– शरद दळवी
(भाग-१)
रहस्य आणि नाट्य हे माणसाच्या आवडीचेच विषय. राजकारणात हे दोन्ही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे राजकारण हा विषय ‘चराचराला व्यापुनि अवघा दशांगुळे उरला’ अशी अवस्था आहे. भारतात तर आपण उठता-बसता राजकारण अक्षरशः तोंडी लावत असतो. पण ते केवळ उपरेपणाने. आणि बोलणारे हे बोलघेवडे आपले त्याविषयीचे कर्तव्य (मतदान वगैरे) मात्र सोयीस्करपणे टाळत असतात.
भारतीय राजकारण तसे अद्याप बाल्यावस्थेतले आहे. कारण ते राणी व्हिक्टोरियाचा अंमल सुरू झाल्यापासूनचे आहे. इंग्रजांच्या ताबेदारीनंतर या खंडप्राय प्रदेशात देश बनण्याची प्रक्रिया सुरू झाली. तोवर तो दोरी नसलेल्या गवताच्या पेंढीसारखा होता (इति नामदेव). वार्या-वावटळीत ती पेंढी विस्कटायची. गवत इकडे तिकडे उडायचे. देश बनण्याच्या प्रक्रियेबरोबरच इंग्रजी शिक्षण, त्यामुळे आधुनिक ज्ञान आणि ज्ञानाबरोबरच येणारा विचार व विवेक भारतात आला आणि भारतात राजकारणाचा स्वतंत्र विचार होऊ लागला. आधुनिक राजकारणाचा विचार साधारण तीन कालखंडांत विभागता येईल.
पहिला कालखंड
हा कालखंड साधारण राणीच्या राज्यापासून ते पहिल्या महायुद्धापर्यंतचा मानता येईल. या काळात नव्या शिक्षणामुळे पोस्ट-रेल्वेसारख्या सुधारणा, वाढलेले दळणवळण व नव्या संकल्पांची ओळख वगैरेंमुळे एक प्रकारे एक सामाजिक त्सुनामीच आली. अस्ताव्यस्त, अर्धनिद्रिस्त समाजाला आत्मभान येऊ लागले. समाज नवनव्या सामाजिक व्यवस्था स्वीकारू लागला. नव्या दिशेने वाटचाल सुरू झाली.
विसाव्या शतकाच्या आरंभी ‘वाघिणीचे दूध’ प्यालेल्या म्हणजे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांना आपल्या गुलामीची बोच लागू लागली. मर्यादित स्वातंत्र्यापासून पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीपर्यंतचा हा कालखंड. ‘स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क आहे’ अशी गर्जना करण्यापर्यंतचा हा काळ म्हणजे टिळकांच्या किंवा लाल, बाल आणि पाल यांच्या नेतृत्वाचा काळ.
टिळकांच्या मृत्यूनंतरचा- स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचा काळ म्हणजे गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढा. हा भारतीय राजकारणाचा दुसरा कालखंड.
सविनय कायदेभंग, असहकार, स्वदेशी व स्वावलंबन अशा शस्त्रांनी गांधींनी हा स्वातंत्र्यलढा लढवला व जिंकला. या सर्व काळात भारतीय राजकारणाची काही वैशिष्ट्ये होती. एक तर टिळक काळात व गांधी काळात लढ्याचे सर्वोच्च नेते आपल्या राजकारणाला नैतिकतेचे किंवा भारतीय अध्यात्माचे अधिष्ठान देऊन होते. म्हणून टिळकांनी इंग्रजांचा शिक्षा देण्याचा अधिकार अमान्य करूनही मिळालेली शिक्षा भोगली किंवा गांधीजींनी अहिंसक चळवळीत हिंसा घडल्यावर लगेच आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
दुसरे म्हणजे दोघेही भारताच्या ‘हरीहर’ संस्कृतीमध्ये पूर्ण उपासक होते. निर्माण आणि संगोपन-संवर्धन म्हणजे हरी व जे वाईट, दोषयुक्त वगैरे असेल त्याचा नाश म्हणजे हर. या संस्कृतीचे सोदाहरण धडा देणारे भारतीय म्हणजे श्रीकृष्ण. यादवांचा- स्वकुळाचा नाश करवणारा श्रीकृष्ण आणि उपयुक्तता किंवा मूळ (स्वातंत्र्यप्राप्तीचा) उद्देश संपल्यावर आता कॉंग्रेसचा विलय अथवा विसर्जन करावे असा सल्ला देणारे महात्मा गांधी हे होत. अर्थात हा सल्ला त्यांनी विवेकी विचाराने दिला होता. कारण कॉंग्रेसचे ते चार आण्याचे साधे सभासददेखील नसले तरी कॉंग्रेस ही आवळ्या-भोपळ्याची मोट आहे व स्वातंत्र्यप्राप्तीच्या गाठीने ती एकत्र आहे हे ते ओळखून होते.
