– सौ. पौर्णिमा केरकर
आला पह्यला पाऊस, शिपडली भुई सार
धरत्रीचा परमय, माझं मन गेलं भरी
आला पाऊस, पाऊस आला सरीवर सरी
शेतं शिवारं भिजलं, नदी नाले गेले भरी
बहिणाबाईंची पावसाविषयीची ही आर्तता सार्वत्रिकच आहे. पाऊस तर दरवर्षीच येतो, त्यात नावीन्य ते काय? असे एखाद-दुसर्या अरसिक मनाला सहजपणे वाटू शकेल. परंतु भौतिक सुखवादाच्या संस्कृतीतून बाहेर पडल्यानंतर झाडापानांच्या, डोंगर-दर्यांच्या ओलाव्यातून सार्याच मरगळलेल्या जाणिवाच टवटवीत होतात. जीव एखाद्या धुके पांघरलेल्या डोंगरात, वार्या-पावसात, जोरदार डोलणार्या माडाच्या झावळ्यात, झाडाच्या बुंध्यावर, खोडावर, ङ्गांदीवर उगवलेल्या ऑर्किडस्मध्ये गुंतून पडतो. मृदगंधात मिसळलेले इतर अनेक गंध तरल संवेदनाच जाग्या करतात. पाऊस संततधार कोसळत आहे. खिडकीतून अगदीच जवळच दिसणारे डोंगर जणू काही पावसानेच पळवून नेल्यासारखे दाट धुक्याची चादर ओढून बसले आहेत. टरारून आलेली केळीची पाने तर ङ्गाटून गेलेली आहेत. छप्पराच्या पागोळ्यांतून ओघळणार्या पाण्याच्या धारांची तर घरासभोवताली सुरेख रांगोळीच तयार झालेली आहे. शेतकुणग्यांनी भरून राहिलेल्या पाण्यात मनमुराद नाचावे असेच हे पावसाळी वातावरण.
पाऊस म्हणजे पाणी, पाऊस म्हणजे चिखल, पाऊस म्हणजे सृजन, पाऊस जीवनगाणे. मानवी जीवनात पावसाला अनन्यसाधारण महत्त्व. सृजनाची तर ती गंगोत्री. उन्हाळ्यात तहानलेली धरित्री- सृष्टी पावसाची आतुरतेने वाट पाहत असते. हिरवे कोंब लसलसून वर आले की त्यांचे मार्दव डोळ्यांना सुखावते. जीवनानुभवाना सामोरे जाताना अशा काही अनुभवांचे मार्दव अनुभवता आले तर ते समाधानाची किनार प्राप्त करून देणारे ठरते. पावसाला तर सगळेच गंध बिलगून बसतात. अंगणातच बहरणारा पारिजात तिन्हीसांजेला गंधवती करीतच सकाळच्या प्रहरी अंगणात रांगोळी घालतो. ओलसर भिजरा वास ओल्या कपड्यामुळे, बाहेरील ओलाव्यामुळे घरातच ठाण मांडून बसलेला. जाईजुईचा गंध, भुईचाफ्याचा तजेला, गोठ्यातील शेणाचा वास तर भिंतोडीच्या कडेकडेने अंगणात येताना बघत बघतच बालपण वाढत गेले. कुंपणालाच हटून बसलेला अडुळसा, निवडुंग पावसाळ्यात ङ्गुलताना उपराच वाटायचा. रणरणत्या उन्हाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा पानन्पान गाळून टाकून, रसरसून ङ्गुलून आलेली गुलमोहराची ङ्गुले मात्र पावसाळ्यात मरगळून पडतात तेव्हा त्यांना तुडवताना मनाला यातना होतात खर्या, परंतु नवपालवीनेही बहरलेला तो दिसला की पावसाची सृजनात्मकता त्याच्या उत्सुक सरींनी चिंब भिजवते. झाडेपेडे-पशुपक्षी, पानेङ्गुले, कृमी-कीटक, डोंगर-दर्या सर्वांतच हिरवा रंग मिसळून मन चिंब पावसाळी होते.
