भारत-आफ्रिका पहिली वनडे आज

0
123

>> पावसाचा व्यत्यय शक्य

>> भुवनेश्‍वर, पंड्या, धवन करणार पुनरागमन

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळविला जाणार आहे. पाहुणा संघ ऑस्ट्रेलियाला ‘व्हाईटवॉश’ देऊन भारतात दाखल झाला आहे तर यजमान संघाला न्यूझीलंडविरुद्ध ‘व्हाईटवॉश’च्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. द. आफ्रिकेचा संघ आपली विजयी दौड कायम राखण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार असून यजमानांना मात्र पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

सलामीवीर शिखर धवन, मध्यमगती गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार व अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. या त्रिकुटामुळे संघ अधिक मजबूत होणार आहे. मयंक अगरवाल, शार्दुल ठाकूर व दुर्देवी मनीष पांडे यांची ‘अंतिम ११’मध्ये ते जागा घेणे अपेक्षित आहे. धरमशाला येथील वातावरण वेगवान गोलंदाजांना पोषक असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया दोन वेगवान, दोन मध्यमगती व दोन फिरकीपटूंसह उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे पृथ्वी शॉला अजून एक संधी मिळाली आहे. त्यामुळे या संधीचे सोने त्याला करावे लागणार आहे. रोहित परतल्यामुळे सलामीवीराची केवळ एकच जागा रिकामी राहणार असल्यामुळे पुनरागमन करत असलेल्या धवनवरदेखील प्रचंड दबाव असेल.

दुसरीकडे द. आफ्रिकेसमोर संघ निवडीची डोकेदुखी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकलेल्या काईल वरेन व जेजे स्मट्‌स यांची संघातील जागा धोक्यात आली आहे. माजी कर्णधार फाफ ड्युप्लेसी व रस्सी वेंडर दुसेन परतल्यामुळे वरेन व स्मट्‌स यांना कोणत्या स्थानावर उतरवावे, हा प्रश्‍न संघ व्यवस्थापनासमोर आहे. तेंबा बवुमा जायबंदी असल्याने यानेमन मलान व स्मट्‌सच्च्या रुपात दुसर्‍या सलामीवीरासाठी दोन पर्याय द. आफ्रिकेकडे आहेत. यातील कोणता पर्याय ते निवडतात हे आज कळेल. अतिरिक्त डावखुरा मध्यमगती गोलंदाज ब्युरन हेंड्रिक्स व डावखुरा अष्टपैलू फिरकीपटू जॉर्ज लिंड या दोघांना खेळविण्याचे झाल्यास प्रमुख फिरकीपटू केशव महाराज याला बाहेर बसविणे भाग आहे.

दीर्घ कालावधीनंतर भारताकडून बुमराह-भुवी ही जोडी एकत्र खेळताना दिसणार असून ही दुकली खेळेलल्या सामन्यांत भारताची कामगिरी ३१ विजय व १० पराभव अशी आहे.

भारत संभाव्य ः शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्‍वर कुमार, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल व जसप्रीत बुमराह.
द. आफ्रिका संभाव्य ः क्विटन डी कॉक, जेजे स्मट्‌स, रस्सी वेंडर दुसेन, फाफ ड्युप्लेसी, हेन्रिक क्लासें, डेव्हिड मिलर, आंदिले फेहलुकवायो, केशव महाराज, ब्युरन हेंड्रिक्स, ऍन्रिक नॉर्के व लुंगी एन्गिडी.