भारतीय कॉंग्रेस
‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ असे घेडगुजरी नाव (देशी व इंग्रजी) धारण करणारी संगठना भाषा, संस्कृती, भूषा, विचार, आचार वगैरे सर्व बाबतीत वैविध्यपूर्ण तर होतीच, पण राजकीय विचारधारादेखील (ज्या पाश्चात्त्यांकडूनच उसनवार घेतल्या होत्या. कारण इथे राजेशाहीच होत्या व ‘ना विष्णु पृथ्वीपति’ हा एकच राजकीय विचार होता. गणतंत्रे अपवादाने असली तरी ती लोकशाही नव्हती.) पाश्चात्त्यांचे उसने वाण होते. स्वतः नेत्यांनादेखील ती पचवून स्वतःच्या अनुभवावर पारखून घेता आली नव्हती.
कॉंग्रेसमध्ये वेगवेगळ्या विचारधारा होत्या, ज्या काळ व प्रसंगपरत्वे कॉंग्रेसपासून फुटत गेल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉंग्रेसला एकत्र ठेवणारा दुवा होता स्वातंत्र्यलढा, तर स्वातंत्र्योत्तर काळात हा दुवा आहे सत्ता-पिपासूपणाचा. जन-सेवा, राष्ट्रभक्ती, लोककल्याण हे फक्त ‘मुँह में राम’ एवढ्यापुरतेच आहे.
महात्माजींसारख्या लोककल्याणाचा वसा घेतलेल्या मुरब्बी व देशभक्त राजकारण्याने म्हणूनच कॉंग्रेस विसर्जनाचा सल्ला दिला होता. पण….
जपूया असा वारसा
दुसर्या महायुद्धाने आलेली दिवाळखोरी, जागतिक लोकमताचे दडपण, स्वातंत्र्यलढ्याचा वाढता दबाव, सैन्याच्या निष्ठेविषयी शंका (आझाद हिंद फौज) वगैरे अनेक कारणांनी इंग्रजांनी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी भारताच्या क्षमतेविषयी शंका व भय असलेलेल्या पाश्चात्त्यांनी (इंग्रज) द्विराष्ट्रवादाच्या (परस्पर शत्रुत्वाच्या) बेड्या भारताच्या पायांत अडकवल्या आणि ते गेले.
इंग्रजांनी ‘फोडा आणि झोडा’ हेच सूत्र वापरून उणीपुरी दीडशे वर्षे भारताला गुलामीत ठेवले. स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय नेतृत्व आणि समाजमनाची राजकीय भूमिका काय व कशी होती?
स्वातंत्र्यपूर्व काळात ‘एकच तारा (स्वातंत्र्य) समोर, आणिक पायतळी अंगार’ अशी स्थिती होती. पण स्वातंत्र्य मिळाले तरी ते टिकवण्यासाठी काय व कसे करावे याचे स्पष्ट चित्र नेत्यांपुढे नव्हते. आणि पायतळी अंगार तर मुळीच नको होता. व्यक्तिगत वृत्ती-प्रवृत्ती व संस्काराप्रमाणे त्यांचे सामाजिक व राजकीय दृष्टिकोन होते. (अजूनही आहेत.) कोणी समाजवादी, कुणी फार उजवे, कुणी मधले वगैरे असे होते. पण ते सत्ताकेंद्राशी चिकटून होते. कधी गेले तरी परत सत्तेच्या सावलीला आले. राजकारणात ‘आयाराम-गयाराम’ संस्कृती उदयाला आली.
इंग्रजांनी आम्हाला सत्ता टिकवण्याचा महामंत्र दिला होता. त्याचा मुक्त वापर सत्ता टिकवायला स्वदेशी सरकारांनी केला. मग ती सरकारे केंद्रातील असोत की राज्यातील, अखिल भारतीय पक्षांची असोत की प्रादेशिक; भारतीय राजकारणाचे एकमेव ध्येय झाले सत्ता मिळवणे आणि टिकवणे. सत्ताधार्यांनी तेच धोरण पुढे चालविले. यावर डॉ. राममनोहर लोहियांचे ‘सत्ताधार्यांची दोन हत्यारे- भाषा आणि जाति’ हे पुस्तक जिज्ञासूंनी पाहावे.
