भारतीय सीमांवर चीनकडून रोबोट तैनात

0
3

>> तिबेट व लडाखच्या सीमेवर स्वयंचलित गाड्याही तैनात

सध्या सुरू असणार्‍या कडाक्याच्या थंडीमध्ये चिनी सैनिक तिबेट आणि लडाखच्या सीमांवर तग धरून राहू शकत नाहीत हे ध्यानात आल्यानंतर या उणे तीन तापमानामध्ये आता चीनने भारतीय सीमांवर रोबोट आर्मी तैनात करण्यास सुरुवात केली आहे.

चीनच्या सैनिकांना देशांच्या या सीमांवर उभे राहणे अशक्य आहे. तसेच अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सीमेवरील नियुक्तीला आणि तेथे राहण्याला सैनिकही विरोध करत आहेत. त्यामुळे चीनने भारतीय सीमांवर हे रोबोट तैनात केले असून ते मशीनगन चालवणारे रोबोट असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

चीनने तिबेट आणि लडाखच्या सीमांवर अनेक डझन ऑटोमॅटिक मशीनगन चालवणार्‍या मशीन्स आणि रोबोटप्रमाणे वापरल्या जाणार्‍या स्वयंचलित गाड्या तैनात केल्या आहेत. नुकत्याच भारतीय सेनेसोबत झालेल्या वादामध्ये चिनी सैनिकांना थंडीमुळे मोठी अचडण निर्माण झाली होती. त्याचवेळी चिनी सैनिक हे बर्फाळ प्रदेशामध्ये भारतीय सैन्याचा सामना करण्यासाठी सक्षम नसल्याचेही सिद्ध झाले होते. तेव्हापासूनच या समस्येवर चीनकडून उपाय शोधण्यात येत होता.

चीनच्या पिपल्स लिब्रेशन पार्टी म्हणजेच पीएलएने तिबेटमध्ये तैनात केलेल्या स्वयंचलित ८८ शार्प क्लॉ गाड्यांपैकी ३८ गाड्या लडाखच्या सीमेवरही तैनात करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचा वापर सीमेवर गस्त घालण्याबरोबरच हत्यारे आणि आवश्यक वस्तू सीमेवर पोहचवण्यासाठी केला जातो.

चीनने तिबेटमध्ये ऑटेमॅटिक म्युएल-२०० अनमॅन्ड ह्या गाड्याही तैनात केल्या आहेत. या गाड्या दुर्गम भागामध्ये पहारा देण्यासाठी वापरल्या जातात. या गाड्या अगदी ५० किमीच्या अंतरापर्यंत हल्ला करू शकतात. तसेच एकावेळेस या गाड्यांवरुन २०० किलो वजनाची स्फोटके वाहून नेता येऊ शकतात. सध्या तिबेटमध्ये असाप्रकारच्या १२० गाड्या तैनात असून त्यातील सर्वाधिक गाड्या भारतीय सीमेवर तैनात आहेत.

यापूर्वी चिनी सरकारने सैनिकांसाठी उंच ठिकाणी देशांच्या सीमांवर तैनात असताना सैनिकांना थंडीचा त्रास होऊ नये या उद्देशाने विशिष्ट प्रकारचे सूट देण्यात आले आहेत. समुद्र सपाटीपासून १६ हजार फुटांवर उपकरणं आणि हत्यारे हाताळताना सैनिकांना त्रास होतो. हाच त्रास कमी करण्यासाठी हे विशेष सूट देण्यात आले होते.