(उत्तरार्ध)
– प्रा. प्र. शं. तासे
दशरथांच्या अकाली मृत्यूने तिसर्या अंकाची पायवाट आखली आहे. तिसर्या अंकाचे स्थळ आहे अयोध्येबाहेरचे प्रतिमागृह. ही भासाची नवी निर्मिती, जशी स्वप्नवासवदत्त नाटकातील समुद्रगृह भरत विवाहानंतर मातुल घरी राहिलेला. अयोध्येतील ताज्या राजकारणाची काहीच कल्पना नसलेला, राज्य निर्नायकी झाले म्हणून नव्या राजाला, भरताला, परत आणण्यासाठी सुमंत्र गेलेला. आता ते दोघे रथातून अयोध्येला येत आहेत. भरत थोडी विश्रांती घेऊ इच्छितो. तेवढ्यात एक सैनिक अयोध्या प्रवेशाला थोडा अवधी आहे, शुभमुहूर्तावर युवराज – प्रवेश व्हावा म्हणून थांबावयास हवे, असा निरोप देतो. अशा निकडीच्यावेळी भरताला एक विश्रांतीस्थान हवे आहे, ते हे प्रतिमागृह. भासाची स्वतंत्र्यप्रज्ञा- निर्मिती. प्रतिमागृहातील मूर्च्छित भरतात सुमंत्राला राजा व भरत यामध्ये दिसलेले साम्य. (वयस्य इव पार्थिवः) कौसल्या व सुमित्रा मातांबद्दलचा भरताचा विनय, कैकेयी जननीबद्दलचा राग व तिरस्कार, भरताने तिची घेतलेली उलट तपासणी इत्यादी सार्या घटना आटोपशीर आणि संवाद कुशल झाल्या आहेत.
चौथा अंक राम-भरत भेटीचा आहे. सुरुवातीच्या प्रवेशकात विजया व नन्दिनिका या दासींच्या संवादातून कैकेयी यासंबंधीची पारंपारिक समजूत भासाने मांडून ठेवली आहे. विजया म्हणते, ‘राज्याच्या लोभाने कुमार रामाला राज्यापासून वंचित केले, स्वतःवर वैद्यत्व ओढवून घेतले, प्रजेला राजरहित केले, बाईसाहेब अगदी दुष्ट आहेत.’ (निर्घुणा खलु भट्टिनी) आणि निन्दिनिका भरताचा तातडीचा रामाकडे जाण्याचा निर्णय कौतुकाने सांगते. या अंकातील राम-भरत भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे भासाने राम व भरत यातील नव्याने अधोरेखित केलेले रुप व ध्वनी सादृश्य. आपल्या आगमनाची सूचना भरत आपणच देतो. तो आवाज ऐकून स्वतः राम त्या आवाजातील व दशरथाच्या आवाजातील साम्य बोलून दाखवतो. (कस्यासौ सदृशतरः स्वरः पितुर्भे?) लक्ष्मणालाही हा आवाज आपल्या बंधुसदृश वाटतो. लक्ष्मण रामाज्ञेवरून भरताला आश्रमात आणायला बाहेर जातो. तेव्हा प्रथमदर्शनी त्याला, हा तर आर्य राम आहे, असे भरतास पाहून वाटते. (अयमार्यो रामः! न,न| रुप सादृश्यम्|) पुढे सीता भरताच्या स्वागतार्थ बाहेर येते तेव्हा आतील राम एवढे कसे बाहेर आले? नाही नाही हे आर्यपुत्र नाहीत, हा भरत, पण केवढे हे रुपसादृश्य, सीतेला पाहून भरत राजा जनकाच्या तपस्येचे हे फलच!’ असे म्हणतो तेव्हा त्याच्या व रामाच्या आवाजातील साम्य सीतेलाही जाणवते. (न हि रुपमेव स्वरयोगोऽपि स एव|) या रुप व ध्वनी सादृश्यातून आणि प्रतिमागृहातील प्रतिमा व भरत यातील अव्दैतच भासाला सांगायचे आहे. वनवासकाळात भरत राजा म्हणून जरी राज्यकारभार करणार असला तरी ते रामानेच राज्य करण्यासारखे आहे. परंपरेहून आणि रामाहून भरत अजिबात वेगळा नाही, हेच भासाला अधोरेखित करायचे आहे. राम भरत भेटीचे नाट्यदृष्ट्या हे अपूर्व फलित. उरलेला अंक राम-भरत भेटीचा प्रसंग नाट्यमयरित्या उभा करतो. त्यात नवीन असे काहीच नाही. आल्या दिवशीच राम आपल्या पादुकांसह भरताला अयोध्येस पाठवतो, ही कर्तव्यनिष्ठा!
पाचवा अंक सीता हरणाचा आहे. राम आश्रमाबाहेर गेले आहेत. तोवर सीता बालवृक्षांना पाणी घालते आहे. नायिका झाडांना पाणी घालत असता नायकाची तिच्याशी भेट व्हावी, या घटनेवरून कालिदासाला झाडांना शकुंतला पाणी घालत असता दुष्यन्त भेट घडवावी अशी कल्पना सहज सुचणे शक्य आहे. श्राद्धप्रसंग व हिमालयाची जनस्थानात रावणकृत निर्मिती ही भासाची स्वतंत्र निर्मिती आहे. प्रारंभी म्हटल्याप्रमाणे भास मूळच्या राजकीय कथावस्तूला एक कौटुंबिक घाट देऊ पाहत आहे, हे इथेच स्पष्ट होते. ‘मृग सोन्याचा जगी असंभव| त्यास पाहुनी भुलले राघव’ हा दोषही कांचनपार्श्वमृगाची निर्मिती करून टाळला आहे. सीता-हट्टापायी राम कांचनमृगामागे धावले असे न दाखविता ते दशरथांच्या श्राद्धासाठी उंचीप्रतीचा मृग आणण्यासाठी गेले, असे दाखवून भासाने रामाची व्यक्तीरेखा उंचावली आहे. हिमालयाच्या अस्थानी निर्मितीने अद्भूत रस साधला आहे.
