Home Featured भारत-पाक युद्धबंदी मध्यस्थीच्या विधानावरून ट्रम्प यांचे घुमजाव

भारत-पाक युद्धबंदी मध्यस्थीच्या विधानावरून ट्रम्प यांचे घुमजाव

0

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावावर युद्धबंदीचा तोडगा काढल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. 10 मे रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद होण्याच्या काही वेळाआधी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाल्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांच्या परस्पर घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारमधील अमेरिकन लष्करातील जवानांना संबोधित करत असताना सदर विधानावरून घुमजाव केले आहे. मी हे नाही म्हणणार की माझ्यामुळेच झाले; पण मागच्या आठवड्यात भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यात माझी मदत झाली, हे खात्रीने सांगतो. मी असे म्हणत नाही की, मी मध्यस्थी केली. मी समस्या सोडवण्यास मदत केली, असे ट्रम्प म्हणाले.

10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेव्हा त्याचे श्रेय स्वतः घेतले. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली. भारत आणि पाकिस्तानने तात्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे हे जाहीर करताना आनंद होत आहे, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले होते; मात्र ट्रम्प यांचा हा दावा भारताने फेटाळून लावला. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान अमेरिकेसोबतच्या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता, असेही भारताने स्पष्ट केले होते.

काल डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, दोन्ही देशात तणाव वाढत चालला होता आणि तुम्ही पाहिले की, वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचा वापर होताना दिसत होता. आम्ही दोन्ही देशांशी व्यापाराबद्दल बोललो. युद्धाऐवजी आपण व्यापार करूया, असे सांगितले. भारत आणि पाकिस्तान दोघांनाही हा प्रस्ताव आवडला. ते दोघेही आनंदी असून त्यांनी हा मार्ग निवडला.

भारत आणि पाकिस्तानमध्ये हजार वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मी फक्त एवढेच म्हणालो की, ही समस्या मी सोडवू शकतो. मी कोणतीही समस्या सोडवू शकतो. मला फक्त सांगा. चला पुन्हा एकत्र येऊया (भारत-पाकिस्तान). आणखी किती वर्ष लढत राहणार? कितीतरी वर्षांपासून त्यांच्यात संघर्ष आहे. मला त्याबद्दल निश्चित माहीत नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.