पाकिस्तानच्या इशारेवजा वल्गना
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय हद्दीत हल्ले करीत वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करूनही पाकिस्तानने आपली शिरजोरी दाखविणे चालू ठेवली आहे. अशा उल्लंघनांना उत्तर देणार्या भारतीय सैनिकांकडून पाक रेंजर्सच्या दोघांना ठार करण्यात आल्यामुळे आता पाकिस्तानने ‘भारताला त्यांना कळणार्या भाषेतच उत्तर देऊ’ अशा वल्गनांसह धमकावण्यास प्रारंभ केला आहे.इशारेवजा धमक्यांचे वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी काल येथे केले. आसिफ म्हणाले, ‘गेल्या सहा-सात महिन्यांपासून आम्ही भारताबरोबरील संबंध सुधारण्यासाठी व पर्यायाने शांतता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आता असे दिसत आहे की त्यांना ही भाषा समजत नाही.’ पाक संसदेबाहेर प्रसारमाध्यमांसी बोलताना ते पुढे म्हणाले, आता आम्हाला भारताशी त्यांना कळेल अशा भाषेत बोलावे लागेल.’ गेल्या ३१ डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेनजीक पाक सैन्याच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाक सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिले व त्यात पाक रेंजर्सचे दोन सैनिक ठार झाले होते. त्यामुळे डिवचलेल्या आसिफ यांनी वरील वक्तव्य केले आहे.
या चकमकींनंतर आपण हा विषय सर्व पातळ्यांवर नेला. पाक रेंजर्सपासून बीएसएफपर्यंत विषय नेण्यात आला. राजनैतिक पातळीवरही नेण्यात आला, असेही आसिफ म्हणाले.