सहाव्या अंकाच्या प्रारंभी जटायू वधाचे दृश्य दोन तापसांच्या वर्णनातून आले आहे. रंगभूमीवर युद्ध दाखवू नये या नाट्यशास्त्र नियमातीचे भास पालन करतो आहे. सहाव्या अंकातील मुख्य दृश्य मात्र भासाची स्वतंत्र निर्मिती आहे. भरताने सुमंत्रांना रामकडे कुशल जाणून घेण्यासाठी पाठविले आहे, हीच मुळी रामायणाहून वेगळी, अभिनव कल्पना. त्यात भरताचे रामाविषयी प्रेम स्पष्ट झाले आहे. सुमंत्र येतो तेच सीताहरणाची वार्ता घेऊन. त्यामुळे रामाविषयी भरत कळवळतो तर कैकेयी विषयी राग त्याचा उफाळून येतो व तो कैकेयीला भेटावयास जातो आणि तिला ‘तुझे मनोरथ पूर्ण झाले ना?’ असे उपहासाने विचारतो. आता कैकेयीला आजवर गुप्त राखलेले सत्य जाहीर करण्याची दुर्लभ संधी मिळते. तीचे स्पष्टीकरण ही भासाची या नाटकातील अपूर्व निर्मिती. कैकेयी भरताला दशरथांना मिळालेल्या श्रावण बाळाच्या पित्याच्या शापाचा वृतांत सुमंत्राकरवी सांगते. त्या शापाने दशरथाचा मृत्यू पूत्रवियोगाने घडणार, हे निश्चित झाले होते. कैकेयीने पूत्रवियोग या शब्दाचा अर्थ पूत्रवधाने श्रावण पित्याला घडलेला वियोग असा न घेता, पुत्राला (रामाला) राजापासून वियोग (दूर करणे), असा घेऊन रामाला वनवासाला पाठवायचाच असा हट्टच धरला. त्याने अटळ असे दशरथाचे मरण घडले, पण राम वाचला! आता रामच का? तर तो दशरथांना सर्वांत अधिक प्रिय होता. तेव्हा राज्य लोभाने नव्हे तर रामाला वाचविण्यासाठी कैकेयीने वनात पाठविले. कैकेयीकृत योजना वसिष्ट व वामदेवादि प्रमुखांनाही माहित होती. म्हणजे मुख्य रामायण हे श्रेष्ठ व ज्येष्ठ विचारवंतांच्या एका सुसंबद्ध अशा योजनेतून घडविले आहे, असा परंपरेहून वेगळा अर्थ भास सुचवितो आहे. त्यामुळे कैकेयी निरपराध ठरून ऋषीप्रणित योजनेचा विजय झाला आहे. रावणाच्या परिपत्याखाली क्षात्रहीन भारतात त्या काळात रामायणासारख्या श्रेष्ठ धनुर्धर असलेल्या राजकुलात ऋषींनी कैकेयीच्या माध्यमातून ही योजना आखली व यशस्वीही केली, असा या स्वतंत्र निर्मितीचा उदात्त अर्थ.
सातवा अंक रामाभिषेकाचा अंक आहे. भरत, राजमाता व सैन्य घेऊन येतो आहे. मध्यंतरीचा चौदा वर्षांचा काळ संपला आहे. रामही रावणवध करून, सीताशुद्धी करू पुनः जनस्थानात आले आहेत आणि इथे रामायणाहून वेगळ्या ठिकाणी, राम भरत व राजमाता यांची मोकळ्या वातावरणात अनपराधी भावनेत, आनंदात भेट घडते आहे आणि कैकेयीच्या आग्रहाने रामाला राज्याभिषेक सर्वांच्या साक्षीने आधी इथे व नंतर अयोध्येत घडत आहे. अयोध्या पुनः एकदा राजा रामाज्या विजयी आगमनाने मोठ्या साम्राज्याची राजधानी होणार आहे.
भासने प्रतिमा नाटकात मूळ रामायणाचा आधार घेत घेत प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वतंत्र प्रतिभेचे गहिरे, नाट्यपूर्ण व मौलिक उन्मेष दाखवले आहेत, हे पटावे. काही टीकाकारांच्या मते भासाने मूळ रामायण कथेत हे बदल केलेत असे वाटते तर काही टीकाकारांच्या मते भासापुढे मूळ रामायणाहून वेगळे, दक्षिणेकडील रामायण असावे, त्यात बदल वर्णिलेले असावेत, भासाने त्यांना नाट्यपूर्ण रीतीने रंगभूमीवर दाखविले असे वाटते. काहीही असले तरी हे नाटक लिहिताना भासाचा रामकथेला एक वेगळा, उदात्त, निरपराधी अर्थ देण्याचा हेतू होता हे उघड आहे व तो सर्वार्थाने प्रशंसनीय आहे, हे मात्र खरे.

