भारत भाग्यविधाता

0
95

रमेश भगवंत वेळुस्कर

आणखी काही दिवसांतच ज्यांच्या मृत्यूला ६५ वर्षे पूर्ण होणार आहेत, आणि अजून ज्यांच्या जीवनावर दरवर्षी विश्‍वात कुठे ना कुठेतरी स्मरणीय पुस्तक/पुस्तके लिहिली जात आहेत, असा एक माणूस या जगात होऊन गेला होता. करुणेचे अरुण बिरुद मिरवणार्‍या महान आत्म्याच्या भूमीवर ज्याने जन्म घेतला, आणि निबिड काळ्या रंगाच्या देशांतील लोकांच्या भूमीत जाऊन त्यांच्यावर आणि आपल्या देशातल्या लोकांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी अटीतटीच्या प्रसंगांतून जाण्याचे अग्निदिव्य करून, तत्कालीन जगातील प्रभावी सम्राटशक्तींना वाकावयास लावणार्‍या ज्या प्रभावी सामान्य माणसाला जग आज महात्माम्हणून ओळखत आहे, त्या माझ्या देशातील या असामान्य व्यक्तीला मी हात जोडून नव्हे तर मन वाकवून नमस्कार करतो, कारण हे माझ्या मातीतले स्मरणीय, नमनीय असे व्यक्तिमत्त्व आहे असे मला मनातून वाटते.

मी या महात्म्याला याचि देही याचि डोळां पाहू शकलो नाही याचे दुःख मला नाही, पण माझ्या सभोवतीच्या वातावरणात अपार्थिव चैतन्याने वावरताना, हसताखिदळताना, लोकांच्या सुखदुःखात मिसळताना त्या जिवंत व्यक्तिमत्त्वाला मला पाहता आले असते तर मात्र मला अपार आनंद झाला असता. तसा आनंद त्यांच्या मनोचित्रणाने मला होतोच आहे. बापू, महात्मा गांधी, राष्ट्रपिता, मोहनदास अशा अनेक नावांनी आज त्यांची ओळख भारताला तसेच जगातल्या इतर देशांना आहे.

आर्नोल्ड टॉयन्बी या ब्रिटिश इतिहासकाराने अत्यंत आदराने या भारतीय करुणारुण अहिंसा प्रवर्तकाचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘‘मोहनदास करमचंद गांधी यांनी रक्तहीन क्रांती करून दोन देशांना रक्तपातापासून वाचवले आहे. ज्यावेळी जगात रक्तपाताची, विश्‍वयुद्धांची भीषण रौद्रनाट्ये खेळली जात होती, त्यावेळी जगाची मानसिकता किती क्रूर आणि पाशवी होती त्याचे दर्शन तर होतच होते; पण स्वतःला खूप विद्वान आणि चिंतक वगैरे समजणार्‍या देशांकडून केल्या जाणार्‍या मानवी हत्यांनी हळहळून जाणारा एक भारतीय माणूस तेव्हा अहिंसेचा उद्घोष करीत आङ्ग्रिकेत तळमळत होता. आपल्या प्रत्येक हालचालीतून, प्रत्येक कृतीतून आणि विचारांच्या प्रत्येक स्पंदनातून अहिंसेचे अनुसरण करीत रक्तलांछित वातावरणात अहिंसेचा हुंकार लोकमनात फुंकत होता. जगाच्या कानाकोपर्‍यांत जाऊन हा करुणेने भारावलेला माणूस तिथल्या लोकांत अहिंसेच्या मायेची उबदार शिंपण करून करुणा रुजू घालीत होता. त्या काळात ज्यांच्या सत्तेवर सूर्य कधीच मावळत नव्हता, त्या ब्रिटिश साम्राज्यालाही रक्तपातातून वाचवणे ही काही आपल्याला वाटू शकते तेवढी साधीसुधी गोष्ट नव्हती. पण याचा एकलव्यीय अभ्यास मोहनदासांनी मोठ्या जिद्दीने केला. ब्रिटिश साम्राज्याला रक्तपातातून वाचवण्याची ही जादू एका काळ्या माणसाने लीलया करून दाखवली आणि सार्‍या जगाचे लक्ष्य आपल्याकडे ओढून घेतले.’’

