भूमाफियांवर कडक कारवाई करणार : राणे

0
12

राज्यातील वन क्षेत्रात वृक्षसंहार करणार्‍या, तसेच डोंगरांची कत्तल करणार्‍या भूमाफियांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल स्पष्ट केले. तसेच हडफडे येथे पार्क रेईस या हॉटेल प्रकल्पासाठी जो डोंगर कापण्यात आला आहे, त्या प्रकरणी पीडीएच्या संबंधित अधिकार्‍यांना सोमवारपर्यंत निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

गोवा वृक्ष संवर्धन कायदा १९८४ खाली या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे. ही कृती म्हणजे नगर-नियोजन कायद्याचा भंग असून, ज्या कुणाचा यात हात आहे, त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.

दरम्यान, राणे यांनी गेल्या शनिवारी वाघेरी वनक्षेत्र हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभाग जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच यापुढे कुणालाही कुठल्याही वनक्षेत्रातील वृक्ष व टेकड्या कापता येणार नसल्याचे नमूद केले होते. चोर्ला घाटातील वाघेरी टेकडी ही म्हादई अभयारण्याचा एक भाग आहे.