भारताचा इंग्रजी (व माजी राजेशाही) सत्तेकडून मिळालेला वारसा म्हणजे दुही करणे व वाढवणे, तसचे लांगूलचालन, चहाडखोरी आणि भ्रष्टाचार. इंग्रजांना सत्ता टिकवण्यासाठी या गोष्टींची गरज होती. पण स्वदेशी शासकांनी काय केलं?
तिसरा कालखंड- गणतंत्र
भारतीय राजकारणाचा तिसरा कालखंड म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळ. याचे काही वेगवेगळ्या कालखंडात विचार करण्याचे कारण नाही. कारण साठ वर्षांच्या या कालखंडात कॉंग्रेस आणि तत्सम/तद्भव लोकांची सत्ता राहिली.
या काळात काय काय झाले? भारतीय राजकारण कितपत विचारी, विवेकी किंवा प्रगल्भ झाले? या काळाची वैशिष्ट्ये कोणती? याची उत्तरे मनाला अस्वस्थ व विषण्ण करणारी आहेत.
या काळात राजकारण एकपक्षीय राहिले. ते म्हणजे कॉंग्रेसपक्षीय. त्याच अनुषंगाने ते फिरत राहिले. यासंदर्भात बोलताना स्वतंत्र पक्षाचे वजनदार (सर्वार्थाने) खासदार स्व. पीलू मोदी म्हणाले होते, ‘‘आमच्या इथे दोनच प्रकारचे सांसद (राजकारणी) आहेत. काही पुढून बोलणारे, काही मागून.’’ अशा बोलण्यावर खूप आरडाओरडा झाला. पण भुंकणे किंवा शेपूट हलवण्याचा उल्लेख नसल्याने कुणी काही करू शकले नाही. आज यात कितीसा फरक पडला आहे?
या काळात राजकारणात ‘राजकारणाला वैचारिक अधिष्ठान व विवेक’ यांचा संबंध हळूहळू सुटत गेला. मग लोभ आणि स्वार्थासाठी सत्तेची प्राप्ती एवढाच विचार बलिष्ठ झाला.
युग समाप्ती
गांधी गेले, गांधीयुग संपले. गांधींना गोडसेंनी वैचारिक कट्टरतेपायी मारले. पण त्यांचा आत्मा मात्र त्यांच्या अनुयायांनीच मारला. गांधींचे राजकारण समाजकारण व संस्कृतीकरणाला पुढे घेऊन जाणारे होते. जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य होते. जसा एकदम काही करण्याचा अट्टाहास नव्हता तसाच जनमानस बदलण्याचा हळूहळू पण डोळस यत्न होता. पण त्यामागे फक्त हट्टाग्रह नव्हता. एकांगीपणा नव्हता.
गांधींच्या अनुयायांनी त्यांच्या वारशाची वाटणी केली. नेहरू व त्यांच्या सहकार्यांनी राजकीय वारसा घेतला, तर विनोबा, जयप्रकाश यांनी समाजकारणाचा (सामाजिक परिवर्तनाचा) वारसा स्वीकारला. एक रुपया मध्ये उभा फोडून छाप व काटा वेगळा केल्यावर त्याची किंमत एक पैसादेखील ऊरू नये तशी अवस्था झाली. त्यांचा आत्मा (गांधीवाद) संपला.
सुदैवाने महात्माजी जिवंत नव्हते. त्यांच्या म्हणण्यासारखे शंभर वर्षे जगले असते तर… साने गुरुजींप्रमाणे त्यांनाही स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याचा अंत करून घ्यावा लागला असता. कदाचित त्यापेक्षा त्यांना याही सत्तेविरुद्ध नवा लढा उभारून लढा द्यावा लागला असता. गांधींच्या नंतर राजकारणातून भारतीय अध्यात्म म्हणा, हरीहर संस्कृती म्हणा किंवा नैतिकता गायब झाली. मग ते राजकारण किंवा नेते कसे होते?
साठच्या दशकाच्या सुमारास एक कथा प्रचलित होती. एका ग्रामीण भागातील शिक्षकाने एका उनाड पण हुशार विद्यार्थ्याला समजावण्याचा प्रयत्न केला व विद्यार्थ्याला काळजीपोटी विचारले, ‘‘अरेऽ तू शिकला नाहीस, पुढे तू करणार तरी काय?’’
