डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर आदींचा सहभाग
विज्ञान भारतीचे चौथे भारतीय विज्ञान संमेलन यंदा ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान गोवा शासन व गोवा विद्यापीठाच्या सहयोगाने कला अकादमी संकुलात होणार आहे. व यात ख्यातनाम वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. व्ही. के. सारस्वत, डॉ. जी. माधवन नायर, डॉ. विजय भटकर, डॉ. विजय राघवन अशांचे विचार ऐकण्याची संधी लाभणार आहे.आयोजन समितीचे अध्यक्ष तथा गोवा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. आर. शेट्ये, विज्ञान भारती गोवा विभागाचे अध्यक्ष सुहास गोडसे व राष्ट्रीय आयोजन समितीचे सचिव जयंतराव सहस्त्रबुध्दे यांनी पत्रकार परिषदेत संमेलनाविषयी माहिती दिली. डॉ. शेट्ये यांनी सांगितले की, ‘मानवतेच्या सेवेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नाविन्य’ हा संमेलनाचा मुख्य विषय आहे. विज्ञान, तंत्रज्ञान ही यशस्वितीची किल्ली आहे व ते पारंपरिक ज्ञानाने समृध्द आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याएवढी गुणवत्ता भारतात आहे.
गोडसे यांनी सांगितले की, दर दोन वर्षांनी हे विज्ञान संमेलन व प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी भरविले जाते. भारतीय शास्त्रज्ञांची परंपरा व पूर्वीच्या काळातील देन याची समाजाला ओळख व्हावी विशेषत: विद्यार्थ्यांना त्याचा परिचय करून द्यावा व विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हाही संमेलनाचा उद्देश आहे. विज्ञान भारतीचे सोळा राज्यात विज्ञान विषयक उपक्रम चालतात. डॉ. विजय भटकर विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षणमंत्री, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय अणुशक्ती मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, व आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे संमेलनाचे प्रमुख आश्रयदाते आहेत व त्यांचीही उपस्थिती लाभणार आहे. दिग्गज वैज्ञानिकांबरोबर संवाद साधण्याची संधी यानिमित्ताने विज्ञान क्षेत्रातील गोमंतकीयांना लाभणार आहे.

