– प्राचार्य गोपाळराव मयेकर
भारतीय तत्त्वज्ञानामध्ये तत्त्वज्ञान हे केवळ बुद्धिसंगत, एखादा विचार पटवून देण्यासाठी असत नाही. तत्त्वज्ञानाची व्याख्याच अशी आहे मुळी की आपल्या भोवतालचं जगत, मी स्वतः, माझा जीव आणि हे ज्याने कुणी निर्माण केले असेल तो परमेश्वर, यांची परस्परांची नाती काय, त्यांचं स्वरूप काय आणि हे तपासत, बुद्धिसंगत रीतीने ज्यावेळी एखादा ग्रंथ सिद्ध होतो त्यावेळी त्याला तत्त्वज्ञान असं म्हणतात. त्या अर्थाने ज्ञानेश्वरीकडे पाहिलंत तर तशी तर्कदुष्ट बुद्धिचर्चा ज्ञानेश्वरीमध्ये नाही. आता तर्काचा आधार घेऊन, अनुमान प्रमाण देऊन, बुद्धीची अगदी पराकोटीची झेप घेऊन बुद्धीला संतुष्ट करण्याचं काम करण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली गेलेली नाही. पण आश्चर्य म्हणजे ही सगळी कामे ज्ञानेश्वरीने केलेली आहेत, तरी त्याच्याही पलीकडे तिची झेप आहे.
हे सांगत असताना आजच्या काळातील संदर्भ मी एवढ्यासाठी देत आहे की आजही विज्ञानामध्ये नव्या दृष्टीने माणसाच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. हे लक्षात आणून माणसाच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा जसा प्रयत्न चालू आहे तसाच ज्या वस्तुरूपानं वा द्रव्यरूपानं जग विनटलेलं आहे त्या वस्तूंच्या, द्रव्यांच्या मूलतत्त्वाचा शोध घेण्याच्या प्रयत्नामध्ये आजचं विज्ञान आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा शोध घेत असताना त्या विज्ञानवंतांनी, त्या शास्त्रज्ञांनी मांडलेले विचार आणि आत्मसाक्षात्काराच्या अवस्थेत या जगाचं जे दर्शन या विभूतींना घडलं त्यांनी मांडलेले विचार, हे अनेक ठिकाणी जवळ जवळ येताना दिसतात.
मला एका नोबेल प्राईज मिळालेल्या शास्त्रज्ञाची या ठिकाणी आठवण येते. आपण कदाचित वाचलं असेल वर्तमानपत्रामध्ये की काही वर्षांपूर्वी फिजिक्समध्ये म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्रामध्ये ज्याला नोबेल प्राईज मिळालं होतं, तो अमेरिकेचा एक शास्त्रज्ञ वेदान्ताचा स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी म्हणून भारतामध्ये येऊन राहिला. वस्तूच्या म्हणजेच सृष्टीच्या मूलतत्त्वाचा शोध घेण्याची परंपरा भारतामध्ये गेल्या तीन हजार वर्षांहूनही जुनी आहे. विज्ञानाच्या संदर्भात ती अलीकडे ज्याला आपण एन्फरेन्शियल सायन्सेस म्हणतो, अनुमानातून, डिडक्टिव अशा मेथडमधून किंवा इंडक्टिव मेथडमधून शोध घेत घेत पदार्थाच्या मुळाशी जाण्याचा जो प्रयोग आहे त्यात दिसते. आपल्याकडील परंपरा मुळातला शोध एकदम साक्षात्काराच्या रूपानंच वा साधनानं घेण्याची आहे. म्हणजे ज्याला इंट्युटिव मेथड असं म्हणतात त्या अंतर्ज्ञानातून निर्माण होणार्या दिव्य अशा प्रकारच्या दर्शनाच्या गोष्टी असल्यामुळे एक अंतर्ज्ञानातून सुरुवात होते आणि दुसरी बहिर्ज्ञानातून. या बहिर्मगन पद्धतीने कण फोडीत फोडीत आत जाण्याचा प्रयोग होतो. एका शरीरविज्ञानशास्त्रज्ञाने म्हणजे डॉ. सर रॉबर्ट रिचेट या नोबेल प्राईज विजेत्याने असं लिहिलं की आमची आतापर्यंत अशी कल्पना होती की जीवनाचा, भोवतालच्या सृष्टीचा अनुभव फक्त पंचेंद्रियांमार्फतच घेता येतो. पण त्याने १०० शास्त्रज्ञांच्या सहकार्याने एका ठिकाणी एक प्रयोग करून पाहिला आणि त्या प्रयोगामध्ये असे सिद्ध झाले की या पाच ज्ञानेंद्रियांच्या पलीकडेदेखील असा एक कुठला तरी मार्ग आहे, साधन आहे की त्या मार्गाने, साधनाने ज्ञान आत्म्यापर्यंत प्रवेश करते. मग तो असे म्हणतो की ‘मेटॅफिजिक्स, दो इट इज नॉट कन्सिडर्ड ऍज सायन्स’, आज जरी अध्यात्माला शास्त्र म्हणून मानलं जात नसलं तरी एखादी गोष्ट एका अपवादभूत उदाहरणानं जरी सिद्ध झाली तरी तिचं अस्तित्व सिद्ध होत असल्यामुळे मेटॅफिजिक्स, अध्यात्मशास्त्र यापुढे शास्त्र म्हणून मानायलाच पाहिजे, असा या शास्त्रज्ञाचा अभिप्राय आहे.
दुसर्या एका शास्त्रज्ञानं, या आत्मसिद्धीच्या स्वरूपामध्ये आणि या सबंध भौतिक द्रव्यांनी निर्माण झालेल्या सृष्टीमध्ये ज्ञानेश्वरीनं किंवा उपनिषदांनी, किंवा कुठल्याही तत्त्वज्ञानानं घेतलेला शोध हा ज्या मूलतत्त्वातून हे सगळं जग स्फुरलं ते मूलतत्त्व आणि स्फुरलेलं जग यांच्या परस्परांच्या संबंधांचा असल्यामुळे तो शास्त्रज्ञ असा विचार मांडतो की हा देह तरी कशापासून बनलेला आहे? आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, आजच्या विज्ञानाच्या दृष्टीने हा सगळा पंचभौतिक द्रव्यांनी बनलेला अशा प्रकारचा देह आहे. म्हणजे हा मॅटरच आहे, द्रव्य आहे. म्हणजे हा जड असा आहे. या जड शरीराची प्रत्येक पेशी ही दिवसादिवसाला बदलत असते. म्हणजे आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं रूपांतर नव्या पेशींमध्ये होतं. जुनी पेशी निघून जाते. आपल्या शरीरात असलेले अणू–रेणू शरीरातून बाहेर पडून दुसर्या पदार्थात मिसळतात, दुसर्या पदार्थातील आपल्यामध्ये मिसळतात, म्हणजे काल जे आहे ते आज नाही आणि आज आहे ते उद्याही नाही. अगदी मेंदूसुद्धा. अशा या शरीरामध्ये मला मागचं सगळं आठवतं. माझ्या आवडीची माणसं, माझ्या जीवनातील सगळे सुखकारक, दुःखकारक प्रसंग, मी ज्या ज्या वेळेस, मला हवे असतील त्या वेळेला त्या व्यक्ती वा प्रसंग माझ्या नजरेसमोर येतात. त्या सर्वांना नजरेसमोर आणणारी ही शक्ती कोणती असा प्रश्न शास्त्रज्ञाने उपस्थित केला आहे. जर शरीराचा प्रत्येक भौतिक कण बदलणारा असेल तर वास्तविक मागचं स्मरण्याचं, मागचं पुन्हा उपस्थित होण्याचा प्रश्नच येत नाही. पण हे सारं बदलूनसुद्धा एक कुणीतरी असा आतमध्ये कायम शिल्लक असतो जो जन्मल्यापासून अखेरपर्यंतची सगळी साठवणूक करत राहतो. आत्मतत्त्वाच्या सिद्धीकडे, सत्यत्वाकडे नेणारा हा विचार आहे.
त्याच्या पलीकडेही जाऊन ज्यांनी जगाची अगदी पराकाष्ठेची मान्यता मिळविलेली आहे अशा आइन्स्टाईनचं उदाहरण घेऊ. ते म्हणतात ‘वुई में, देअरफर, रिगार्ड मॅटर’ म्हणजे ज्याला आपण भौतिक वस्तू समजतो मग ती कुठलीही असो, तिचं स्वरूप माणसाला कधीच कळत नाही. आणि आपला तर असा अहंकार असतो की आमच्या इंद्रियांनी आम्हाला सगळं जग कळलेलंच आहे. खरं तर तसं कळलेलंच नाही, असे आइन्स्टाईन म्हणतो. तो म्हणतो–
‘वुई मे, देअरफर रिगार्ड मॅटर ऍज बीईंग कौन्स्टिट्युटेड बाय द रीजन्स ऑफ स्पेस इन वुईच द फिल्ड इज एक्स्ट्रीमली इंटेन्स. देअर इज नो प्लेस इन द न्यू काइंड ऑफ फिजिक्स बोथ फॉर द फिल्ड ऍण्ड मॅटर, फॉर द फिल्ड इज दि ओन्ली रिऍलिटी.’
