32 C
Panjim
Sunday, April 18, 2021

भारतीयत्वाचे स्वर रंगरेषांतून निर्माण करणारे कलामहर्षी पद्मभूषण लक्ष्मण पै

  • श्रीधर कामत-बांबोळकर

पद्मविभूषण लक्ष्मण पै हे कला जगतातले स्वयंतेजाने चमकणारे एक अद्वितीय नक्षत्र होते. एक कर्मयोगी… कलेचे ध्यानयोगी… असा हा ऋषितुल्य- तपस्वी कलासाधक वयाच्या ९५ व्या वर्षी अनंतात विलीन झाला. भारतीय रंग, गंध, ताल, रेषांतून कलासृजन त्यांनी जीवनभर घडविले आणि अभिजात प्रतिभेला प्रतिमेची जोड दिली. ती अदृश्य शक्ती ते जिथे असतील तिथे त्यांना सदैव हसतमुख ठेवो हीच प्रार्थना!

माणसाने हेतुपुरस्सर निर्माण केलेली, आनंद देणारी, परंतु व्यावहारिक दृष्टीने उपयोगी नसलेली कौशल्यकृती म्हणजेच कला. काहीतरी नवीन निर्माण करण्याची शक्ती निसर्गाने माणसाला दिलेली आहे. निसर्गातल्या वस्तू जशाच्या तशा परत जुळविल्या म्हणजे खरी कला होत नाही. निसर्गाच्या घटकांनासुद्धा कलाकार आपल्या अनुभवांची जोड देतो. त्यात जे-जे काही दिसते ते निसर्गाचे घटन राहत नाही तर ते त्याच्या अनुभवाचे घटक होतात.
निर्मिती हे जसे महत्त्वाचे लक्षण, तसेच सौंदर्यसुद्धा कलेचे दुसरे महत्त्वाचे लक्षण आहे. सौंदर्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवूनच कलाकार कलेची निर्मिती करत असतो… आणि कलेतून बघणार्‍याला जे समाधान मिळते ते सौंदर्याचे. या प्रक्रियेला सौंदर्यशास्त्रात ‘ब्रह्मानंद सहोदर’ असे म्हटले आहे (Aesthetic Delight or Aesthetic Pleasure).
वाङ्‌मयात अशी एक समजूत रूढ आहे की- ‘जी भूमी सुंदर अशा नैसर्गिक वातावरणाकरिता प्रसिद्ध झालेली आहे, तिथे चित्रकार, संगीतकार, नृत्यकार, साहित्यिक, कवी जन्माला येतात. जेव्हा एखादा कलाकार दृश्य सौंदर्याशी संबंधित असतो, त्यावेळी त्या वातावरणात भरभरून समृद्ध दिसणार्‍या गोष्टी पिढ्यान्‌पिढ्या जगताला देतो.’ गोमंतकासारख्या भूमीच्या बाबतीत हे सत्य ठरलेलं आहे. खरं तर ही भूमी कलाकारांची जननी ठरलेली आहे.
जे कलाकार गोव्याच्या भूमीत जन्मलेले आहेत, त्यांनी त्यांचे रंगकाम गोव्याच्या अद्वितीय घटकांद्वारे साकार केलेले आहे. कुठलीही शैली असू दे वा विषय-आशय असू दे, प्रौढ काळात गोव्याची भूमी, दर्या, वृक्षवल्ली जिवंत होऊन त्यांच्या चित्रकृतीत दृष्टीस पडते. गोव्याच्या ज्या स्त्री-पुरुषांनी इथले निसर्गसौंदर्य आणि इथले दृश्य अस्तित्व संपूर्ण जगाला दाखविले ते उच्चतम कोटीचे अग्रदूत होऊन राहिले आहेत.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पोर्तुगीज सत्ता या भूमीवर असताना इथल्या कलाकारांना आपली अभिजात कलेची भूक भागविण्यासाठी फ्रान्स, पोर्तुगाल किंवा शेजारच्या ब्रिटिश इंडियात जावे लागत असे. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयात चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची सोय होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात गणपत लाड, त्रिनिदाद, ईनासियो वाझ, अनंत भोसले, रघुवीर चिमुलकर, राम कामत, दीनानाथ दलाल, राम बोरकर, रघुवीर मुळगावकर, मंगेश केंकरे, आंजेलो फोन्सेका, प्रफुल्ला डहाणूकर, वामन नावेलकर, मारियो मिरांडा, लान्सेलोत रिबेलो, आनंद मोहन नाईक, शांताराम आमोणकर, चंद्रकांत केरकर, फ्रान्सिस न्यूटन सौझा, वासुदेव गायतोंडे अशा अनेक चित्रकारांनी व शिल्पकारांनी आपल्या परीने कलानिर्मिती केली. पण त्यांची कला खर्‍या अर्थाने फुलली-फळली ती गोव्याबाहेरच. पोर्तुगीज राजवटीत इथली कला ही चर्च-चॅपेल्स, मंदिरे आणि बहुतेक धार्मिक चित्रांपुरतीच मर्यादित राहिली होती.
मुंबईत चित्रकलेच्या क्षेत्रात ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’ची स्थापना १९४६ साली झाली. या घटनेतून ब्रिटिश ऍकॅडेमिक कलाशिक्षण एका बाजूला, तर आधुनिक कलाशैली दुसर्‍या बाजूला जायला लागली. या समूहात गोव्याचा एक बंडखोर तरुण फ्रान्सिस न्यूटन सौझा हा प्रमुख होता. तसेच रझा, हुसेन, आरा, गायतोंडे, गाडे इत्यादींचा समावेश होता.

या ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’च्या समूहात गोव्याचे लक्ष्मण पै जरी प्रत्यक्ष सभासद नव्हते तरी त्यांच्या समूहचर्चेत, प्रदर्शनांत आणि बाकीच्या उपक्रमांत ते सक्रिय भाग घेत. त्यांच्या चित्रांविषयी कल्पना आणि विचार पारंपरिक भारतीय मूल्यांवर आधारीत होते.

लक्ष्मण पै यांचे बालपण
लक्ष्मण पै यांचा जन्म २१ जानेवारी १९२६ रोजी मठग्रामात- मडगावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंढरीनाथ शाळू पै आणि आईचे नाव राधाबाय. त्यांच्या आईच्या बाजूने आजोबा नारायण मावजो आणि मामा रामनाथ नारायण मावजो. त्यांच्या वडीलभावाचे नाव नागेश आणि धाकट्या भावाचे नाव भगवंत (रामू). त्यांचे कुटुंब पारंपरिक मूल्यांचे कसोशीने पालन करणारे होते. त्यांची कुलदेवता कामाक्षी-रायेश्‍वर, शिरोडा. जांभावलीचा दामबाब त्यांचे दुसरे दैवत, जे समस्त मठग्रामस्थांत श्रद्धास्थान आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरुवातीला मराठीतून चार इयत्ता दामोदर विद्यालयात झाले. पुढे दोन वर्षे पोर्तुगीज आणि नंतर इंग्रजी न्यू इरा हायस्कूलमधून झाले. तिथून मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा ते बेळगावला जाऊन उत्तीर्ण झाले. विद्यार्थिदशेत जांभावलीच्या शिशिरोत्सवात स्वयंसेवकांच्या समूहात ते सहभागी होत. स्वास्थ्य सांभाळण्यासाठी नियमाने व्यायाम-कसरती करत.