. एम. ङ्गॉर्स्टर या ब्रिटिश लेखकाला वाटायचे की, महात्मा गांधींना आपल्या शताब्दीची महानतम व्यक्ती मानले जाईल आणि महान इतिहासकार आर्नोल्ड टॉयन्बीना हे प्रत्यक्षात होईलअसा दृढ विश्‍वास होता. डॉ. जे. एच. होम्स तर गांधीजी महात्मा गौतम बुद्धानंतरचे महानतम भारतीय होते, आणि पैगंबर येशू ख्रिस्तानंतरचे महानतम व्यक्तिमत्त्व होतेअसे म्हणून गांधीजींचे आणखीनच ठोस मूल्यांकन करीत होते. गांधीजी केवळ एक महान व्यक्तित्त्वच होते असे नव्हे, तर ते महापुरुष आणि सत्पुरुषही होते. आणि असा योग अत्यंत दुर्लभ असतो, तसेच सर्वसाधारणपणे हे समजून येणेही कठीण असते, असे विसाव्या शतकातील ङ्गिलॉसॉङ्गर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी गांधीजींच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेल्या एका लेखसंकलनाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी लॉर्ड हैलिफॅक्स हे व्हाईसरॉय होते. बर्‍याच वेळा त्यांची गांधीजींशी भेट झाली होती. त्यांच्यात बरीच जवळीक होती असेही सांगतात. ते म्हणायचे की, गांधीजींचे श्रेष्ठ आचरण हेच त्यांचे श्रेष्ठ चरित्र होते. त्यांच्या या गुणांमुळेच आपल्या पिढीच्या लोकांवर त्यांची गहिरी छाप पडली. ङ्गिलिप नोएल बेकर यात आणखी काही गोष्टींचा समावेश करतात. ते म्हणतात की, गांधीजींची महानता त्यांच्या चरित्रातच आहे. पण त्यांच्या कार्याच्या प्रयोजनातली शुद्धता, पावित्र्य आणि आपल्या ध्येयाप्रति असलेली त्यांची निःस्वार्थी समर्पण वृत्ती हेही त्यांच्या महानतेचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत. जगातल्या बर्‍याचशा विद्वानांनी त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्यावर विश्लेषणात्मक असे बरेच काही लिहून ठेवले आहे.

आज जग बापूंना मॅन ऑङ्ग द मिलेनियम’ (सहस्रकाचे व्यक्तिमत्त्व) म्हणून ओळखते. त्यांच्यासाठी महात्मा गांधीजी हे एक जागतिक व्यक्तिमत्त्व आहे. म्हणून तर त्यांना गांधीजी त्यांचेच वाटत आहेत. पण भारतीय त्यांना बापू, महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणून ओळखतात. ते आपल्या देशाचे असूनही सर्व जगाचे पण आहेत, हे एवढे मोठे अवकाश सहजपणे आपल्याला त्यांना देता येत नाही ही आपल्या जाणिवेच्या संवेदनशीलतेतली ङ्गार मोठी कमतरता आहे. बापू ङ्गार मोठे धुरंधर राजकारणी तर होतेच, तसेच ते ङ्गार मोठे संतही होते असे बर्‍याच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय राजकीय पंडितांचे मत तेव्हाही होते आणि आजही आहे.

