प्रवासासाठी आज अनेक जण ओला-उबरचा पर्याय निवडतात; मात्र अनेकांना हा पर्याय महाग वाटतो. आता टॅक्सीच्या पर्यायावर अवलंबून असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काल केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भारत टॅक्सीची सेवा अधिकृत लाँच करण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा दिल्ली-एनसीआर आणि गुजरातमध्ये राबवली जाणार आहे.
भारत टॅक्सीच्या सेवेमुळे प्रवासी आणि चालकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. उबर आणि ओलासारख्या दिग्गज कंपन्या खासगी आणि व्हेंचर-बॅक्ड ‘गिग इकॉनॉमी’ मॉडेलवर चालतात. त्या तुलनेत भारत टॅक्सीची रचना पूर्णपणे वेगळी आहे.
भारत टॅक्सी ही ‘सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’द्वारे संचालित असून, ‘मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, 2002’अंतर्गत एक नोंदणीकृत सेवा आहे. ओला आणि उबरमध्ये चालक हे स्वतंत्र कंत्राटदार असतात; परंतु भारत टॅक्सीमध्ये चालकांना ‘सारथी’ म्हटले जाते. ते या सहकारी संस्थेचे सभासद, तसेच सह-मालक आहेत. प्रत्येक ‘सारथी‘कडे संस्थेचे शेअर्स आहेत.
भारत टॅक्सी हे चालकांच्या मालकीचे सहकारी मॉडेल आहे. प्रत्येक चालक हा मालक/भागधारक असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार आणि नफ्यात वाटा मिळतो. तसेच यात प्रति-राईड कमिशन घेतले जात नाही. त्याऐवजी चालक रोजचे एक ठरावीक शुल्क (उदा. 30 रुपये प्रति दिवस) भरतात आणि उरलेली सर्व कमाई स्वतःकडे ठेवतात.
भारत टॅक्सीचे दर
पहिल्या 4 किलोमीटरपर्यंत 30 रुपये.
4 ते 12 किलोमीटर : 23 रुपये प्रति किमी.
12 किलोमीटर नंतर : 18 रुपये प्रति किमी.
इतर शुल्क : 20 रुपये पिकअप चार्ज.
पाच मिनिटांनंतर एक रुपया प्रति मिनिट वेटिंग चार्ज.
ट्रॅफिकच्या वेळी 15 टक्के ‘कन्सेशन सरचार्ज’ लागू शकतो.