भूरूपांतरावरून विधानसभेत गदारोळ

0
16

गोवा विक्रीला काढल्याचा विरोधकांचा सरकारवर आरोप काँग्रेसच्या आमदारांचा सभात्याग

विरोधी पक्षांच्या आमदारानी राज्यातील भू-रूपांतरे व अविकसनशील क्षेत्र यासंबंधी विचारलेले प्रश्न सभापती गणेश गावकर यानी अधिवेशनात चर्चेसाठी न घेता ते फेटाळून लावल्याच्या प्रश्नावरून काल सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सभापती गावकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाची घोषणा केली असता विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सभागृहात हरकतीचा मुद्दा मांडत विरोधी पक्षांच्या आमदारांनी राज्यातील भू-रूपांतरांसंबंधीचे जे महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत मांडले होते ते सभापतींनी कामकाजात चर्चेसाठी का घेतले नाहीत याचे उत्तर द्यावे, असा आग्रह धरला. यावेळी आलेमाव यांनी सरकारवर जोरदार टीका करताना राज्यात किती भू-रुपांतरे झालेली आहेत व पुढे आणखी किती भू-रूपांतरे होऊ घातली आहेत याचा सगळा लेखाजोगा आम्हाला हवा असल्याचे स्पष्ट करून तुम्ही गोवा विक्रीवर काढला आहे काय, असा सवाल केला.

सभापतींसमोर गोंधळ
आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याचे दिसून आल्यानंतर युरी आलेमाव यांच्यासह काँग्रेस, आम आदमी व रेव्हुलेशनरी गोवन्स या पक्षाच्या आमदारांनी एकच गदारोळ माजवत सभापतींच्या आसनासमोरील हौद्यात धाव घेतली.
यावेळी सभापतींनी आपण भू-रूपांतरणासंबंधीचे तसेच अविकसनशील क्षेत्रासंबंधीचे प्रश्न कामकाजात का घेतले नाहीत त्यासंबंधीचा निवाडा देतो. तेव्हा तुम्ही तुमच्या आसनाकडे चला, अशी सूचना दिली. मात्र, यावेळी विरोधकांनी गदारोळ चालूच ठेवल्याने सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

दहा मिनिटांनंतर कामकाज पुन्हा सुरू झाले असता काँग्रेस, रेव्हुलेशनरी व आपच्या आमदारांनी परत गदारोळ माजवीत सभापतीच्या आसनासमोरील हौद्यात धाव घेतली. यावेळी युरी आलेमाव व वीरेश बोरकर यांनी सभापतींच्या आसनाजवळ धाव घेण्याचा प्रयत्न केला असता सभापतींनी सभागृहातील मार्शल्सना त्या दोघांना सभागृहातून बाहेर काढण्याचा आदेश दिला. त्यामुळे मार्शल्सनी त्या दोघांनाही सभागृहातून बाहेर काढले. यावेळी काँग्रेसच्या अन्य आमदारांनीही सभात्याग केला. मात्र, आमदार व्हेंझी व्हिएगस, कु्रझ सिल्वा व विजय सरदेसाई यांनी सभागृहात राहणे पसंत केले.