भीषण

0
12

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेले एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त होण्याची कालची भीषण दुर्घटना अतिशय सुन्न करणारी आहे. बहुसंख्य विमान दुर्घटना ह्या एकतर त्यांंच्या उड्डाणावेळी किंवा उतरताना होत असतात, असे आजवरच्या दुर्घटनांची आकडेवारी सांगते. परंतु आजच्या प्रगत युगामध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगतीनिशी अशा दुर्घटनांचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. रोज लाखो प्रवासी विमानांतून सुरक्षित प्रवास करीत असतात. त्यामुळे अशी एखादी दुर्घटना जेव्हा घडते, तेव्हा विमानप्रवासाच्या सुरक्षिततेबद्दलच्या प्रवाशांच्या विश्वासाला तडा जातो. भारतामध्ये अशा प्रकारची विमान दुर्घटना घडली, त्याला पाच वर्षे उलटली आहेत. दुबईहून आलेले एक विमान केरळच्या कोझीकोड विमानतळावर उतरताना दुर्घटनाग्रस्त होऊन त्याचे दोन तुकडे झाले होते. त्याच्या आधी मंगळूर विमानतळावर उतरणारे एक विमान थेट समोरच्या दरीत जाऊन कोसळले होते. अहमदाबादहून निघालेले हे विमान कोसळतानाचा जो व्हिडिओ उपलब्ध झाला आहे व फ्लाईट रडारवरून जी माहिती मिळाली आहे, त्यावरून असे दिसते की ह्या विमानाला उड्डाणानंतर अपेक्षित उंची गाठता आली नाही. त्यामुळे बघता बघता विमानतळाबाहेरील परिसरात ते खाली कोसळले. कोसळताना एका पाच मजली इमारतीला धडकल्याने मोठा स्फोट झाला आणि आगीचे व धुराचे लोळ उठले. अहमदाबाद ते लंडन असा नऊ तास 50 मिनिटांचा थेट प्रवास हे विमान करून ब्रिटीश वेळेनुसार संध्याकाळी सहा पस्तीसला गॅटविक विमानतळावर उतरणार होते. थेट विमान असल्याने साहजिकच एवढ्या लांबच्या प्रवासासाठी त्यामध्ये पूर्ण क्षमतेने इंधन भरलेले होते. त्यामुळे विमान दुर्घटनाग्रस्त होताच मोठा स्फोट होऊन आग लागली. हे एक ड्रीमलायनर 787-8 विमान होते. बोईंगची ड्रीमलायनर 787-9 व 787-10 ही आकाराने त्याच्याहून मोठी व अधिक म्हणजे अनुक्रमे 296 व 318 प्रवासी क्षमतेची असतात. ड्रीमलायनर हे त्या तुलनेत हलके व कार्बन फायबर रीएन्फोर्स्ड पॉलीमरचे बनलेले असते. रडारवर विमानाच्या वैमानिकाने ‘मे डे’चा म्हणजेच संकटाचा निर्वाणीचा संदेश पाठवला, तेव्हा ते जमिनीपासून 625 फुटांवर म्हणजेच जवळजवळ दोनशे मीटर उंचीवर होते. एवढ्या उंचीवरून खाली कोसळताना त्याचे तुकडे तर झालेच, परंतु आग लागल्याने अधिक प्राणहानी झाली असेल. अहमदाबादसारख्या मोठ्या विमानतळावर ही दुर्घटना घडल्याने लागलीच सर्व मदत यंत्रणा कामाला लागल्या खऱ्या, परंतु दुर्घटनेचे भीषण स्वरूप अधिक बोलके होते. ह्या विमानाचे दोन्ही वैमानिक अनुभवी होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे. विमानाच्या कॅप्टनला तर आठ हजार तास उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव होता. आता टाटांकडे मालकी गेलेली असली, तरी सहसा एअर इंडियाचे वैमानिक हे नेहमीच अनुभवी असतात. शिवाय हे आंतरराष्ट्रीय उड्डाण होते. अशा प्रकारच्या विमान दुर्घटनेमागे इंजिनात बिघाड, इंधन पुरवठ्यात अडथळा, तांत्रिक बिघाड, पक्ष्याची धडक किंवा मानवी चूक असे कोणतेही कारण असू शकतेच, परंतु घातपात हेही कारण असू शकते. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणाने ही भीषण दुर्घटना घडली हे विमानातील ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हाईस रेकॉर्डरचे विश्लेषण केल्यानंतरच कळू शकेल. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाची उंची, वेग, मार्ग इ. ची नेमकी माहिती साठवलेली असेल आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये वैमानिकांचे संभाषण, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेले संभाषण, कॉकपिटमध्ये यंत्रणा नादुरुस्त झाल्याचे आलेले अलर्ट इ. आवाज ध्वनिमुद्रित झालेले असतील. त्यामुळे ह्या दुर्घटनेमागचे नेमके कारण कळेलच, परंतु एक गोष्ट मात्र ह्यानिमित्ताने ठळकपणे समोर आली आहे, ती म्हणजे जरी उड्डाणावेळी विमानात बिघाड झाला, तरी विमानतळाच्या परिसरात मोकळी जागा असती, तर कोणी सांगावे, कदाचित वैमानिक हे विमान सुरक्षितरीत्या उतरवू शकला असता. अमेरिकेत एका वैमानिकाने तर थेट हडसन नदीत विमान उतरवून प्रवाशांचे प्राण वाचवले होते. परंतु आजकाल विमानतळांच्या परिसरात वाढती बांधकामे आणि अतिक्रमणे एवढी असतात की अशी एखादी दुर्घटना घडत असताना कुशल वैमानिक असला, तरी त्याला सुरक्षित विमान उतरवायला जागाच नसते. प्रस्तुत दुर्घटनेच हेच झाले. विमानतळाच्या आजूबाजूचा थोडा परिसर मोकळा असता, तर कोणी सांगावे, एवढी प्राणहानी कदाचित झालीही नसती. ह्या दुर्घटनेतून विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा भरवसा पुनर्स्थापित करण्यासाठी ह्या दुर्घटनेच्या कारणांचा कसोशीने शोध घ्यावा लागेल.