प्राथमिक कला शिक्षण
त्यांनी सुरुवातीचे चित्रकलेचे शिक्षण मावजो फोटो स्टुडिओत घेतले. तिथे त्यांचे मामा रामनाथ मावजो- ज्यांना कलेचे कसब माहीत होते, तसेच भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास होता- यांचे प्रोत्साहन मिळाले. लक्ष्मण पै यांना हा गुण मावजो कुटुंबाकडून प्राप्त झाला. सुरुवातीला कुंचला व रंग हाताळण्याचे कसब त्यांनी मावजो फोटो स्टुडिओत प्राप्त केले.
मुंबई विश्‍वविद्यालयाची १९४३ साली परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर चित्रकलेचे अधिकृत शिक्षण घेण्यासाठी पालकांच्या आशीर्वादाने मोठ्या उमेदीने ते मुंबईच्या सर जे. जे. आर्ट या कलासंस्थेत झाले.

मुंबईत सुुरुवातीच्या अडचणी आणि समस्या
१९४३ साली जून महिन्यात ते एकटेच मुंबईला गेले. हा गोव्याबाहेर प्रवासाचा आणि राहण्याचा पहिलाच प्रसंग. त्यांची राहण्याची सोय त्यांच्याच एका नातेवाइकाने तुळशी इमारत, खेतवाडी प्रमुख रस्ता, गिरगाव परिसरात केली होती. रात्रीची झोप चाळीतील एका व्हरांड्यात व्हायची. नियमित व्यायामशाळेत जाणे व तलावात पोहणे असा त्यांचा कार्यक्रम चाले. तेथून सकाळी मरीन ड्रायव्हपर्यंत ते धावत जायचे. नंतर त्यांनी कैवल्यधामात योगाचे प्रशिक्षण घेतले. राहण्याची अडचण झाल्यास गिरगावच्या अमेय छापखान्यातील टेबलावर झोपायचे प्रसंग त्यांच्यावर अनेक वेळा आले. मग त्यांच्या वडिलांनी त्यांना १० हजार रुपये एक फ्लॅट घेण्यासाठी दिले. त्या रकमेत त्यांनी माहीमला सारस्वत कॉलनीत १९४९ साली स्वतःच्या मालकीचा फ्लॅट घेतला. येथे तरुण वयात ‘माणूस’ म्हणून जगण्यासाठी ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या त्यांनी प्राप्त केल्या आणि पचविल्याही.

लक्ष्मण पै यांचे कला शिक्षण
१९४३ साली मुंबईला चित्रकलेची प्राथमिक परीक्षा नूतन कला मंदिरातून पूर्ण केल्यावर त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयात प्रवेश मिळविला. याचवेळी त्यांनी आपले नाव लक्ष्मण पै फोंडेकर लहान करून फक्त लक्ष्मण पै असेच ठेवले. चित्रकलेची जी. डी. आर्ट ही परीक्षा ते १९४७ या वर्षी उत्तीर्ण झाले. नंतर एका वर्षाचा ‘म्युरत’ वर्ग त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांना तिथे ‘मेयो मॅडल’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. तिथेच पेंटिंग विभागात त्यांची सहव्याख्याता म्हणून नेमणूकही झाली. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र चित्रकार शंकर पळशीकर होते. त्यांचा पै यांना पुष्कळ आधार झाला. त्या दोघांनी मिळून १९५० साली आपले एक चित्रप्रदर्शन भरविले. पुढे भारतीय चित्रशैलीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय लघुचित्रांचा अभ्यास करण्यास आरंभ केला. यासाठी त्यांना अहीवासी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. येथेच त्यांनी भारतीय संकल्पनेच्या आधाराने लघुचित्रशैलीची चित्रे निर्माण केली.

मानसिक दृष्टी आणि विकास
तो काळ महात्मा गांधींच्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा होता. लक्ष्मण पै यांनी स्वयंशिस्तीच्या आणि स्वयंसेवा करण्याच्या त्यांच्या विचारसरणीतून मुंबईत समाजकार्य करायचे ठरविले. सुभाषचंद्र बोसांचे व्यक्तिचित्रसुद्धा त्यांनी या चळवळीच्या प्रेरणेने रंगविले. महात्मा गांधींची व्याख्याने ते दररोज चौपाटीवर ऐकायला जायचे. स्वामी विवेकानंदांचे चरित्र, जे. कृष्णमूर्तींची व्याख्याने ते अभ्यासायला लागले. या मनःस्थितीतून त्यांनी १९५० साली ‘मरणानंतरचे जीवन’, ‘आत्म तैलचित्र’, ‘भीती’, ‘नशीब’ अशा विषयांवर चित्रे रंगविली. त्यांना आत्मस्वर लाभू लागला.

