– प्रशांत वेरेकर
जगात अस्तित्वात असलेल्या अनेक क्रीडाप्रकारांमधील क्रिकेट या खेळालाच ‘जंटलमॅन्स गेम’ म्हटले जाते. ‘क्रिकेट इज ए ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनटिज’ असे वर्णनही या खेळाविषयी केले जाते. कदाचित जगात क्रिकेटपेक्षाही अधिक लोकप्रिय असलेल्या फुटबॉल खेळात प्रत्यक्ष मैदानावर दिसणारी खेळाडूंमधील भांडणे किंवा धसमुसळेपणा क्रिकेट मैदानावर दिसत नसल्यामुळे क्रिकेटला ‘जंटलमॅन्स गेम’ म्हटले जात असावे. पण म्हणून आज क्रिकेटला जंटलमॅन्स गेम म्हणता येईल काय? ‘मुळीच नाही!’ असे उत्तर या प्रश्नावर द्यावे लागेल.
‘क्रिकेट इज ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनटिज’ असे म्हणावे अशी स्थितीही या खेळाची राहिलेली नाही. एका पाठोपाठ एक अशा सातत्यपूर्ण धक्कादायक मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग प्रकरणांमुळे हा खेळ बदनाम होऊ लागला आहे. आयपीएल तथा इंडियन प्रिमिअर लिग या भारतातील स्पर्धेमुळे हा वैभवशाली खेळ कलंकित झाला आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
दक्षिण आफ्रिकेचा हॅन्सी क्रोनिए झाला, भारताचे महंमद अझरुद्दिन, अजय जडेजा, मनोज प्रभाकर, तसेच सलमान बट्ट, महंमद आमीर, महंमद आसिफ हे पाकिस्तानचे खेळाडूही बदनाम होऊन गेले. अझरुद्दिनवर आजीवन बंदी घातली गेली. प्रभाकर, जडेजा यांची कारकीर्दही कधीच विस्मरणात गेली. तरीही क्रिकेट खेळाचा लोकाश्रय कमी झाला नाही. एवढेच नव्हे तर अझरुद्दिनसारखा खेळाडू भारतीय संसदेवर खासदार म्हणून निवडूनही गेला. ‘जनस्मृती विस्मरणशील असते’ या उक्तीचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. खेळातील भ्रष्टाचारामुळे कलंकित झालेल्या अझरुद्दिनला त्याच्या राज्यातील लोकांनीच पुन्हा प्रतिष्ठा दिली. त्याआधी त्याला एका राजकीय पक्षाने तिकीट देऊन प्रतिष्ठा दिली. अजय जडेजाही पुन्हा एकदा टीव्ही चॅनेल्सवर समालोचक म्हणा किंवा तज्ज्ञ म्हणून झळकत आहे. महंमद आमीर आणि महंमद आसिफ हेही बंदी कालावधी संपवून पुन्हा मैदानात उतरतील.
या सर्व पार्श्वभूमीवर ताज्या आयपीएल स्पर्धेने या आधीच्या स्पॉट फिक्सिंग किंवा मॅच फिक्सिंगच्या प्रकरणांवर कळसच चढविला आहे असे म्हणावे लागेल. कारण जगातील सर्वांत धनदांडगी म्हणून संबोधल्या जाणार्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तथा बीसीसीआय या संघटनेचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यापर्यंत या फिक्सिंग प्रकरणाचे धागेदोरे पोचले आहेत.
सध्या चालू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स संघाचे तीन खेळाडू गेल्या १६ मे रोजी पोलिसांच्या जाळ्यात स्पॉट फिक्सिंगमुळे सापडले. त्यातूनच विंदू दारासिंग यालाही अटक झाली आणि त्याच्याकडून या प्रकरणात चेन्नई सुपर किंग्स या संघाचा सीईओ गुरुनाथ मेयप्पन हाही गुंतला असल्याची माहिती मिळाली. हा मेयप्पन बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई आहे; आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हेच श्रीनिवासन चेन्नई सुपर किंग्सचे मालक आहेत. आता बोला!