पावसाचे लोकमनात कितीतरी संकेत आढळतात. पाऊस न पडताही ढग दाटून आले की बेडुकरावांना कसे कुणास ठावूक पावसाची चाहूल लागतेच. म्हणूनच तर पूर्वीची बालपणे गायची झुल्यावर बसून-
आराड गे माणके सान जावनी
आमची आई घरा येवनी…
लहानग्यांना घरी ठेवूनच आई-वडील शेतात, डोंगरावर जायचे. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळायची जबाबदारी मोठ्या मुलीवर असायची. झुल्यावर बसूनच मग त्यांना खेळवताना पावसाचा आनंद बेडकाचे गीत म्हणून लुटला जायचा. भावाबहिणीच्या नात्याला तर या पावसाने कधी सुखद तर कधी दु:खद घटनांनी वेढलेले आहे. तीन महिन्यांची गरोदर बहीण भावाच्या घरात म्हणजेच आपल्या माहेरी आलेली असते. भावजयीच्या राज्यात तिची उपेक्षाच होते. भावजय साडी म्हणून कुमयाची साल तिला नेसायला देते. तिची ओटी भरताना तांदळाऐवजी मातीचा वापर करते. नारळाच्या जागेवर कुमयाच्या कुंभङ्गळांचा वापर केला जातो. जेवणातही कुण्याची, भाताच्या कोंड्यापासून तयार केलेली भाकरी दिली जाते. हेच जेवण बांधून देऊन भाऊ बहिणीला माहेरी सोडण्यासाठी बरोबरीने म्हणून जातो व तिला एकटीलाच अटंग्या रानात म्हणजेच घनदाट जंगलात सोडतो. ढग दाटून आलेले असतात वर आभाळात आणि तिच्या डोळ्यांतही. तरीही ती म्हणते, पावसा ये, माझ्या भावाचे तटे मोठे होऊ दे… त्यासाठी-
लाग लाग रे मेघराया
माझ्या बंधवाच्या शेत्रा
माझ्या माथ्यार
कुण्या कुणब्याचा रोटा…
खांद्यावर नांगर, गुठो घेऊन डोक्यावरील कांबळ, गोरबी सांभाळीत, बैलजोडीला हाकारत शेतनांगरणीसाठी जातानाचा घरधनी मोठमोठ्या धारांनी कोसळणार्या पावसातील एक चित्रच होऊन बसलेला होता. भीजत भीजत, माना खाली घालून जाणार्या बैलजोड्या बघितल्या की त्या मुक्या प्राण्यांची दया यायची. एका बाजूला नांगरजोड्या तर दुसर्या बाजूला सकाळी सकाळीच पावसापाण्यात कुडकुडत ताजी ताजी रापणीची मासळी घेऊन येणारे रापणकार. ताजी ङ्गडङ्गडणारी सुंगटे. गाथनी घेण्यासाठी धावाधाव व्हायची. गरम गरम वाङ्गळलेला उकडा भात आणि मासळीचे कालवण ही तर पावसाळ्यातील मेजवानीच. त्याशिवाय ङ्गणसाच्या आठळ्या, काजू, शेंगदाणे भाजून खाण्यातला आनंद काही औरच होता. खूप खूप भिजणं. खूप खूप होड्या कागदाच्या करून अंगणातल्या साचलेल्या पाण्यात, ओहोळात सोडणे, अळवाच्या पानांवर पाण्याचे थेंब सोडून त्यातील इंद्रधनुष्यी रंग न्याहाळीत त्याना वाहत्या पाण्यात सोडणे, अंगणातली पाऊसङ्गुले उड्या मारून वेचणे ही संवेदनशीलता पावसाची होती. पाऊस तेव्हा थेट काळजाशी नाते जोडायचा. त्याच्याशी लगट करण्यात कसलीच भीती वाटत नव्हती. त्याची अनेकरंगी रूपे मनाला भावायची. डोळे गच्च मिटून त्याच्या झिम्मड कोसळण्याशी समरस होणे व्हायचे. एखादा पाऊस संध्याकाळी ढग माथ्यावर घेऊन उभ्या असलेल्या झाडांमधील काजळ्यांची लुकलुक मुठीत धरून पायवाटांचा अंदाज घेणे व्हायचे. नदीचे काठाकाठाने भरून आलेले उङ्गाड्याचे रूप पाहून पाऊस-धरतीची मीलनोत्सुकता सृजनशील व्हायची. आकाशाचा पुत्र आणि जलाचा वर्षाव करणारा हा पर्जन्य. त्याच्यासाठी स्तुतीगायन केले जायचे. पावसाच्या रूपाने धनधान्याची समृद्धी घरादारांत नांदती राहायला हवी. पावसामुळे प्राणी सृष्टीत सृजनता निर्माण होते म्हणूनच तर त्याची चातक चोचीने प्रतीक्षा केली जाते.