क्रांतिकारी, बंडखोरी आणि राष्ट्रीय प्रेम या भावनेतून जेव्हा ते शेवटच्या वर्षाच्या पदविकेच्या वर्गात होते तेव्हाच गोव्याच्या मुक्तिसंग्रामात सहभागी होण्याचा त्यांनी मनात ठाम निश्‍चय केला आणि याच उद्देशाने १९४६ साली ते सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी मडगावला परत आले. तेव्हा पोर्तुगीज पाखल्यांनी त्यांना पकडले व पोलिस स्टेशनवर बंदिस्त केले. भरपूर मार दिला. त्यांनी तो पचवलाही. एका आठवड्यानंतर त्यांना सोडले. पण पोर्तुगालला जेलमध्ये जाण्याचे त्यांचे स्वप्न विरून गेले. याचे कारण म्हणजे ते अल्पवयीन होते.

राहिलेले कला शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते परत मुंबईला गेले. तिथे गेल्यावर जे.जे.मधल्या वरिष्ठ शिक्षकांशी त्यांचे काहीतरी बिनसले. तिथल्या वरिष्ठांच्या मनात त्यांच्याविषयी आकस निर्माण झाला आणि अकस्मात खालच्या हुद्यावर आणून खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा आदेश त्यांना देण्यात आला. हा अपमान त्यांच्या स्वाभिमानी मनाला रूचला नाही आणि तिथल्या तिथेच त्यांनी त्या संस्थेचा राजीनामा दिला.
आत्मस्वर गवसलेल्या या अद्वितीय व्यक्तिमत्त्वास नवचैतन्याची वाट साद घालू लागली. ही घटना त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारी ठरली. संपूर्ण आत्मविश्‍वासाच्या जोरावर आपण एक सृजनशील चित्रकार म्हणून जगाला दाखविण्यासाठी त्यांनी भारत देश सोडून फ्रान्सला जायचे ठरविले. १९५१ साली ते पॅरिसला पोहोचले. तिथल्या रुजासारख्या चित्रकारांनी त्यांना सगळी मदत केली. आर्थिक बैठक व्यवस्थित जमू लागली. १९६१ पर्यंत आपली कलासाधना करतानाच त्यांची प्रतिभा आणि प्रतिमा उंचावू लागली. कारण ते बाकीबाब बोरकरांसारखेच प्रतिभावंत होते.

स्वामी विवेकानंदांच्या ‘कर्मयोग’, ‘ध्यानयोग’ या ग्रंथांचे ते सातत्याने वाचन करीत. येथे त्यांनी आपल्या आंतरिक ऊर्मीला वाट मोकळी करून दिली. त्यांनी सीतार, बासरी आणि दिलरुबा ही वाद्ये वाजवून आत्मसंतुष्टी मिळविली.
पॅरिसच्या वास्तव्यात त्यांना पुष्कळ गोष्टी आत्मसात करायला मिळाल्या. तिथे कलाकारांना योग्य मान मिळतो, प्रतिष्ठा प्राप्त होते. त्यांना तिथे राहण्यास मदत करणारी एक स्त्री त्यांच्या चित्रांवर फिदा झाली होती. जेव्हा त्यांच्याकडे राहत्या घराचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा तिला आपले एक चित्र भेट म्हणून त्यांनी दिले होते.
त्यांचे पहिलेच एकल चित्र प्रदर्शन १९५२ साली पॅरिसमध्ये झाले. तेव्हा चित्रसमीक्षकांनी त्यांच्या कामाबद्दल फार प्रशंसा केली. तेव्हाची सगळी चित्रे एका पार्सी डॉक्टरने खरेदी केली. शिवाय वास्तव्यासाठी, चित्रसाधना करण्यासाठी एक स्टुडिओही त्यांच्याच बंगल्यात दिला.