गांधीजी आपणास कोण समजत होते हे त्यांच्याच शब्दांतून जाणणे महत्त्वाचे. मला वाटते की ‘‘वर्तमान जीवनातून संतहा शब्द वगळूनच घ्यायला हवा. हा शब्द इतका पवित्र आहे की तो असा कुणालाही जोडणे जरासुद्धा उचित नाही. माझ्यासारख्या माणसाला तर नाहीच नाही.’’ जो बस एक सामान्यसा सत्यशोधक होण्याचा दावा करतो, ज्याला आपल्यामधल्या मर्यादांची तसेच त्यातल्या त्रुटींची जाणीव आहे, आणि जेव्हा जेव्हा त्याच्याकडून चुका होत जातात, तेव्हा तेव्हा तो कुठलाही आडपडदा न ठेवता त्या चुका कबूल करतो आणि निःशंकपणे एक गोष्ट मान्य करतो की एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणे जरी तो जीवनातल्या काही शाश्‍वत सत्यांचा प्रयोग करतो पण वैज्ञानिक होण्याचा दावा करीत नाही, कारण त्याच्यापाशी आपल्या प्रयोगांची वैज्ञानिक सत्यता पटवून देणारे कोणतेही प्रमाण नाही.

गांधीजी म्हणतात की त्यांना संत समजण्याची संभावना झालीच तर ती कोसो दूर असेल. ते कुठल्याच आकारात किंवा प्रकारात आपल्याला संत होण्याचा अनुभव करू शकत नाहीत, पण जाणतेअजाणतेपणी चुका झाल्यानंतरसुद्धा ते सत्याची कास धरण्याचा अनुभव मात्र जरूर करतात.

गांधीजींवर धुवांधार आरोप करताना बरेच लोक दिसतात. हे आरोप ऐकल्यावर असे लक्षात येते की बापूंवर आरोप करणारी बरीच माणसे बापूंवर त्यांच्या टीकाकारांनी केलेल्या आरोपांवरच जास्त प्रेम करतात. तसे पाहायला गेलो तर लाखो पृष्ठांच्या ग्रंथातून बापूंनी जितक्या प्रमाणात आपल्याला उघडेनागडे करून ठेवले आहे, तितके जगातल्या आणखी कुठल्याच नेत्याने वा व्यक्तीने केले आहे असे वाटत नाही. या ग्रंथात लक्ष देऊन प्रवास केला तर बर्‍याच प्रश्‍नांची उकल होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूनंतरच्या पासष्ट वर्षांच्या काळात त्यांच्यावर जगभरातून शेकडो ग्रंथ वेगवेगळ्या भाषांतून लिहिले गेले आहेत, तसेच लिहिलेही जात आहेत. त्यातून जग या सहस्रकाच्या महान व्यक्तिमत्त्वाविषयी काय विचार करते आणि काय म्हणते, तेही आपल्या ध्यानात येऊ शकते. पण हे सगळे आपण त्यातून अभ्यासू वृत्तीने सङ्गर केली तरच होण्याची शक्यता आहे. पण आपण आपल्या आरोपांची धुंदी घेऊन हमरीतुमरीवर येऊन मस्त भांडतो तेव्हा एक गोष्ट मनात विचारतरंग उठवू लागते. मग महात्मा गांधीजींच्या सत्याची आठवण जरूर होते. आणि आपला भारत त्या काळी काळाच्या कुठल्या जटिल वस्तुस्थितीच्या गुंत्यातून जात होता तो काळ आठवतो. या पार्श्‍वभूमीवर ब्रिटिश साम्राज्याची शक्ती, ती चालवणारी माणसे, त्यांचा जगावर चाललेला वावर आणि त्याचा जगाला भोगावा लागणारा परिणाम, त्यांचे भारतातले वास्तव्य आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्या आणि त्याचा जनमानसावर होणारा परिणाम, त्यातून विस्ङ्गोटलेला भारतीय लोकमनातला आक्रोश, भारतीयांच्या मनात जागलेला स्वातंत्र्याचा स्ङ्गुल्लिंग आणि या सगळ्यात लोकमनातील भ्रमसंभ्रमांना आपले मार्गदर्शक नेते कशा प्रकारे मार्गदर्शन करीत होते हेही आठवू लागते. या सर्व नेत्यांमध्ये संपूर्ण भारत आपल्या स्वतंत्र डोळ्यांनी आणि स्वतंत्र नजरेने अवलोकन करून, आपल्या पदस्पर्शाने जाणून घेतलेला एकच माणूस होता तो म्हणजे गांधीजी. शिवाय याच एकमेव नेत्यापाशी आपल्या भारतीय तसेच आङ्ग्रिकेतील (देशी आणि विदेशी) लोकांवर होणार्‍या ब्रिटिश साम्राज्याशी अन्यायाचा मुकाबला करण्याचा एकवीस वर्षांचा म्हणजे जवळजवळ तब्बल पावणेतीन तपांचा खडतर, रक्तबंबाळ, गडगंज, विधायक आणि कृतिशील असा अनुभव होता. अन्यायाविरुद्ध आणि स्वातंत्र्याविरुद्ध सत्य आणि अहिंसेच्या बळावर लढण्याचा इतका गाढा अनुभव तत्कालीन इतर कोणत्याच नेत्यापाशी नव्हता. असा हा वेगळ्याच रसायनातून उद्भवलेला भारत भाग्यविधाता होता.