सध्याच्या आयपीएलमधील किमान १५ सामन्यांत स्पॉट फिक्सिंग झाल्याची चर्चा आहे. यांपैकी किमान चार सामने फिक्स झाल्याचे पोलिसांनी जवळजवळ सिद्ध केले आहे. अटक झालेल्या खेळाडूंनी कबुलीही दिली आहे. अटक झालेल्या खेळाडूंपैकी श्रीसंत हा भारतीय संघाचा कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. आणि अजित चंडिला व अंकित चव्हाण हे रणजीपटू आहेत. यांपैकी श्रीसंतच्या कर्तृत्वाची एकाहून एक रसभरित वर्णने जगजाहीर होऊ लागली आहेत. ५, ९, १२ व १५ मे रोजीचे सामने या खेळाडूंनी फिक्स केले. १७ मेचा सामनाही ते फिक्स करणार होते; मात्र त्याआधीच १६ रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केल्याने हे सत्र थांबले.
यंदाच्या आयपीएलमधील या त्रिकुटाच्या महान ‘कर्तृत्वा’मुळे हेही स्पष्ट झाले आहे की गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्येही सामने फिक्स झाले होते. अजित चंडिला याने गेल्या वर्षीही अशाच प्रकारे १२ लाख रुपये कमावल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दोन्ही आयपीएल स्पर्धांमधून चंडिलाने किमान ६१ लाख रुपयांची कमाई (फिक्सिंगमधून) केली असल्याचा पोलिसांचा दावा आहे. चंडिलाच्या ‘कर्तृत्वाचे’ आणखी एक वैशिष्ट्य हे की, त्याचा वेगवेगळ्या बुकींच्या गटांशी संबंध आहे. एका सामन्यात फिक्स झालेल्या षटकाच्या आधी चंडिला मैदानावरून सांकेतिक खूण करण्यास विसरल्यामुळे त्याला मिळालेले २० लाख रुपये परत करावे लागले.
सट्टेबाजी करणार्या बुकींशी थेट संबंध असलेल्या विंदू दारासिंग याला एका महिन्यात १३० फोन कॉल्स चेन्नई सुपर किंग्सचा सीईओ गुरुनाथ मेयप्पन याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आणि मेयप्पन या संघाचा २००९ पासून सीईओ आहे. यावरून गेल्या वर्षीच नव्हे तर त्याआधीच्या आयपीएलमध्येही असे कारनामे झाल्याचा संशय आहे. यावरून क्रिकेटप्रेमींचा विश्वासघात करण्याचे हे षड्यंत्र किती भयावह आहे हे स्पष्ट झाले आहे. अर्थातच या सर्व प्रकरणाचे खापर केवळ खेळाडूंवर फोडून चालणार नाही. कारण या क्षेत्रातील धुरीणांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्याविना हे चालू शकेल असे समजणे चुकीचे ठरेल. भारतीय क्रिकेटची पालक संस्था असलेल्या बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या मालकीचा संघ आयपीएलमध्ये सहभागी असणे हे कोणत्या नैतिकतेत बसते हाही एक मोठा प्रश्न आहे. नेहमीच भ्रष्टाचाराविरोधात तावातावाने बाता करणारे भाजपचे नेते अरुण जेटली बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीचेही सदस्य आहेत. ते या फिक्सिंग प्रकरणाबद्दल अद्याप चकार शब्द बोललेले नाहीत. गेल्या गुरुवारी भाजपच्या एका पत्रकार परिषदेवेळी जेटलीसाहेबांना पत्रकारांनी याविषयी छेडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतेच भाष्य केले नाही. तर तेथेच असलेल्या भाजपच्या एक पंतप्रधानपदाच्या उमेदवार मानल्या जाणार्या सुषमा स्वराज यांनी ‘ही पत्रकार परिषद आयपीएलची नसून भाजपची आहे’ असे पत्रकारांना सुनावले. हा प्रकार म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे असाच नाही का?