पॅरिसमधील त्यांची बहुतेक चित्रे गोव्याच्या आठवणींनी भरलेली होती. गोव्याचा निसर्ग, माणूस आणि इथल्या मातीचा रंग-गंध घेऊन ती निर्माण झालेली होती. भारतीय अभिजात साहित्यावर आधारीत पहिली चित्रमालिका जयदेवच्या ‘गीत गोविंद’ यावर आधारीत होती. या चित्रांत त्यांनी भारतीय लघुचित्रांचा जाणीवपूर्वक उपयोग केला होता.

पॅरिसातील दहा वर्षांच्या वास्तव्यात ते तीन वेळा भारतात येऊन गेले. जेव्हा गोव्याची ओढ अनावर व्हायची तेव्हा अस्वस्थ मनःस्थितीत ते मातृभूमीच्या ओढीने गोव्यात यायचे. १९५६ साली जेव्हा भारतात आले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंची रेखाटने त्यांनी केली. १९५८ साली पॅरिसातच त्यांनी नेहरूंचे आधुनिक शैलीतले तैलचित्र रंगविले. पुढे मुंबईच्या भेटीत १९५८ साली रामायण आणि महात्मा गांधींच्या जीवनावर आधारीत चित्रे त्यांनी रंगविली. बुद्धाच्या जीवनावर १९५९ साली त्यांनी रेखाचित्रे रेखाटली.

भारतात परत
१९६१ व्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईच्या बंदरात ते पोचले तेव्हा गोवा पोर्तुगीज सत्तेतून मुक्त झाले असल्याची बातमी त्यांना समजली आणि त्यांना असीम आनंद झाला.
कालिदासांच्या ‘ऋतुसंहार’ विषयावर त्यांनी निर्माण केलेली चित्रे १९६३ साली राजभवनात प्रदर्शित केली. ती संपूर्ण अमूर्त शैलीतली, जी भारतीय संगीतातल्या रागधारीवर बेतलेली होती. १९६५ साली ही चित्रे त्यांनी दिल्लीतल्या वास्तव्यात रंगविली. एक नवे रंग-तंत्र त्यांनी निर्मिण्यास वापरले.
१९६६ साली ऑगस्ट महिन्यात ते पौर्णिमा नावाच्या युवतीशी विवाहबद्ध झाले आणि एक नवी पौर्णिमा त्यांच्या जीवनात प्रकाशली. १९६९ साली एप्रिल महिन्यात त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव त्यांनी ‘आकाश’ ठेवले. एक विस्तीर्ण आकाश त्यांच्या जीवनात आले होते.

१९७७ साली कला अकादमीच्या ‘गोवा कॉलेज ऑफ आर्ट’ या महाविद्यालयात त्यांनी प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला. मग आपल्या कुटुंबासोबत ते दिल्लीहून गोव्यात आले. येथे त्यांनी या पदाचे सर्वार्थाने सोने केले. कला महाविद्यालयात तसेच गोव्याच्या कला-संस्कृती क्षेत्रात एक नवे चैतन्य संचारले. हे त्यांना एक आव्हान होते. याचे मुख्य कारण म्हणजे येथे पहिल्यांदाच त्यांनी एक नोकरी स्वीकारली ज्यात बरीच बंधने होती. दुसरे म्हणजे इतका काळ एक ‘फ्रीलान्स’ चित्रकार म्हणून ते काम करीत होते. गोव्यात महाविद्यालयाच्या समृद्धीकरिता सगळ्या सरकारी स्तरांतून आणि बाकीच्या संबंधितांकडून त्यांना पूर्ण सहकार्य मिळाले. त्यांनी कला महाविद्यालयाचा तोंडवळाच बदलून टाकला आणि देशातले एक प्रतिष्ठित कला संकुल म्हणून कॉलेजची प्रतिष्ठा वाढली. त्यांच्याच अथक परिश्रमांतून आणि योग्य नियोजनाद्वारे गोवा सरकारच्या सहकार्याने आल्तिनो पणजीच्या कलात्मक वातावरणात नव्या कॉलेजचा प्रकल्प उभा राहिला. यासाठी तेव्हाचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. प्रतापसिंह राणे यांचा सर्वतोपरी आधार त्यांना लाभला. या प्रकल्पाच्या उभारणीचे सर्व श्रेय लक्ष्मण पै यांनाच द्यावे लागेल. १९८७ साली ते परत नवी दिल्लीला गेले. तिथे स्वतःच्या कला दालनात भारती आर्टिस्ट संस्थेचे संस्थापक सदस्य बनले.

योगायोगाने आमचे आदरणीय गुरू श्री. लक्ष्मण पै ज्या वर्षी म्हणजे १९७७ साली तेव्हाच्या कला अकादमीच्या कला महाविद्यालयात प्राचार्य पदावर रूज झाले, त्याच वर्षी या कॉलेजात एक विद्यार्थी म्हणून मी प्रवेश घेतला होता, हे मी माझे परम भाग्य समजतो. पाच वर्षे चित्रकलेच्या अभिजात कला शिक्षणाच्या अभ्यासक्रमात पदवी परीक्षेपर्यंत प्रेरणा देणारे मला हे ऋषितुल्य गुरू लाभले. शिवाय मुंबई विद्यापीठाच्या अंतिम पदवी परीक्षेत मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे मला एका वर्षासाठी कला अकादमीची ‘फेलोशीप’ही प्राप्त झाली. तेव्हाही त्यांचे योग्य असे मागदर्शन मला लाभले होते.

सुरुवातीला १९७३ सालापासून मिरामारच्या ‘सावित्री निवास’ या बंगल्यात आमचे अभिजात आणि उपयोजित चित्रकला वर्ग चालायचे. पै सर त्याच इमारतीत एका बाजूला वरच्या मजल्यावर कुटुंबासहित राहत होते. त्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष लक्ष कॉलेजच्या कारभारावर सतत असायचे. सुमारे दहा वर्षे कॉलेज ऑफ आर्टची निष्ठेने सेवा केल्यावर ते सेवानिवृत्त झाले. स्थापनेच्या वेळी हे कॉलेज कला अकादमी चालवत होती. नंतर गोवा सरकारने ते आपल्या ताब्यात घेतले.

पाच-सहा वर्षांपूर्वी ते अमेरिकेहून गोव्यात एकटेच परत आले. अमेरिकेला ते चिरंजीव आकाश, सून डॉ. निधी आणि दोन नातवंडांसह राहत होते. श्रीमती शाहिस्था थापर- एक नामांकित चित्रसंग्राहक आणि हौशी चित्रकार- यांच्या दोनापावला येथील प्रशस्थ बंगल्यात ते वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत म्हणजेच शेवटच्या श्‍वासापर्यंत समाधानाने चित्रसाधना करीत राहिले. येथे त्यांना पूर्णपणे वडीलकीचा मान लाभला.

गोव्याच्या वास्तव्यात त्यांना गोवा सरकारचा ‘गोमन्त कलाभूषण’ हा सर्वोच्च प्रतिष्ठेचा पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यापूर्वी ‘पद्मश्री’ आणि नंतर इथेच असताना ‘पद्मविभूषण’ हा भारत सरकारचा राष्ट्रीय सन्मान त्यांना प्राप्त झाला. देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते दिल्लीत त्यांना हा किताब देण्यात आला.
पद्मविभूषण लक्ष्मण पै हे कला जगतातले स्वयंतेजाने चकाकणारे एक अद्वितीय नक्षत्र होते. एक कर्मयोगी… कलेचे ध्यानयोगी… हल्लीच त्यांना पर्तगाळ मठातर्फे ‘विद्याधीराज’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री. दिगंबर कामत यांनी त्यांच्या नावाची योग्य शिफारस केली होती.