पदार्थविज्ञानशास्त्राच्या दृष्टीतून वस्तूमध्ये वा पदार्थामध्ये पदार्थ म्हणून असं काही शिल्लकच राहिलेलं नाही आणि आपलं अध्यात्मशास्त्रही असं सांगतं की दिसतं ते ‘मायाकारित.’ जग खोटं आहे अशा अर्थाने ‘माया’ हा शब्द नाही. तो एका वेगळ्या अर्थाने आहे. थोर भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे ः
‘इन द परसूट ऑफ माय इनव्हेस्टीगेशन,’ मी शोध घेताना मला असं आढळलं… ‘आय वॉज अनकॉन्शसली लेन्ड इनटू बॉर्डर रिजन्स ऑफ फिजिक्स ऍण्ड फिझिऑलॉजी…’ पदार्थविज्ञानशास्त्र आणि शरीरशास्त्र यांच्यामध्ये सीमारेषेवर कुठेतरी एक असे काही चैतन्याचे नाते जुळायला लागलेय, असे काही प्रत्ययाला येऊ बघतेय. ‘जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत…’ जी वस्तू, प्राणी जे जे काही दिसेल त्यामध्ये भगवंत आहे, चैतन्यतत्त्व आहे हा विचार आणि हा विचार….
‘अनकॉन्शसली लेन्ड इनटू बॉर्डर रिजन्स ऑफ फिजिक्स ऍण्ड फिझिऑलॉजी, टू माय अम्युझमेंट, आय फाउंड लाईन्स व्हॅनिशिंग ऍण्ड पॉइंट ऑफ कॉंटॅक्स्ट इमर्जिंग बिटवीन रेल्म्स ऑफ द लिविंग ऍण्ड नॉन–लिविंग…’ निर्जीव आणि सजीव यांच्यामधलं एक नातं प्रस्थापित होतंय असं आपल्या कुठल्यातरी दिव्य दृष्टीला जाणवायला लागलं. ‘इनऑरगॅनिक मॅटर वॉज परसिव्ड ऍज एनिथिंग बट इनर्ट…’ म्हणजे निरिंद्रीय जड वस्तू ही निश्चल आहे, निर्जीव आहे असं मानलं जात होतं. तर जगदीशचंद्र बोस म्हणतात की ‘इट वॉज ए थ्रिल…’ ही नुसती चैतन्याने रसरसलेली आहे. शास्त्रज्ञांचे मी उल्लेख करतो आहे, ज्ञानेश्वरांचे नाही. ‘इट वॉज ए थ्रिल अंडर दि ऍक्शन्स ऑफ मल्टिट्युडनल फोर्सेस.’ अनंत अशा प्रेरणांखाली ती सदैव अशा चैतन्याने थरथरणारी गोष्ट आहे. आपण असं म्हणतो की, हे दिसतं ते खरं नव्हेच, हा आभासच आहे. आभास या शब्दाला अनुरूप असा शब्द जॉन व्हीलर या नावाच्या एका एमिनंट सायंटिस्टने लावलेला आहे. ‘इन मॉडर्न सायन्स द डिस्टिंक्शन बिटवीन दि ऑब्झर्व्हर.’ आपल्याकडे शब्द येतो ‘द्रष्टा.’ ‘ऍण्ड दि ऑब्झर्व्हड ब्रेक डाऊन कंप्लीटली.’ आता या नव्या सायन्समध्ये हे नातंच कोसळून पडलं. आपण म्हणतो, ‘सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी.’ द्रष्टा, दर्शन आणि दृश्य यांचं असं सामरस्य होतं की नंतर काही द्वैत शिल्लकच राहत नाही. हा सायंटिस्ट काय म्हणतो बघा, ‘इन मॉडर्न सायन्स दि डिस्टींग्शन बिटवीन दि ऑब्झर्व्हर ऍण्ड दि ऑब्झर्व्हड, ब्रेक डाऊन कंप्लीटली ऍण्ड इनस्टेड ऑफ दि ऑब्झर्व्हर, वुई हॅव टू पुट इन इट्स प्लेस ए न्यू वर्ड पार्टीसिपेटर.’ ज्याला आपण ऑब्झर्व्हर म्हणतो तो ‘द्रष्टा’ ऑब्झर्व्हर म्हणून तटस्थ राहतच नाही, तो जगातला एक सहभागी अंशच बनून जातो. ‘पार्टिसिपेटर इन सम स्ट्रेंज सेन्स, युनिव्हर्स इज ए पार्टीसिपेटरी युनिव्हर्स’ म्हणजे मी द्रष्टा, मी कर्ता असा भेद शिल्लकच उरत नाही. या सबंध जगामध्ये आत्मतत्त्व जर सगळीकडे एकच असेल तर त्यातला सहभागी अंश म्हणूनच मी शिल्लक राहतो असं हा सायंटिस्ट म्हणतो. ते आपल्या साक्षात्कारशास्त्रात नेती, नेती हे नाही, ते नाही असं आपण ब्रह्मतत्त्वाचं वा आत्मतत्त्वाचं वर्णन करतो.