कॉंग्रेसचे नेते राजीव शुक्ला हे आयपीएलचे बॉस आहेत. त्यांनीही बराच काळ या प्रश्नावर प्रसारमाध्यमांसमोर येण्याचे टाळले. जेव्हा पत्रकारांनी छेडले त्यावेळी त्यांनी आडन्यायाची उत्तरे दिली. जेव्हा श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंडिला यांना अटक झाली त्यावेळी श्रीनिवासन यांनी ‘तीन खेळाडू कुजके ठरले म्हणून सगळी स्पर्धाच कुजलेली आहे असे म्हणता येणार नाही’ असे वक्तव्य केले होते; मात्र आपल्या जावयाचा संबंध फिक्सिंग प्रकरणात असल्याच्या बातम्या पसरल्यानंतर हेच श्रीनिवासन माध्यमांच्या संपर्काबाहेर झाले. राजीव शुक्ला यांनी ‘संसदेतील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत म्हणून संसदच बंद करावी असे आहे का’ असाही प्रश्न विचारला आहे. यावरून या लोकांची मानसिकता उघड झाली आहे. स्वतः क्रिकेटपटू असलेला खासदार नवज्योत सिद्धू यानेही अशीच मुक्ताफळे उधळली हे अधिक धक्कादायक आहे.
मात्र भारताचे माजी कसोटीपटू असलेल्या खासदार कीर्ती आझाद यांनी या सर्व प्रकरणाची कठोर शब्दांत निर्भर्त्सना केली आहे. श्रीनिवासन, राजीव शुक्ला, अरुण जेटली यांच्या राजीनाम्यांची मागणी त्यांनी केली आहे. असे असताना भारतीय क्रिकेटमधील काही दिग्गज जणू काही घडलेच नाही किंवा कोणतेच सोयरसुतक नसल्याच्या आविर्भावात वावरत आहेत. आयपीएलमध्ये हे समालोचक किंवा एक्स्पर्ट म्हणून काम करीत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये विक्रम नावावर असूनही, दर्जाहीन अशा या स्पर्धेत केवळ धनलोभी वृत्तीमुळेच दर्जाहीन खेळाडूंच्या खेळाची वर्णने हे दिग्गज करीत आहेत. आयपीएल नावाच्या गटारगंगेत हात धुऊन घेण्याचाच हा प्रकार आहे असे कोणी म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. फिक्सिंगच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाल्यानंतर या दिग्गजांनी या स्पर्धेतून बाहेर पडायला हवे होते अशीच सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींची भावना आहे.
गेल्या सुमारे १५ वर्षांच्या काळात फिक्सिंगचे प्रकार अधूनमधून उघडकीस येत आहेत. असे असूनही भारतातील क्रिकेटची पालक संस्था असलेल्या बीसीसीआयने कोणतीच गंभीर भूमिका घेतलेली नाही. त्यामुळेच क्रिकेटप्रेमींची फसवणूक होण्याचे, विश्वासघात करण्याचे, त्यांना मूर्ख बनविण्याचे हे निंद्य प्रकार चालू राहिले आहेत. विद्यमान आयपीएल स्पर्धेत असेल किंवा त्याआधीच्या आयपीएल स्पर्धेत फिक्सिंग झाले आहे हे ताज्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.
न्यायालयात या विषयीच्या तपासकामाचे पुरावे कितपत टिकाव धरतात किंवा संशयित आरोपी दोषी किंवा निर्दोष ठरतील हा मुद्दा गौण आहे. कारण या सर्व गोष्टी सिद्ध करणे याविषयी अस्तित्वात असलेल्या कायद्यांमुळे तसे सोपे नाही. एक गोष्ट नक्की आहे की आयपीएलमुळे भारतीय क्रिकेट क्षेत्र कलंकित बनले आहे, खेळाडू लोभी बनले आहेत, खेळाडूंमधील चंगळवादाला चालना मिळाली आहे, त्याला प्रतिष्ठा मिळाली आहे. या सर्व गोष्टी क्रिकेटला मारक आहेत.