भाषा ही आपल्या संस्कृतीची वाहक असते

0
63

गोमंतक मराठी साहित्य परिषद, कला व संस्कृती खाते आणि लाड उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसर्‍या अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलनात डॉ. कोमरपंत बोलत होते. 

या संमेलनाचे उद्घाटन आमदार तथा साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कला व संस्कृती खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर, स्वागताध्यक्ष आमदार गणेश गावकर, आमदार डॉ. प्रमोद सावंत, कार्याध्यक्ष सत्यविजय नाईक, पूर्वाध्यक्ष गुरुनाथ नाईक, आयोजन समितीचे अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी, कार्यवाह आत्माराम कुडचडकर, कालिदास खांडेपारकर, चंद्रकांत गवस, विठ्ठल पारवाडकर, अशोक घाडी, माजी आमदार नरहरी हळदणकर आदी उपस्थित होते. आपल्या पूर्वजांनी प्रतिकूल परिस्थितीत मराठीचा आत्मस्वर जोपासलेला आहे. आजही त्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. गोमंतभूमीत अनेक राजवटी आल्या आणि गेल्या. पण येथील मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची परंपरा अभंग राहिली. मराठी भाषेने गोमंतकाला कठीण दिवसांमध्ये आत्मतत्त्वाची ओळख करून दिली. स्वत्वाची आणि सत्वाची जोपासना करण्याची अंतःप्रेरणा दिली. साहित्य जीवनाला अभिरुचि संपन्न करते. नवी मिती देते. विचारांना प्रवृत्त करते आणि कृतिप्रवणही करते, असे डॉ. कोमरपंत यांनी सांगितले. मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेच्या रक्षणार्थ एकजुटीने कार्यकरण्याची गरज आहे. ज्ञान संपादन करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. भाषा जगविण्याचे काम करणारे लोक हे आपले सांस्कृतिक राजदूत आहेत, असे विष्णू वाघ यांनी सांगितले.
भाषा, संस्कृती यांच्याकडे बघण्याच्या समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले. आमदार डॉ. प्रमोद सावंत, आमदार गणेश गावकर, सत्यविजय नाईक, पांडुरंग नाडकर्णी यांनी विचार मांडले. चंद्रकांत गवस यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल पारवाडकर यांनी ओळक केली. सूत्रसंचालन महादेव प्रभू यांनी केले. आनंद मयेकर, गजानन जाधव यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले.