27 C
Panjim
Tuesday, October 27, 2020

भारतातील वृक्षविशेष

  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

नारळीचे झाड मूळचे कुठले याविषयीचा थांगपत्ता लागत नाही. काहीजण ते दक्षिण अमेरिकेतील असावे असा अंदाज व्यक्त करतात. हिंदी महासागराच्या कोकोस बेटांवरून हे झाड इतरत्र आले असावे असे मानतात.

बोरीचे झाड हे मूळचे भारतातील आहे. त्याच्या आसपासच्या देशांतही आढळते. हे झाड जंगलात आणि बागेत वाढते. त्यांच्या बिया सहज रुजतात, त्यामुळे ते सहसा कुणी बागेत लावत नाही. चवदार आणि टपोर्‍या फळाच्या या झाडाला अणकुचीदार काटेही असतात. या झाडाचा आकार लहान अथवा मध्यम असतो. क्वचित छत्रीच्या आकाराची बोरीची झाडे विस्तारत गेलेली दिसून येतात. हे पानझडी झाड आहे. बोरे ही लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच प्रिय असतात, त्यामुळे सर्व वयोगटाची माणसे बोरांच्या मोसमात या झाडाखाली गोळा होतात. शालेय मुलांच्या कैक आठवणी बोरीच्या झाडांशी निगडित असतात.

रामायणातदेखील शबरी या भिल्लिणीने भक्तिभावाने दिलेली उष्टी बोरे रामाने मोठ्या प्रेमाने खाल्ली अशी मिथ्यकथा आहे. शालेय वयात शकुंतला परांजपे यांचा ‘भिल्लिणीची बोरे’ हा ललित निबंधसंग्रह वाचला होता, त्याची येथे आठवण होते. कलम पद्धतीने लागवड केलेल्या बोरीची फळे मोठ्या आकाराची असतात. पण नैसर्गिक अशा छोट्या बोरांची सर या मोठ्या आकाराच्या फळांना नाही. बोरांचा आपण आपुलकीने आस्वाद घेतो. बोरीच्या काटेरी फांद्यांचा कुंपणासाठी उपयोग होतो. त्याच्या लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे बनवण्यासाठी तसेच सरपणासाठी होतो.

नारळीचे झाड मूळचे कुठले याविषयीचा थांगपत्ता लागत नाही. काहीजण ते दक्षिण अमेरिकेतील असावे असा अंदाज व्यक्त करतात. हिंदी महासागराच्या कोकोस बेटांवरून हे झाड इतरत्र आले असावे असे मानतात. भारतात नारळाची झाडे गेल्या कित्येक शतकांपासून आहेत. सर्वत्र उष्ण-दमट हवामानाच्या प्रदेशांत विशेषतः समुद्रसपाटीच्या वालुकामय प्रदेशांत या झाडाची लागवड केली जाते. निदान भारतासारख्या देशात नारळ आणि नारळाचे झाड यांची वेगळी महती सांगायला नको. तो ‘कल्पवृक्ष’ आहे. नारळाला ‘श्रीफळ’ असे म्हटले जाते. नारळाच्या झाडाला फळ यायला बराच कालावधी लागतो. अलीकडच्या काही कलमी झाडांना मात्र पाच वर्षांतच फळे येऊ लागतात. झाड दहा वर्षांचे झाले की त्याला पुष्कळ झावळ्या येतात. हे झाड खूप उंच असते. या झाडाची साल गडद करड्या-तपकिरी रंगाची असते. झावळ्या खूप मोठ्या आणि मोरपिसासारख्या देखण्या असतात. उंच वाढलेला माड पाहणे हा एक आनंदानुभव असतो. शेंड्यावर अनेक नारळांनी ते लगडलेले असते. हे वैभवदेखील आगळ्या-वेगळ्या अनुभूतींचे. म्हणूनच तर कोकणभूमीत जन्म घेतलेल्या विंदा करंदीकर यांच्यासारख्या प्रज्ञावंत अन् प्रतिभावंत असलेल्या कवीने ‘हे माडांनो!’ या एकाच शीर्षकाच्या भिन्न भाववृत्ती प्रकट करणार्‍या दोन कविता अनुक्रमे १९४९ आणि १९५८ मध्ये लिहिल्या. पहिल्या कवितेत त्यांनी ‘शांतीचे प्रेषित’, ‘चित्स्वरूपाचे चिंतक’, ‘थोर तपस्वी मुनिवर’, ‘नारळरूपी रुद्राक्षांच्या सुंदर माळा धारण केलेले स्थितप्रज्ञ’ या समर्पक प्रतिमांकित शब्दांनी माडांना गौरविले आहे. स्वभूमीशी पक्की मांड बसलेली असल्यामुळेच विंदा करंदीकरांची प्रतिभा सदैव उन्मेषशालिनी राहिली. निसर्ग हा सृजनात्मकतेचा मूलस्रोत बनला. बोरकरांच्या कवितेतूनही माडांची अनेकविध चित्रे दिसतात.