एकंदर आपल्या आत्मतत्त्वाचं, त्या नेती नेतीचं नातं प्रसिद्ध वैज्ञानिक आयझेन बर्गच्या एका संकल्पनेशी जुळणारं आहे. आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये आयझेनबर्ग या क्वांटम फिजिक्सच्या मान्यवर शास्त्रज्ञानं म्हटलं आहे… ‘‘ऍटम्स आर नॉट थिंग्ज.’’ आपण समजत होतो आतापर्यंत की त्या वस्तू आहेत. ‘ऍटम्स आर नॉट थिंग्ज. दि इलेक्ट्रॉन्स वुईच फॉर्म ऍन ऍटम सेल आर नॉट नो लॉंगर थिंग्ज इन द सेन्स ऑफ क्लासिकल फिजिक्स.’ पदार्थविज्ञानशास्त्रातील वस्तुरूपच त्यांना नाही. ‘थिंग्ज वुईच कुड बी अनऍबिग्युअसली डिस्क्राईब्ज बाय कंन्सेप्टस् लाईक लोकेशन, व्हेलॉसिटी, एनर्जी, साईट्स एटसेट्रा.’ स्थान आहे, त्याला काल आहे, त्याला गती आहे, शक्ती आहे. अशा ज्या नेहमीच्या संकल्पना आहेत, त्या त्याला लावता येत नाहीत. ‘व्हेन वुई गेट डाऊन टू ऍटोमिक लेव्हल, दि ऑब्जेक्टिव्ह वर्ल्ड इन स्पेस ऍण्ड टाईम नो लॉंगर एक्झिस्ट ऍण्ड दि मॅथेमॅटिकल सिम्बॉल्स ऑफ थिअरॉटिकल फिजिक्स रिफर मिअरली टू पॉसिबिलिटीज ऍण्ड नोट टू फॅक्टस्.’ वस्तुस्वरूप जगाच्या जागी गणितशास्त्रातील प्रतीकं तेवढी शिल्लक उरतात.
दुसरा एक शास्त्रज्ञ असं म्हणतो की मेकॅनिकल कन्सेप्टसमध्ये (यांत्रिक संकल्पनेत) आता जग सांगता येत नाही. ‘इट इज ए थॉट इन दी माइंड ऑफ द क्रिएटर, इन द माइंड ऑफ द क्रिएटर.’ उपनिषदं असं म्हणतात की आत्मतत्त्वाच्या संकल्पनेतून ‘सऐच्छत् बहुस्यां प्रजायै’- त्याने अशी इच्छा केली की आपण बहुरूपानं प्रकट व्हावं आणि त्या इच्छेनुसार जग निर्माण झालं. ‘सऐच्छत’ त्यापद्धतीने क्रिएटरच्या मनातील एक संकल्प, म्हणजे हे जग, कल्पना किंवा विचार आहे असं तो म्हणतो. ‘शॅडोग्राफ’ असा एक सुंदर शब्द दुसर्या एका शास्त्रज्ञाने वापरला आहे. त्याला आपण माया किंवा भास आहे, भ्रम आहे असे शब्द वापरतो. आर्थर रेडिंग्टन म्हणतात– न नेचर ऑफ द फिजिकल वर्ल्ड– या दृश्य सृष्टीचं स्वरूप, ‘इन द वर्ल्ड ऑफ फिजिक्स वुई वॉच ए शॅडोग्राफ’, छायेचं स्वरूप बघतो आपण फिजिक्समध्ये! कसं? फॅमिलियर लाईफ, शॅडो ऑफ माय एल्बो, एका टेबलावर आपली छायारूपी हनुवटी, आपल्या छायारूपी हातावर ठेवून लिहितो तेही एका छायारूपी कागदावर, असं त्याचं वर्णन करतो. ‘ए शॅडो ऑफ माय एल्बो रेस्ट्स ऑन शॅडो टेबल, ऍण्ड द शॅडो इंक प्लोज ओव्हर ए शॅडो पेपर फ्रँक रिअलायझेशन दॅट फिजिकल सायन्स इज कन्सर्ड विथ दि वर्ल्ड ऑफ शॅडोज् इन वन ऑफ द मोस्ट सिगनिफिकंट ऑफ रिसंट ऍडव्हान्सेस.’ ढेवरू ींहशीश ळी र ुळवश ाशर्रीीीश ेष रसीशशाशपीं ुहळलह ेप ींहश हिूीळलरश्र ीळवश ेष ीलळशपलशी रििीेरलहशी रश्रोीीं ींे र्ीपरपळाळींू ींहरीं ींहश ीींीशरा ेष ज्ञपेुश्रशवसश ळी हशरवळपस ींेुरीवी पेप–ाशलहरपळलरश्र ीशरश्रळींू, ींहश र्ीपर्ळींशीीश लशसळपी ींे श्रेेज्ञ ोीश श्रळज्ञश र सीशरीं ींर्हेीसहीं ींहरप श्रळज्ञश र सीशरीं ारलहळपश. एखाद्या यंत्रासारखी जगाची रचना असावी असं आतापर्यंत आपण मानीत होतो. आता ते यंत्रासारखं नसून एखाद्या महान विचारासारखं आहे, असा नवा विचार विज्ञानक्षेत्रामध्ये आला आहे.