‘‘पुढारी होणार,’’ त्या पोराने लगेच उत्तर दिले. आज तरी यापेक्षा वेगळे काय घडतेय? अभ्यासू, विचारी आणि विवेकी नेतृत्व फक्त अपवादात्मकच आढळते.
नेतृत्व आणि राजकारण
वरील दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. नेतृत्व असभ्य, अविवेकी व असंस्कृत असते, त्यांना विचार व विवेक नसतो तेव्हा राजकारणाचे गटार बनते. ते कोते, स्वार्थी व एकांगी होते. अभ्यासू व सेवेतून वर आलेले नेते असे कोते व स्वार्थी बनू शकत नाही, निदान पूर्णांशाने तरी. तसे कौटिल्याने सांगितल्याप्रमाणे राजकारण क्रूर असतेच, पण अशा नेत्यांमुळे ते क्रौर्य खूप कमी होऊ शकते.
स्वातंत्र्यानंतरचे लगेच राजकारणाचे नेतृत्व करणारे शासनाच्या संदर्भात अननुभवी व अपक्व होते. वेगवेगळ्या प्रश्नांच्या बाबतीत विशेष अभ्यास नसल्याने अदूरदर्शी किंवा आंधळे आदर्शवादी होते. त्या वेळच्या भूतकालीन घटना घडून गेल्या. ती माणसे संपून गेली. पण परिणाम…? ते मात्र आपण आजही भोगतो आहोत व पुढे भविष्यात किती काळ भोगू कोण जाणे! काश्मीर, तिबेट, चीन संबंध वगैरे अनेक घटना याची उदाहणे आहेत.
भारतीय जनमानस विभूतिपूजक आहे. त्यांची मूळ वृत्तीच ‘राजा बोले दल हाले’ किंवा ‘एक चालकानुवर्तते’ अशी आहे. त्यामुळे भारतीय समाजाला नेता निवडण्यातच अनेक निर्बंध येतात. नेता आपण त्याचे नेतृत्वगुणांचे निकष सोडून अन्य निकषांवर निवडतो. अगदी नेहरूंपासून राहूल गांधीपर्यंत हीच परंपरा आहे. एक तर यामुळे नेत्यांबरोबर भुत्यांचे फावते व दुसरे म्हणजे योग्य तसे नेतृत्व पावसाळी छत्र्यांसारखे थोडेच उगवते? त्यासाठी अनेक घटकांची गरज असते. त्यामुळे अयोग्य लोक नेते बनतात.
विभूतिपूजेमुळे भारतीय जनतेनेदेखील नेतृत्व स्वीकारताना तर-तम भाव वापरला नव्हता. कारण तसा विवेक वापरण्याविषयीचा कसलाही अनुभव वा अभ्यास भारतीयांपाशी नव्हता. पाश्चात्त्य लोकशाही- मग ती ब्रिटिश असो की फ्रेंच- खूप बलिदान, शतकांचे लढे किंवा जनआंदोलनाचे फलित होते.
भारतीय स्वातंत्र्य हे विशिष्ट जागतिक परिस्थितीमुळे काहीसे अचानक पदरी पडले होते. त्यामुळे नेते व जनता यांना तसे आकस्मिकपणे स्वातंत्र्य व त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांना सामोरे जावे लागले.
भारतीय नेतृत्व
स्वातंत्र्योत्तर लगेच आलेले भारतीय नेतृत्व कसे होते? बहुतांश नेतृत्व अव्यवहारी, अननुभवी, स्वप्नाळू, पढिक पंडित, आदर्शवादी वगैरे प्रकारात मोडणारे होते. पंडित नेहरू हे त्यांचे मुकुटमणी. ते कविमनाचे, आदर्शवादी विचारांचे व शून्य अनुभव असलेले सद्गृहस्त होते. देशाविषयी भक्ती, देशबांधवांविषयी अपार आत्मीयता आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ या त्यांच्या भक्कम जमेच्या बाजू. ते व जनता यांचे परस्परांवरील अपार व सच्चे प्रेम पाहूनच म. गांधींनी त्यांच्या बाजूने कौल दिला असावा. पण…
रामायणात, महाभारतातच नव्हे तर राजकारणातही हे असे ‘पण’ भयंकर उत्पात घडवू शकतात. पंडितजी भारतीय असूनही तसे भारतीय नव्हते. कारण त्यांना भारतीय जनमानसाची, सांस्कृतिक संचितांची, त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक जडणघडणीची व त्यामुळे निर्माण झालेल्या गुणदोषांची कल्पना नव्हती. पुरेशी कल्पना तर निश्चित नव्हती. त्या मानाने पटेल-शास्त्री अधिक जमिनीवर होते. त्याचे कारण म्हणजे, पंडितजींचे बालपणापासूनचे सारे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. कोवळ्या वयातले सारे संस्कार परदेशी व परकी होते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अनुभव तसा तोकडाच होता. मार्गदर्शक महात्माजी होते, तर तुरुंग तसे पंचतारांकित होते. त्यांना कधी अंदमान किंवा येरवड्याचा अंतर्भाग पाहावा लागला नाही. त्यांच्याकडे समाजवादी विचारसरणी होती, पण ती युरोपात युटोपीयन सोशलिझम म्हणतात त्या स्वप्नरंजनात्म समाजवादाच्या जातीची. कोणत्याही सामाजिक, राजकीय धारणा स्वयंभू किंवा व्यावहारिक अनुभवांवर आधारित अशा नव्हत्या.
