Home बातम्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांचे मौलिक स्थान

भारतीय संस्कृतीत स्त्रियांचे मौलिक स्थान

0

– भास्कर वासुदेव जोशी, कारापूर-तिस्क, साखळी.

हल्ली वेगवेगळ्या व्यासपीठांवरून, विशेषतः महिला संमेलनांतून स्त्री स्वातंत्र्यावर चर्चा होते. ‘पूर्वीच्या काळी स्त्रियांना कसलेही स्वातंत्र्य नव्हते. त्यांच्यावर धार्मिक बंधने लादली जात. त्यांना त्यांचे हक्क मिळत नव्हते,’ अशी वक्तव्ये करून शेवटी हिंदू धर्म स्त्रियांच्या विरोधात कसा आहे, धर्माने स्त्रियांना कसे गौण स्थान दिले आहे अशी टीका करण्यात येऊन बुद्धीभेद करण्यात येतो.

वस्तुतः धार्मिक ग्रंथांचा तसेच वेगवेगळ्या स्मृतींचा अभ्यास केला तर, असे आढळून येईल की, स्त्रीला फार उच्च स्थान दिलेले आहे. तिचे अधिकार, तिचे शिक्षण, स्वातंत्र्य, तिची कर्तव्ये, तिचे समाजातील स्थान या सर्वांचाच विचार केलेला आढळतो. अर्थात् काही सामाजिक बंधने जरूर होती, व आहेतही. कारण स्त्री हे धन आहे. सोने आपण जीवापाड जपतो. कारण ते मौल्यवान आहे. त्याचे रक्षण आपण करतो, तसेच भारतीय संस्कृतीत स्त्री मौल्यवान आहे. तिचे जतन व रक्षण केले पाहिजे. म्हणून बाल्यावस्थेत तिचे रक्षण करण्याची जबाबदारी पित्याची, लग्नानंतर पती आणि वृद्धावस्थेत तिचे पुत्र यांच्याकडे स्त्रीच्या रक्षणाची जबाबदारी असते. एकदा स्त्रीची अब्रू गेली की ती परत मिळवता येत नाही. म्हणून काही बंधने जरूर आहेत व जी आजही स्त्रियांनी आकाशाला भरारी मारली असतानाही कायम राखलेली आहेत.

समाजात स्त्रियांना मानाचे स्थान नसते, तर स्त्रीदाक्षिण्य हा शब्दच अस्तित्वात नसता. पूर्वीच्या काळी स्त्रिया सुशिक्षित नव्हत्या. त्यांना शिकण्याचे स्वातंत्र्य होते. तसेच ते गायन, वादन, कला, व्यवसाय इत्यादींच्या बाबतीतही होते. इतकेच नव्हे तर युद्धकलेतही त्या निपुण असत. वक्तृत्व व विद्वत्ता यासाठी अनेक स्त्रिया प्रसिद्ध होत्या. मध्ययुगात (इ. स.६००-१२००) तर इंद्रलेखा, शीला, सुभद्रा अशा अनेक स्त्रिया कवयित्री होऊन गेल्या. गणितासारख्या विषयातही स्त्रियांना गती असे. भास्कराचार्यांनी आपल्या मुलीला गणित विषय शिकवण्याविषयी लिहिले आहे. काही स्त्रिया वैद्यकिय पेशा पत्करीत. आठव्या शतकात ‘रूसा’ नावाच्या हिंदू स्त्रीवैद्याने स्त्रीरोगांवर पुस्तक लिहिले. ते इतके उपयुक्त होते की, त्याचे अरबी भाषेत भाषांतर करण्यात आले. इ.स. तिसर्‍या शतकापर्यंत अविवाहित राहून मुली शिकत असत. पुरूषांप्रमाणे त्यांना स्वतंत्र बौद्धिक व आत्मिक जीवन होते. या जीवनाला आवश्यक असे शिक्षण त्यांना मुलांच्या बरोबरीने मिळत असे. मुलींचे उपनयनही होत असे (पुढे मात्र हे बंद झाले). उपनयनानंतर मुली वैदिक स्तोत्रे, व नित्यनैमित्तिक लागणारी सूत्रे मुखोद्गत करीत. वेदांतील कित्येक सूत्रे स्त्रियांनी लिहिलेली आहेत. सूर्या, जुहू, वाक्, इंद्राणी, श्रद्धा, शचि, समिराज्ञी, रोमशा, लोपामुद्रा, शश्‍वती इत्यादी अनेक स्त्रियांची सूक्ते ऋग्वेदात आहेत. उपनिषदांमध्येही गार्गी, सुलभा, मैत्रेयी, सुवर्चसा, अरूंधती, इत्यादी विद्वान स्त्रिया आढळतात.