कांट हा एक सोळाव्या शतकातला पाश्चात्त्य तत्त्वज्ञानक्षेत्रातला एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ मानला जातो. ज्याच्या बुद्धीच्या झेपेने तत्पूर्वीच्या तत्त्वज्ञानाच्या सर्व सिद्धांतांना एक नवा अर्थ दिला. नवी दिशा दिली. ज्ञानेश्वरीतील मूलभूत तत्त्व हाताशी धरलं नाही, समजून घेतलं नाही तर त्यांना घडलेलं जीवनाचं दर्शन आपणास कळणार नाही. बर्याच वेळेस आपली प्रवृत्ती अशी असते की विचार किंवा सिद्धांत बाजूला टाकून सोपं असेल तेवढंच वाचावं. कारण आपली कुवत तेवढीच असते. हे आत्मतत्त्वाचं दर्शन वगैरे गहन गोष्टी बाजूला टाकूनच वाचावं लागतं. कारण आपली तेवढी कुवतच नसते, पण तरीही जीवनाचा अर्थ समजण्यासाठी ते गुह्य जाणणं कितीतरी आवश्यक असतं म्हणून ही गंभीर तत्त्वचर्चा. जीवनाचे आपले अनुभव कसे येतात? आपण हे सगळं विश्व इंद्रियांनी पाहतो, अनुभवतो. कांट असं म्हणतो की ह्या ज्या संवेदना आपल्याला मिळतात, फुलांच्या रंगातून मिळतात, स्पर्शातून मिळतात, जे ज्ञान माझ्यापर्यंत पोचतं ते ज्ञानच खरं असतं आणि त्या ज्ञानाच्या अनुमानानं वस्तू असल्याचं आपण मानतो. वस्तू असल्याचे आपणाला दुसर्या कशानंही कळत नाही. इंद्रियांच्या मार्फतच स्पर्शानं जे जाणवतं ते स्पर्शमात्र ज्ञान असतं. वस्तू प्रत्यक्षात कशी असते. परेश्वराला ठाऊक. कांट म्हणतो, अनुमानाने आपण म्हणायचं की ज्या अर्थी हे ज्ञान माझ्यापर्यंत पोचलं त्या अर्थी ती वस्तू तेथे असली पाहिजे. अनुमानाने जाणायचं, त्यामुळे तो आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या मानतो. त्यानं दोन पुस्तकं लिहिलेली आहेत. ‘क्रिटिक ऑफ प्युअर रीझन’ ऍण्ड ‘क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रीझन.’ एक प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण जो अनुभव घेतो तो घेणारी एक आंतरशक्ती कुठेतरी आहे. कुठेतरी असा एक ज्ञाता आहे की तो हे सगळं जाणण्याचा प्रयत्न करतो. त्याला इंद्रियामार्फतच जे जाणवतं, तेवढंच सत्य असतं. बाकीचं स्वरूप काय असतं ते त्याला कळत नाही. आपलं अध्यात्म याच्यापलीकडे काहीच सांगत नाही, हे तुमच्या लक्षात येईल. जे नामरूपात्मक जग आपण पाहतो ते तसं नाही. त्याच्या पलीकडे आत्मतत्त्व दडलेलं आहे. नेमका तेच अर्थ तेथे आहे. नंतर तो असं सांगतो, असं जे जाणवतं त्याने जरी अनुमानाने, त्या वस्तूची, त्या भौतिकतेची सिद्धता होत असली तरी तत्त्वज्ञानाच्या आधाराने तो असं म्हणतो की हे त्याच्यापलीकडचे जे आहे, जे अज्ञेय म्हणून मानावेच लागते. अज्ञेय म्हणजे काय? ज्याचा कधीही पत्ता लागणार नाही अशा गोष्टी. ती मानावीच लागते. आता आत्मतत्त्वाच्या दृष्टीनं तुम्ही कुठल्याही वस्तूची, आजच्या पदार्थविज्ञानशास्त्राच्या आधाराने फोड करावयाचा प्रयत्न केला तर तुमच्या असं लक्षात येईल की जे जे तुम्ही पाहता, ते ते नामरूप संबंध, आकार याच्या पलीकडे काही नसते. म्हणजे त्याला नाम असतं, रूप असतं, संबंध असतो, त्याला क्रिया असते, याच्या पलीकडे असणारे त्याचे रूप आपल्याला कळत नाही. वस्तूचे खरे रूप आपल्याला कधीच कळत नाही. कळतो तो त्याचा आकार, कळतो तो त्याचा रंग, कळतो तो त्याचा संबंध, कळते ती त्याची क्रिया. पण त्या वस्तूंमध्ये नेमकं मूलतत्त्व काय आहे ते आपल्याला कळतच नाही. हे शोधायचे काम विज्ञान करते.