पंडितजींकडे राजकीय इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीही पक्की नव्हती. त्यामुळे त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे वाईटच परिणाम देशाला भोगावे लागले आहेत. यासाठी काश्मीर प्रश्न, भारत-चीन संबंध, अल्पसंख्याकांचे विशेषाधिकार अथवा आरक्षणासारख्या राष्ट्रीय किंवा सामाजिक एकात्मतेत मारलेल्या पाचरी, धर्म (किंवा योग्य म्हणजे उपासनापंथ) व संस्कृती यांत केलेली घटनेतील गल्लत अशी अनेक उदाहरणे यासाठी देता येतील.
सत्कार्यांतदेखील ठामपणा न दाखवल्याने सारे प्रश्नच अर्धवट राहिले किंवा त्यांचा विचका झाला. त्यामुळेच त्यांनी निर्माण केलेले ‘गणराज्य’ गणंग राज्य बनण्याच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू लागले. साधा देशाच्या योजनांचा विचार केला तर काय दिसते? केंद्र वा राज्याच्या योजनाखर्चाचा अधिकांश किंवा बहुतेक भाग वर्षाअखेरच्या एकदोन महिन्यांतच खर्च होतो. का? त्याचा परिणाम किती व कसा आहे? याविषयी सांगण्याची गरजच नाही. त्या योजनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या कधीही दीर्घकालीन नव्हत्या. त्या कालबद्ध रीतीने व ठामपणे आजवर कधीही राबवण्यात आल्या नाहीत. याविषयी देशाचा विचार साकल्याने कधीच झाला नाही. त्या समतोल व सर्वंकषही नव्हत्या.
या सार्यांचे फलित काय?
विकासाला खर्च झाला, पण दिशा व भरीव आकार आला नाही. ‘इदंच नास्ति, परंच न लभ्यते’ असे झाले. तर लाभार्थींची अवस्था ‘धोबी का कुत्ता न घर का न घाट का’ अशी झाली. धरसोड वृत्ती, दफ्तर दिरंगाई, भ्रष्टाचार वगैरे मात्र फोफावले. नेहरूंच्यामुळे व्यक्तीपूजक भारताला उत्सवमूर्ती मिळाली, पण राजकारण व्यक्तिपरक व व्यक्तिकेंद्रित असेच राहिले. भारतीय जनतेला राजकीयदृष्ट्या ‘शहाणे’ होणारे लोकशिक्षण तेव्हापासून आजतागायत मिळाले नाही व राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नेतृत्वनिर्मितीची प्रक्रियाच बंद झाली.
इंदिरा गांधी युग
इंदिराजींची वृत्ती-प्रवृत्ती, स्वभावधर्म वगैरे वेगळे असल्यामुळे त्यांचे राजकारण पंडितजींच्यापेक्षा वेगळे व धडाकेबाज होते. एका दृष्टीने त्या वडिलांपेक्षा अधिक अनुभवी व प्रशिक्षित राजकारणी होत्या. स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी, सोळा वर्षे राजकारणी व सर्वोच्च लोकप्रिय असलेल्या पित्याच्या दैनंदिन कामाचे अवलोकन, देशोदेशीच्या नेतृत्वाचे निरीक्षण व परीक्षण इत्यादींचा भरघोस वारसा त्यांना मिळाला होता. विचक्षण बुद्धी आणि समस्येचं अचूक आकलन करण्याची शक्ती नैसर्गिकपणे होती. योग्य वेळ साधण्याचा संयम आणि वेळ येताच तडफेने निर्णय घेण्याची व तो अंमलात आणण्याची इच्छाशक्ती व साहस त्यांच्यात होते.