आज जेव्हा बराक ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या कणखर हाती घेतात तेव्हा त्या पदापर्यंत पोचायला पोरवयातच त्यांच्या मनात रिघलेले आणि रुजलेले महात्मा गांधीजी त्यांना आठवतात आणि ते त्यांचे ऋण मान्य करतात. ही गोष्ट आपण ऐकतो तेव्हा बापूंनी या माझ्या देशाला केवढे मोठे विधायक व्यक्तिमत्त्व दिले आहे याची जाणीव होते आणि आपल्याही मनाला एक उभारी येते. पण त्याचबरोबर आजच्या आपल्या बापुडवाण्या नेत्यांना देशाचा विकास सोडाच पण असलेले व्यक्तिमत्त्वही सांभाळता येत नाही हे जाणवते. उलटपक्षी त्याचा र्‍हासच होत जाताना दिसतो आहे असे अनेक लोकांच्या लेखनातून, वक्तव्यांतून ऐकायला मिळते.

जसजसा काळ जातो आहे तसतसा भारत वेगवेगळ्या विचारांनी विभागलेला, दृढअदृढ धारणांनी तुटलेला आहे हे जाणवते. आर्थिक नजरेने बघितले तर काही शहरे सोडली तर इतर ठिकाणी देशाची परिस्थिती अत्यंत खराब आहे हे अनुभवास आल्यावाचून राहत नाही. आज देश रक्ताला चटावलेल्या हिंस्र श्‍वापदासारखा अंदाधुंद होऊन पैशाला चटावलेला दिसतो आहे असे बर्‍याच विद्वान नागरिकांचे मत आहे. देशाची ही नाजूक स्थिती वेळीच सुधारली नाही तर बिकट अवस्था निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी क्षणोक्षणी ङ्गक्त बापूंची आठवण होते. त्यासाठी आज परत एकदा पूर्ण भारत जवळून बघायची गरज आहे. देश ङ्गक्त देश म्हणूनच बघायला हवा. तो कुठल्याही पक्षाच्या चष्म्यातून पाहायची गरज नाही. आपला देश म्हणूनच त्याचे अवलोकन करणे महत्त्वाचे आहे. आणि हे अवलोकन करताना तिथल्या प्रादेशिक लोकांशी संवादही साधला पाहिजे. याच्या आधारे अवलोकन अधिक संवेदनशील तसेच प्रभावशाली होण्याची शक्यता आहे. पण त्याला महात्मा गांधीजींसारख्यांच्या मानवतावादी, व्यापक आणि दूरदृष्टी दृष्टिकोनाची गरज आहे. यातूनच भारतीय विकासाच्या हरवलेल्या गुपितांचा आपल्याला पुनर्लाभ होणार आहे.