आम्ही ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी फक्त ९२ मूलतत्त्वं होती. नंतर नवी मुलं शिकायला लागली तेव्हा ती ६२ झाली आणि आता तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की एका विद्युतकणावर येऊन गाडी स्थिरावली आहे. ‘अविभक्तम् विभक्तेषु.’ या सगळ्या विभागलेल्या गोष्टीमध्ये अंतिमतः कुठेतरी एकच तत्त्व आहे असं आध्यात्मिक साक्षात्कारात ऋषीमुनींना जाणवलं होतं. तो साक्षात्कार विज्ञानाच्या मार्गाने प्रवास करत आता क्वान्टम थिअरीवर येऊन पोचला आहे. पुन्हा लक्षात येईल की शेवटी आपले हे सगळे व्यवहार नामरूपाने चालतात. प्रत्यक्ष वस्तूचं खरं मूळ रूप आपल्याला कधीच कळत नाही. म्हणून मग एकाला ‘प्रोटॉन–न्युट्रॉनचा न्युक्लियस करायचा आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉनला भरमसाट गतीनं फिरायला लावायचं. त्याचे आकार, त्याची गती, त्याची सूक्ष्मता फक्त अनुमानानं, गणितानं सिद्ध केलेली. प्रत्यक्ष अनुभवानं कुठल्याही शास्त्रज्ञानं ते पाहिलेलं नाही. कारण पाहण्याच्या शक्तीपलीकडची ती सूक्ष्मता असल्यामुळे ती दिसत नाही. आणि म्हणून कितीही खोलात जाण्याचा प्रयत्न केला तरी एक वेळ अशी येते की तेथे त्याच्या पुढचे काहीसुद्धा कळत नाही. आपण जे इंद्रियांनी पाहिलं, अनुभवलं म्हणतो आणि ते खरं आहे समजतो, ते पदार्थविज्ञानशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा खरं नसतं. हे जर लक्षात घेतलं तर ज्ञानेश्वर किंवा आमची उपनिषदं किंवा त्यांच्यावर आधारलेली सगळी तत्त्वज्ञानाची विचारसरणी या जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन मांडतात त्यावेळी तो खरा नसेल असं म्हणायला काहीच कारण दिसत नाही. ज्ञानेश्वरीतील एक व्याख्या मी मुद्दाम येथे उद्धृत करतो, ती या शास्त्राशी किती जवळची आहे हे तुमच्या लक्षात येईल. ती थोडीशी समजायला अवघड आहे, परंतु ती समजली तर ज्ञानेश्वरीतील मूळ गाभा समजला असं म्हणता येईल.
‘मग म्हणीतले सर्वेश्वरे’ मग श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले, ‘जे आकारी इये खोंकरे|’ आता खोंकरे म्हणजे नष्ट होणारे, संपणारे. हे सगळे आकार संपणारे आहेत. ते काहीच चिरंतन राहत नाही. ‘जे आकारी इये खोंकरे| कोंदले असत न खिरे कवणेकाळी’॥ सर्व नाशवंत आकारात भरलेलं असतं पण ते गळत नाही. भांड्यात पाणी भरलं आणि भोक पडलं तर ते कळेल, परंतु जे आत्मतत्त्व या सर्व आकारात म्हणजे सर्व वस्तुमात्रात भरलेलं आहे ते मात्र गळत नाही. ‘कोंदले असत न खिरे कवणेकाळी’ ते गळत नाही. ‘एरव्ही सपूरपण तयाचे पहावे’ याची सूक्ष्मता एवढी ‘तरी शून्यची नव्हे आघवे.’ म्हणजे शून्यदेखील शब्द त्याला लावता येणार नाही इतके विरल. दृष्टीच्या काय, कशाच्याही पलीकडचं म्हणजे अव्यक्त आहे. ते कशातून गाळून घेतले? ‘की गगनाचेनी पालवे’- गगनाच्या पदरातून, आकाशाच्या सूक्ष्म पदरातून. ज्ञानेश्वरांच्या या प्रतिमादेखील अत्यंत सुंदर असतात. इतक्या सूक्ष्माला गाळण्यासाठी आकाशासारखं सूक्ष्मच काहीतरी पाहिजे. म्हणून आकाश गळायला घेतलं. ‘वरी गगनाचेनी पालवे’- गाळून घेतलं, ‘जे ऐसेही परी विरुळे’ असे असूनही त्याच्याहूनही पलीकडचं, त्याहूनही सूक्ष्म असूनसुद्धा ‘इये विज्ञानाचिये खोळे.’ आत्म्याशिवाय असलेलं जगाचं सगळं ज्ञान म्हणजे विज्ञान. सोपी व्याख्या आहे, अवघड काही नाही. आत्म्याशिवाय असलेलं सगळं ज्ञान म्हणजे विज्ञान. म्हणजे जे जे आपण पाहतो, तुम्ही–आम्ही, हे सगळं जग वगैरे सगळे काही. तर ‘या विज्ञानाचिये खोळे’ याच्यातून आता हे सगळं गाळायचं. ‘हालविलेनेही न गळे परब्रह्म’ याच्यातून हलवूनही, हे गाळण्याचा मुद्दाम प्रयत्न केला तरी गळत नाही. याचा अर्थ समजण्यासाठी भांड्याचा आपण उपयोग करू. हे भांडे आहे स्टीलचे किंवा पोलाद धातूचे. आता हा धातू आणि त्याने घेतलेला भांड्याचा आकार. ज्ञानेश्वरांनीही फार अर्थपूर्ण आणि सुंदर कल्पना वापरली आहे. विस्मयकारक आणि सौंदर्यकारक! भांड्याचा आकार आणि त्याच्या आकारामध्ये ओतलेलं जे पोलाद आहे ते त्या आकारातून गळत नाही. ते पोलाद त्या आकारातून गळत नाही याचं कारण ते पोलाद आणि तो भांड्याचा आकार एकरूप आहेत आणि एकरूप असलेल्या गोष्टी एकमेकातून कधी गळत नाहीत. ही गोष्ट जर लक्षात घेतली तर हे सगळं जग आणि ते जग ज्या परतत्त्वातून तयार झालं ते परब्रह्म जगाशी एकरूपच असल्यामुळे ते त्याच्यातून म्हणजे प्रपंचातून गळूच शकत नाही. एकातून त्याहून भिन्न असा दुसरा पदार्थ गळू शकतो. भांड्यात पाणी ओतले तर ते भिन्न असा आकार धारण करेल, ते ओतता येईल, परंतु आकारात जे पोलाद आहे ते आकारातून ओतता येत नाही. ही कल्पना अगदी सरळ, स्वच्छ आहे. जे इंद्रियांच्याद्वारे तुम्हाला समजते ते तसे नसेल तर मात्र नेमके काय आहे? ते आध्यात्म्याच्या पातळीवर आत्मसाक्षात्काराच्या अवस्थेत त्या ज्ञानेश्वरांनी अनुभवलं आणि त्यांना असा प्रत्यय आला की हे परब्रह्म सगळीकडे असे भरलेले आहे की ते या नश्वर विज्ञानातून गाळलं जात नाही. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे आणि तो असा की सबंध विश्वामध्ये ज्ञानाकारच खरे असतात. मूलतत्त्व जे ज्ञान त्याचे विविध आकार म्हणजे हे जग. म्हणजे कांट असेच म्हणाला की आपण ज्ञानाकारच अनुभवतो. प्रत्यक्ष वस्तू आपण कधीच अनुभवत नाही. जरी मी वस्तूचा स्पर्श अनुभवत असलो तरी स्पर्शानं आलेल्या ज्ञानाचाच मी फक्त अनुभव घेतो. प्रत्यक्ष वस्तूचा मला अनुभव येत नाही आणि हे जसं खरं तसं जगाच्या बाबतीतसुद्धा. ज्या दृष्टीने तुम्ही जग बघता त्यामध्ये तुम्हाला हे अनंत रूपाचे, नामाचे, आकाराचे, संबंधाचे दिसतात, अनुभवाला येतात आणि त्या मागील सर्व विशेष काढून टाकल्यानंतर उरणारे जे अभेद मूलतत्त्व आहे ते फक्त साक्षात्काराच्या अवस्थेतच अनुभवता येते. आता ही संकल्पना लक्षात घेतली तर जग ज्या आत्मतत्त्वाचं आविष्कारण आहे, त्या आत्मतत्त्वाचा शोध हे अर्थातच मग मानवी जीवनाचे एक अत्युच्च अशा प्रकारचे ध्येय आहे.