गोवा आणि पाऊस यांचे नाते खूप जुने. सह्याद्री आणि सागर यांच्या कुशीत वसलेल्या या राज्यात मान्सुनचा पाऊस सुरू झाला की त्याचे रूपच पालटते. आकाराने ही भूमी छोटी असली तरी पदोपदी त्याची रूपे बदलतात. जो गोवा आपण जुन्या काबिजादीत अनुभवतो तो नव्या काबिजातीत दिसायला तसा कठीणच. एकाच गोव्याची दोन रूपे जशी अनुभवता येतात, तसेच सागर आणि सह्याद्रीत भिन्न अनुभव प्राप्त होतो. गोव्यातल्या पावसाची रूपे विविधरंगी आहेत. कवीचे हृदय घेऊन आपण पेडणे ते काणकोण व सासष्टी ते सत्तरीतर्यंत पावसाला भटकंती करायला निघालो तर पावसाची रांगडी, लोभस, गुलाबी अशी मनोहारी रूपे अनुभवायला मिळतात. गोव्याला येणारे पर्यटक विशेषकरून ङ्गेसाळणारे निळेशार सागरकिनारे पाहायला येतात. पावसाळ्यात सागरकिनार्यावरचे पर्यटन एकेकाळी जवळजवळ ठप्पच होते. परंतु हरमल, मांद्रे, मोरजी, केरी, तळपण, गालजीबाग, पाळोळे त्याचप्रमाणे बाणावली, कोलवा येथील सागरकिनारे पावसाळ्यात अनोख्या रूपात पदार्पण करतात. उन्हाळ्यासारखेच पर्यटकांचे तांडे येथे येत नसल्याने मुसळधार पावसात हरवलेले किनारे, त्यांचा एकाकीपणा अनुभवताना आपण वेगळ्याच रूपाला सामोरे जात असतो. काणकोणचा पाळोळेचा सागरकिनारा पावसाळ्यात अक्षरशः रौद्रभीषण रूपाने लाटांचे तांडव समुर्ल करतो. हिमालयापेक्षा जुनेजाणते असलेले इथले महाकाय आणि काळेकभिन्न पाषाण युगायुगांपासून उभे आहे. पावसाळ्यात सचैल भिजणार्या त्या शीलाखंडाना कोण अचेतन म्हणणार? कल्पद्रुमाच्या सान्निध्यात असलेल्या हणजुणा, वागातोर या किनार्यांची रूपे माणसाला त्याचे स्वत्व विसर्जित करायला प्रवृत्त करतात.