चार वर्षांपूर्वी एका छोट्याशा चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी ते आमच्या फोंडा येथील ‘बांबोळकर आर्ट गॅलरी’त आले होते त्या प्रसंगी एक उत्कृष्ट रेखाचित्र तिथल्या तिथे रेखाटून त्यांनी मला प्रदान केले. शिवाय त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ ‘माय सर्च… माय इव्हॅल्युशन’ आणि एक अतिसुंदर कॅनव्हासवर रंगविलेले पेंटिंग आमच्या बांबोळकर कुटुंबाला भेट म्हणून त्यांनी दिले. आजवर मला लाभलेल्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा हे चित्र मी मोठे मानतो. अतोनात श्रद्धेने ते मी माझ्या गॅलरीत ठळकपणे टांगले आहे.

असा हा ऋषितुल्य- तपस्वी कलासाधक वयाच्या ९५ व्या वर्षी अनंतात विलीन झाला.

भारतीय रंग, गंध, ताल, रेषांतून कलासृजन त्यांनी जीवनभर घडविले आणि अभिजात प्रतिभेला प्रतिमेची जोड दिली. ‘माय सर्च… माय इव्हॅल्युशन’ हा चित्रमय ग्रंथ त्यांनी एका अदृश्य शक्तीला अर्पण केला होता. सुरुवातीला अर्पणपत्रिकेत त्यांनी लिहिले आहे- ‘टू इनव्हिजिबल एनर्जी’- अदृश्य शक्तीला अर्पण… तसेच शेवटचा श्‍वास घेण्यापूर्वी त्यांचा चिरंजीव आकाश याच्यासाठी त्यांनी एक रेखाचित्र रेखाटून ठेवले. त्यावर लिहिलेला संदेश पुष्कळ काही सांगून जातो. त्यांच्या जीवनाचे अद्भुत तत्त्वज्ञान त्यात जाणवते. त्यांनी लिहिले आहे- ‘हसत रहा…’ आणि प्रत्येक क्षण तेही हसतच राहिले. ते दैववादी नव्हते, परंतु श्रद्धाळू नक्कीच होते. ती अदृश्य शक्ती ते जिथे असतील तिथे त्यांना सदैव हसतमुख ठेवो ही त्याकडे मनोमन प्रार्थना!

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

वाया (न)गेलेले एक वर्ष

डॉ. मधू स. गा. घोडकीरेकर नाव ‘कोविड-१९’ असले तरी या विषाणूने सन २०२० वर एकतर्फी राज्य केले. हे...

निर्णायक लढाईची वेळ

दत्ता भि. नाईक अतिशय घनदाट जंगलांत माओवाद्यांना शस्त्रे कोण पुरवतो याची कसून चौकशी झाली पाहिजे. अग्निशेष, ऋणशेष आणि...

बदलते बँकिंग क्षेत्र

शशांक मो. गुळगुळे मोबाईलने जसे मनगटावरचे घड्याळ घालविले, कॅमेरे गळ्यात घालून फिरणे घालविले तसेच ग्राहकांना बँकेपर्यंत जाण्याचा त्रास...

ऋतुराज आज वनी आला…

मीना समुद्र हा उदारात्मा वसंत चेतोहर, मनोहर असतो. त्यामुळेच त्याला ‘ऋतुराज’ ही पदवी बहाल झालेली आहे. चैत्रातले त्याचे...

दर्यादिल राजकारणी

वामन सुभा प्रभू(ज्येष्ठ पत्रकार) २२ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास माझ्या मोबाईलवर झळकलेला हा संदेश मागील सहा-सात दिवसांत...