रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा अनेकार्थाने फलदायी ठरला. शुक्रवारी दोन्ही देशांमध्ये अनेक क्षेत्रात मोठे आणि महत्त्वाचे करार झाले. 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत महत्त्वाच्या करारांवर चर्चा झाली. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली. चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये करारांची देवाणघेवाण झाली. मोदी आणि पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान झालेल्या करारांमध्ये कामगार स्थलांतर, आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा, जहाजबांधणी, रसायने आणि खते यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता.
नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर, दोन्ही बाजूंनी संयुक्त निवेदनात संबंध मजबूत करण्याचा आणि दहशतवादाविरुद्ध संयुक्तपणे लढण्याचा संकल्प व्यक्त केला. संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी रशियाच्या लोकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. भारताने रशियन लोकांसाठी मोफत ई-टूरिस्ट व्हिसा सुरू केला आहे. हा ई-व्हिसा 30 दिवसांसाठी वैध असेल.
भारत आणि रशियामधील मैत्री ही ध्रुवताऱ्यासारखी आहे. या आर्थिक भागीदारीला नवीन उंचीवर नेणे हे आमचे प्राधान्य आहे, असे मोदी म्हणाले.
भारताला इंधन पुरवठा करत राहू : पुतीन
यावेळी व्लादिमीर पुतीन यांनीही इंधनाबाबत मोठी घोषणा केली. रशिया कोणत्याही दबावाशिवाय भारताला इंधन पुरवठा करत राहील. रशिया आणि भारत यांच्यातील संबंधांच्या प्रत्येक पैलूवर चर्चा केली आहे. सुरक्षा, अर्थव्यवस्था, व्यापार आणि संस्कृती या क्षेत्रात आमचे संबंध सतत मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही पुतीन म्हणाले.