सह्याद्री हा गोव्याचा कणा म्हटला तर ते वावगे ठरणार नाही. प्राणवायू आणि पाणी याद्वारे पोषणाला उन्नत करणारा सहृ्याद्री मान्सूनच्या पावसाला आगळ्यावेगळ्या अविष्कारात सामोरा जातो. उन्हाळ्यात शुष्क झालेली सुका पानशिरा आठवड्याभरात कोसळणार्या पावसाला सामोरी जाताना रंध्रारंध्रांतून पाझरू लागते. बारामाही वाहणारी ओला पानशिरा पावसात ओलांडणे असंभव. आणि यासाठी आजही तिथे सामूहिक श्रमातून आणि कल्पकतेतून उभे राहातात मनामनांना जोडणारे साकव! गोव्यातील सह्याद्रीचे पावसाळी रूपसौंदर्य, लोभसता अनुभवता माणूस स्वत्वच विसरतो आणि नैसर्गिक तत्त्वांशी नि:संग एकरूप होतो. केसलरॉकच्या घाटमाथ्यावरून एकत्रितपणे कोसळणार्या काटला आणि पाळणा यांच्या रूपाला ‘दूधसागर’ ही संज्ञा प्राप्त झालेली आहे. लोंढ्यावरून रेल्वे सरकत सरकत कुळेकडे येऊ लागली की सोनावलमध्ये दूधसागाराच्या प्रेक्षणीय रूपाने सच्या निसर्गप्रेमी देहभान विसरतो. सह्याद्रीचा प्रत्येक जलप्रपात आणि धबधब्याचे रूप प्रत्येकाचीच अस्मिता भिन्न असल्याचा प्रत्यय देते. दूधसागराच्या लावण्याची तुलना आपण केरी सत्तरीच्या वझरासखलाशी करू शकत नाही, तर वझरासखलाच्या रूपाची सर दूधसागराला येणार नाही. तांबडीसुर्लच्या जंगलात वझरासखला नावाचा आणखी एक धबधबा आहे. नावात जरी साम्य असले तरी त्याचा रुबाब केरीच्या वझरासखलाहून भिन्न आहे. सुर्ल्यातील लाखो वर्षांच्या कातळांना भेदून कोसळणारा ‘लाडकेचा वझर’ पाईकाच्या पठारावरून पाहताना आपण वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो. श्रावण- भाद्रपदात जेव्हा पावसाचा जोर कमी होऊ लागतो तेव्हा सुर्लातील घुंगर्ड्याचा धबधबा छम…छम…छम…छम… घुंगरू वाजविल्याचा आवाज निर्माण करतो. डिचोलीत हरवळे येथे असलेला धबधबा पावसाळ्यात कोसळताना सहस्त्रधारांना कवेत घेऊन असा कोसळतो की तिथल्या भूमिपुत्रांना भय, दिव्यत्व, अचाटपणा यांचा साक्षात्कार घडवितो. हा कोसळणारा धबधबा त्यांच्यासाठी ङ्गक्त पाण्याचा स्त्रोत राहिला नाही तर त्यांना त्यातून रुद्राचे रूप प्रतीत झाले. दिव्यत्वाची प्रचिती आलेल्यांनी या धबधब्याच्या परिसरात रुद्रेश्वराची स्थापना केली. कोणकोणातील खोतीगाव अभयारण्यात असणारा नडकेचा धबधबा पावसाळी मौसमातच इतका कोसळतो की आपले तन-मन चिंब करतो. गंधाळलेल्या जंगलवाटा पार करून आपण प्रपात कोसळणार्या जागी पोहोचतो तेव्हा त्याचे रूप आपल्या मनात थुईथुई नाचणार्या मयूराच्या नर्तनाचा भास निर्माण करते.
मनभावन पावसाला समरसून अनुभवताना तो नेहमीच विविध भावमुद्रांतच प्रकटलेला आहे. पावसाळ्यात आपल्या मौनाने अनाकलनीय अव्यक्त राहिलेले आकाश आणि त्याच्यात ढग साचून नभ भरून येण्याची वाट पाहणारी सृष्टी अतृप्त, तहानलेल्या अस्वस्थतेचे हे चित्र पावसाच्या आवेगी येण्याने पूर्णत: पालटते. पावसाला सुरुवात होण्यापूर्वीचा हा आवेग हुरहूर लावणारा. पाऊस या धरेला जणू काही कवेत घेतो, त्याच्या स्पर्शानेच तिच्या अंगावर रोमांच ङ्गुलतात. दोघेही एकमेकांशी समरस होत ङ्गुलारून उठतात. धरित्रीची समर्पणता तनामनाला तजेला बहाल करते. आकाशाची निळाई काळीजकुपीत जतन करीत पावसाच्या भावमुद्रा मनात उतरवून एकांताशी, शांततेशी, त्याच्या धो-धो कोसळण्याशी अंतर्मुख तर होता येतेच, त्याबरोबरीनेच आत्मबळ प्राप्त होते. पावसाची भावविभोरता मग आत्ममग्न करीत जाते आपल्या जगण्याचा प्रत्येक क्षण…