भारत आता दहशतवाद सहन करणार नाही

0
9

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन; राजभवनातील दोन पुतळ्यांचे अनावरण

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल राजभवनात स्थापित आचार्य चरक आणि ऋषी सुश्रुत यांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. यावेळी जगदीप धनखड यांनी भारतीय सैन्य दलांनी राबवलेल्या ‘आपरेशन सिंदूर’वर भाष्य केले. ऑपरेशन सिंदूरने जगाला एक स्पष्ट संदेश दिला आहे की भारत दहशतवाद सहन करणार नाही, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसोझा, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार आणि इतर उपस्थित होते
राज्यपालांच्या समर्पित कार्याचे आणि बोन्साई गार्डन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वामन वृक्ष कला उद्यानासाठी उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. अथर्ववेद हा आरोग्य ज्ञानासाठी सोन्याची खाण मानला जातो. प्राचीन भारतीय औषध प्रणालीत आयुर्वेदाला मुख्य आणि महत्वाचे स्थान आहे. आपल्या प्राचीन वैद्यकीय पद्धतींचा आधार घेऊन नवीन औषधे तयार करण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही उपराष्ट्रपतींनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्यांच्या यात्रेबद्दल माहिती दिली. गोव्याचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गोवा ग्राम संपूर्ण यात्रा, सैमिक दायज यात्रा, व्दिप परिचय यात्रा आणि गोवा गिर्यारोहण यात्रा अशा अनेक यात्रा केल्या असून, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागात भेट देऊन लोकांकडे संपर्क साधला, असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी रिता श्रीधरन पिल्लई, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, राज्यपालांचे सचिव संजीव देसाई उपस्थित होते.