा सर्व इतिहास आठवला. ठरल्याप्रमाणे ही मंडळी भेटीसाठी आली. नमस्कार चमत्कार झाले. कृतज्ञतेचे बोल बोलले गेले. एकत्र चहापान झाले. मनसोक्त गप्पा झाल्या. खूप समाधान वाटले. निवृत्तीनंतर माझ्यासारख्या माणसाला या वयात याशिवाय आणखी काय हवे असते?
शिक्षण खात्याच्या मुख्यालयात प्रथम श्रेणी राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर माझे कार्यक्षेत्र अधिक विस्तारले. संपूर्ण गोवाभर माझा वावर होता. अनेकांना जी शक्य असेल ती नियमांच्या चौकटीत राहून मदत केली. अनेकांना अडचणीतून सुटका करण्याचा मार्ग दाखवला. अनेकांच्या बदल्या, बढत्या, नियुक्त्या करता आल्या. ती सर्व माणसे आजही माझी आठवण काढतात हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. आपण केलेल्या प्रामाणिक कार्याची जाणीवपूर्वक आठवण ठेवणारी माणसे असतात. काहीजणांना भेटीगाठी घेता येत नसल्या तरी वर्षानुवर्षे कृतज्ञता त्यांच्या मनात साठून राहिलेली असते आणि कधीतरी ती उघड होते हे आजच्या ‘त्या’ आठ शिक्षकांच्या भेटीतून जाणवले. ‘ज्याचे कर्म भले त्याचे सगळेच भले’ असे म्हटले जाते आणि ते खरे आहे हे आजच्या भेटीने जाणवले.