भारतीय नागरिक स्मार्टफोनच्या आहारी

0
11

आजच्या घडीला अगदी छोट्या मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच लोक स्मार्टफोनच्या आहारी गेले आहेत, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. तरुण-तरुणी तर कधीही पाहा ते स्मार्टफोनमध्येच गुंतलेले असतात; पण लोकांचे स्मार्टफोनमध्ये गुतलेले प्रमाण नेमके किती आहे, याची आकडेवारी समोर आली आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी)ने याबाबत एक सर्व्हे केला आहे. ज्याची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. या अहवालानुसार, भारतातील 84 टक्के लोक सकाळी उठल्या उठल्या 15 मिनिटांच्या आत आपला स्मार्टफोन तपासतात. तसेच दिवसभरातला 31 टक्के वेळ लोक स्मार्टफोनवर घालवतात आणि दिवसांतून सरासरी 80 वेळी लोक आपला मोबाईल तपासतात.

या अहवालानुसार बहुतांश लोक स्मार्टफोनवर 50 टक्के वेळ स्ट्रिमिंग कंटेटवर घालवतात. स्मार्टफोनवर घालविण्यात येणाऱ्या वेळेतही वाढ झाल्याची आकडेवारी अहवालातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 2010 साली सरासरी दोन तास स्मार्टफोनवर घालवले होते, त्यात वाढ होऊन आता 4.9 तासांचा वेळ स्मार्टफोनवर घालवला जातो.
विशेष म्हणजे 2010 साली मोबाईलवर बोलणे किंवा मजकूराच्या रुपातील संदेश पाठविण्यासाठी 100 टक्के वेळ वापरला जात होता; मात्र 2023 मध्ये बोलणे आणि मेसेज करणे यासाठी फक्त 20-25 टक्के वेळ वापरला जातो. या अहवालात असेही दिसून आले की, दोनपैकी एक वेळा गरज नसताना लोक सवयीमुळे त्यांचा फोन उचलून पाहत असतात.