तीक्ष्ण बुद्धीची व सदाचारी मुलगी ही कुळाला भूषणच होय, ही विचारसरणी त्या काळी होती, व आजही आहे. पुढे समाजाची बदलती मानसिकता, पाठशाळा व इतर साधनसुविधांचा अभाव, तसेच मोंगल आक्रमणानंतर घरातील मुलींनाच नव्हे तर, विवाहित स्त्रियांनाही घराबाहेर पडणे कठिण झाले. तरीही धर्म-नीती-अनीती, तत्त्वज्ञान, प्राचीन संस्कृती यांचे ज्ञान स्त्रियांना होते. निरक्षर असूनही स्त्रियांनी हिंदू संस्कृतीचे रक्षण केले. याचे श्रेय पुराण, श्रवण, धर्मपालन, संतकवींच्या वचनाचे पठण यासच जाते, असे अनेक विद्वानांचे मत आहे. आजही भारतीय संस्कृती या स्त्रियांनीच टिकवून ठेवली आहे. या सगळ्यांचा विचार करता व पूर्वीच्या काळातील स्त्री व आजच्या पुरोगामी काळातील स्त्री यांची तुलना करता, आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य व हक्क यांचा अतिरेक होऊन कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली असल्याचे, कौटुंबिक स्वास्थ बिघडल्याचे दिसून येते.

आज स्त्री अंग झाकून घेण्यापेक्षा ते उघडे टाकण्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानते. याचे उदाहरण म्हणजे दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी काढण्यात आलेला बेशर्मी मोर्चा. आज चित्रपट, जाहिराती या माध्यमातून स्त्रियांचे जे चित्रण केले जाते ते स्त्रियांना निश्‍चितच भूषणावह नाही. आज पाश्‍चात्य देशांप्रमाणे भारतातही कुमारीमातांचे, लग्नापूर्वी गर्भपाताचे प्रमाण मुंबईसारख्या शहरातून वाढत आहे. मद्यपान, नशीले पदार्थ यांचे सेवन यातही आजच्या मुली आघाडीवर दिसतात. अशा अनेक गोष्टी आहेत, त्याकडे अंगुलीनिर्देश करण्याऐवजी, त्या विरोधात आवाज उठविण्याऐवजी पूर्वीच्या काळावरच बोट ठेवण्यात धन्यता मानली जाते. आज भारतात थोड्याफार प्रमाणात कुटुंब व्यवस्था, कौटुंबिक जीवन जीवंत आहे, ते स्त्रियांच्याच कर्तृत्वाने, मायेने, त्यागाने आणि संस्काराने! पती-पत्नी ही कुटुंब व्यवस्थेची दोन चाके आहेत. त्यातील एकजरी चाक डळमळले तरी ते कुटुंब कोलमडून पडते.

आजपर्यंत जे जे महान पुरूष, शास्त्रज्ञ इत्यादी होऊन गेले, व आजही आहेत, त्यांच्या पाठीमागे स्त्रीच असल्याचे सांगितले गेले आहे, व आजही सांगण्यात येते. मग अशा वेळी स्त्रीने मला स्वातंत्र्य नव्हते, मला महत्व नाही, मला स्थान नाही असे म्हटले तर चालेल का? इथे तिचा पत्नीधर्म श्रेष्ठ ठरतो. नवर्‍याला व मुलाला मिळालेल्या लौकिकामुळे मला ओळखतात, त्यात माझे काय आहे? मला माझी स्वतंत्र ओळख हवी, ही विचारसरणीच घातक आहे. एकमेकांच्या त्यागावरच कुटुंब टिकून राहते. आपले हक्क व स्वातंत्र्य यापेक्षाही कौटुंबिक स्वास्थ्य व प्रगती केव्हाही महत्वाची आहे. कुटुंब, गाव, राज्य आणि राष्ट्र यांचे स्वास्थ्य हे हक्क गाजवून, स्वातंत्र्याचा अतिरेक करून टिकून राहणार नाही. हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा पतीने पतीधर्म, पत्नीने पत्नीधर्म, निरपेक्ष प्रेम व त्याग आचरणात आणला तर मागूनही मिळणार नाही इतके उच्च स्थान कुटुंबात व समाजात मिळते. पूर्वीपासून आतापर्यंत स्त्रीचे महत्व व स्थान लक्षात घेऊनच सर्वात आधी आपल्या मातेला नमस्कार करण्याची आपली परंपरा आणि संस्कृती आहे. तिचे स्थान उच्च आहे, म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये ‘मातृदेवो भव’ असे म्हटले आहे.