भारत – इंग्लंड उपांत्य लढत आज

0
148

गट फेरीत अपराजित कामगिरी केल्यानंतर आज बलाढ्य इंग्लंडविरुद्ध होणार्‍या उपांत्य फेरीत टीम इंडियाला सरस खेळ दाखवावा लागणार आहे. पराजित होणारा संघ महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेबाहेर जाणार असल्याने एखादी चुकदेखील उभय संघांना महागात पडू शकते.

यंदाच्या स्पर्धेत भारत वगळता एकाही संघाला आपले सर्व सामने जिंकणे शक्य झालेले नाही. इंग्लंडला नमविल्यास भारत या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. स्पर्धेच्या मागील सात आवृत्तीत भारताला एकदाही उपांत्य फेरीपलीकडे मजल मारता आलेली नाही. परंतु, यंदा टीम इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे.

विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाला सलामीच्याच लढतीत आरसा दाखवल्यानंतर भारताने मागे वळून पाहिलेले नाही. बांगलादेश, न्यूझीलंड व श्रीलंका यांना नमवून ‘अ’ गटात भारतीय संघ पहिल्या स्थानावर राहिला. भारताचा फॉर्म झंझावाती असला तरी इतिहास भारताच्या बाजूने नाही. टी-ट्वेंटी विश्‍वचषकात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध अजून विजय मिळविता आलेला नाही. २००९, २०१२, २०१४ व २०१६ साली गट फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले आहे. मागील वेळी वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या विश्‍वचषकात भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडने ८ गड्यांनी धक्का दिला होता.

२०१८ साली विश्‍वचषकात झालेल्या पराभवानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. आमचा संघ एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून राहिलेला नाही. सांघिक कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने यंदाच्या स्पर्धेत मुसंडी मारली असून इंग्लंडविरुद्ध देखील सांघिक खेळाच्या जोरावरच संघ विजयी होईल, असा विश्‍वास कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला आहे. पराभूत झालेल्या ‘त्या’ सामन्यातील सात खेळाडू आज खेळणार आहेत. त्यामुळे पराभवाच्या कटू आठवणी मागे टाकून ताजे आनंददायी क्षण निर्माण करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजीचा विचार केल्यास १६ वर्षीय शफाली वर्माचे प्रदर्शन आज महत्त्वाचे असेल. चारही सामन्यात तिने वेगवान खेळ करत पाया रचण्याचे काम केले आहे. इंग्लंडच्या नॅट सिवर (२०३) व हेथर नाईट (१९३) यांच्यानंतर यंदाच्या विश्‍वचषकात सर्वाधिक धावा काढणार्‍यांमध्ये ती १६१ धावांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. अनुभवी जेमिमा रॉड्रिग्सला मोठी खेळी करता आली नसली तरी उपयुक्त धावा जमवून तिने संघाच्या विजयांत योगदान दिले आहे. स्मृती मंधाना व कर्णधार हरमनप्रीत कौर यांची टुकार कामगिरी चिंतेचा विषय आहे. इंग्लंडचा संघ फलंदाजीत नॅट सिवर व हेथर नाईटवर तर गोलंदाजीत ऍन्या श्रबसोल व सोफी एकलस्टन यांच्यावर अवलंबून आहे. आत्तापर्यंत या चौकडीने इंग्लंडच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. बाद फेरीत कामगिरी उंचावण्यासाठी इंग्लंडचा संघ ओळखला जातो. त्यामुळे भारताला आजचा सामना सोपा जाणार नाही.