जीवनाचं उद्दिष्ट काय तर जिथून मी आलो तेथे परत जाणे. अगदी सोपी कल्पना आहे. ‘जे उपजे आणि नासे|’ जे निर्माण होतं आणि नष्ट होतं. मी कधीतरी मरणार. आपल्या या शरीराचा प्रत्येक कणन्कण पंचमहाभूतांमध्ये कुठेतरी मिसळून जाईल, मी काहीच शिल्लक राहणार नाही. जे उपजे आणि नासे| जे मायावशे दिसे| एरवी तरी वस्तू असे| अविनाशाची॥ मी संपेन, मी जाईन, तरीदेखील माझ्यामध्ये असलेले आत्मतत्त्व, वस्तुतत्त्व मात्र तसेच कायम राहील. आता ज्ञानेश्वरीची दुसरी ओवी घेऊ. ती फार सुंदर आहे. सौंदर्याच्या दृष्टीनेसुद्धा आणि आजच्या नव्या कवितेच्या संदर्भात जिला आपण प्रतिमा म्हणतो त्या प्रतिमेच्या अंगानेसुद्धा ती किती बोलकी असू शकते त्याचं हे उदाहरण आहे. कुंभार मडकं बनवतो, तसं कुठल्यातरी आत्मतत्त्वानं हे जग घडवलं. ‘भूमी आतुनी स्वयंभ| निघती काये घडे गाडगेयांचे कोंभ|’ घडे, गाडगीमडकी वेगवेगळ्या आकाराची पण मातीचीच तयार होतात. ती काही भूमीतून अंकुररूपाने बाहेर उगवतात काय? ‘भूमी आतुनी स्वयंभ’ निघती काय घडे गाडगेयांचे कोंभ की ते कुल्हालमतीचे गर्भ उमटले की त्या मडक्यांचा जन्म कुंभाराच्या बुद्धीमध्ये, त्याच्या कल्पनेमध्ये कुठेतरी आधीच होऊन गेलेला होता. किती पराकाष्ठेची सुंदर कल्पना आहे. यांत ज्ञानेश्वर जी प्रतिमा वापरतात त्या प्रतिमेमध्ये नुसता सौंदर्याचा भाग नसतो. एक सत्यतेचाही भाग असतो. भूमी आतुनी स्वयंभ. मातीचीच मडकी, गाडगी केलेली असतात. म्हणून मातीचा संदर्भ आहे हे लक्षात घ्या. ‘भूमी आतून स्वयंभ|’ भूमीतून ही मडकी, गाडगी कोंब रूपाने फुटत नाहीत. भूमीचा संबंध आहे मातीशी. तरीदेखील ती त्या मातीतून आपोआप निर्माण होत नाहीत. मग ‘कुल्हालमतीचे गर्भ’ या ओळीत गर्भ हा शब्द आला. गर्भ हा मातेच्या उदरामध्ये, मातेच्याच देहतत्त्वातून जसा निर्माण होतो तसाच त्या कुंभाराच्या कल्पनेच्या पोटी पहिल्यांदा घागरीच्या आकाराचा जन्म होतो आणि एकदा तो आकार जन्मला की मग माती उपादानकारण बनते आणि मग तो आकार मातीच्या रूपाने प्रकट होतो. आता ही कल्पना जर समजून घेतली तर तुम्ही–आम्ही आणि हे सर्व विश्व हे कल्पनाजनित आहे हे लक्षात येईल. ‘जाण हे मायाकारित’- मायेने आकारलेले असा शब्दप्रयोग ज्ञानेश्वर वापरतात. हे विविध प्रकारचे आकार कुठेतरी, कुणाच्या तरी बुद्धीत आधी निर्माण झालेले असले पाहिजेत आणि तुम्हाला मग आश्चर्यकारकरीत्या येथे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. कवितेची उत्तरे मिळतात, चित्रांची उत्तरे मिळतात, संगीताची उत्तरे मिळतात, शिल्पांची उत्तरे मिळतात आणि सर्व प्रकारच्या शोधांची उत्तरे मिळतात. शास्त्रज्ञांना शोध लागलाय, संगीतकाराला एखाद्या नव्या गीताचे, रागाचे दर्शन घडते. एखाद्या चित्रकाराला नवीन रंगांची, नवीन रचनांची दुनिया गवसते. एखाद्या कवीला एका नव्या प्रकारच्या कल्पनेचा सुंदर अशा शब्दसहितांचा आलेख दिसतो. हे कसं घडतं? हे कल्पनाकार वा ज्ञानाकार मूलतत्त्व असलेल्या आत्मतत्त्वामध्ये संपूर्णतः अंतर्भूत आहेत, अशी ज्ञानेश्वरांची विचारसरणी आहे. ही कल्पना केवढी भव्य आहे. आपल्या आत्मतत्त्वामध्ये आपल्याला अगम्य अशा अनेक गोष्टी असतात. त्या सर्वांनाच भावत नाहीत. ज्ञानेश्वर म्हणतात की ज्याची ही आत्मतत्त्व जाणण्याची कुवत वाढली, प्रज्ञा–प्रतिभाशक्ती प्रकटली, त्याला ते दर्शन घडायला लागतं आणि जसजसा वरच्या पायरीवर मनुष्य जातो, मग तो कवी असो, कलावंत असो, चित्रकार, ग्रंथकार, गीतकार कोणीही असो, सगळे त्या वरच्या पायरीवर जातात. तसतसे नवनवे कल्पनाकार त्यांच्या बुद्धीला एखादी वीज झटदिशी चमकावी तसे स्पर्शून जातात आणि जे इतरांना कधी गवसेलं नसतं ते त्यांना गवसतं. येथे फक्त त्याचा आविष्कार होतो. जे होऊन गेलं, जे व्हायचं आहे आणि जे होत आहे ते सर्व ज्ञानाकाराने मूलतत्त्वात आधीच अस्तित्वात असतं. विश्वरूपदर्शनामध्ये याचा प्रत्यय येतो. त्यापलीकडे काही नाही.