माडांविषयी आणि त्यांच्या विविधांगांच्या उपयुक्ततेविषयी जितके सांगावे तितके थोडेच! सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या परिसरात पाहिलेला दोन फांद्यांचा अपवादात्मक माड मनात घर करून राहिला आहे.
जांभूळ हे झाड मूळचे भारत, ब्रह्मदेश, श्रीलंका आणि मलेशिया इथलेच. अति कोरडे आणि डोंगराळ प्रदेश सोडले तर आपल्या देशात ते सर्वत्र आढळते. हे उंच आणि सदाहरित झाड. बर्‍याच वेगवेगळ्या परिस्थितीत ते वाढू शकते. ते चांगले दणकट असते. त्याची साल फिकट किंवा गडद तपकिरी रंगाची, खरबरीत आणि जाड असते. तिचे ढलपे निघतात. त्यांच्या फांद्या खूप उंचावर फुटतात आणि त्यांच्यावर खूप दाटीवाटीने पाने येतात. त्याची फुले हिरवट पांढर्‍या रंगाची आणि इवलीशी असतात. पानाच्या खाली फुटणार्‍या देठांवर या फुलांचे गुच्छ येतात. त्यांना गोड वास येतो. साधारणतः जून-जुलैत जांभळे पिकतात. कधीकधी त्याअगोदरही ती पिकतात. ती पिकली की गर्द जांभळी होतात. पिकलेली जांभळे अतिशय रसाळ आणि मधुर असतात. माणसांप्रमाणेच प्राणि-पक्षी यांनाही ती फार आवडतात. यासंदर्भातील पंचतंत्रातील वानर आणि मगर यांची गोष्ट कोण बरे विसरू शकेल?
जांभळे पिकली की बदाबदा खाली पडतात अन् फुटतात. फुटलेल्या जांभळांचा खच झाडाखाली पडलेला असतो. शिवाय मुलांना झाडांवर दगड मारून जांभळे पाडण्याचा मोह होतोच. रस्त्याच्या दुतर्फा सावलीसाठी जांभूळवृक्षाची लागवड केली जाते. जांभूळ हे औषधी फळ आहे. मधुमेहावर ते गुणकारी समजले जाते. इमारतीसाठी याच्या लाकडाचा सर्रास वापर आजमितीला होत आलेला आहे.
शेवग्याचे झाड मूळचे पश्‍चिम हिमालयातले. पण आता ते संपूर्ण भारतात आणि उष्ण कटिबंधात आढळते. नदी-नाल्याच्या काठावरच्या प्रदेशांत ते विशेष बहरास येते. हे झाड छोटे, नाजूक, भरभर वाढणारे, पानझडी आहे. त्याचे आयुष्य सरासरी पंचवीस वर्षे असते. या झाडाचे लाकूड ठिसूळ असते. ते लवकर मोडते. या झाडावर फुलांचे लांबट गुच्छ असतात. यांच्या फुलांत आणि पानांत भरपूर जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे त्यांचा भाजीसाठी सर्रास वापर होतो. शेवग्याच्या शेंगा लांबसडक व हिरव्या असतात. याच्या मांसल भागात बिया आणि गर असतो. प्रत्येक बीला तीन बाजूंना तीन छोटेसे पातळ पापुद्रे असतात. शेवग्याच्या शेंगांची भाजी लोकप्रिय आहे. य. गो. जोशी यांची ‘शेवग्याच्या शेंगा’ ही लघुकथा सर्वश्रुत आहे. एका दुःखद प्रसंगानंतर भावाभावांमध्ये निर्माण झालेला कलह शेवग्याच्या शेंगांमुळे मिटतो असे तिचे आशयसूत्र आहे.

चिंचेचे झाड हे मूळचे मध्य आफ्रिकेतले. ते भारतात कसे काय आले याविषयीची निश्‍चित माहिती उपलब्ध नाही. उष्ण कटिबंधाच्या सर्व देशांत ते आढळते. हे हळूहळू वाढत जाणारे झाड आहे. ते खूप मोठे आणि उंच असते. त्याचा बुंधा छोटा असतो आणि त्याच्यावर फांद्या आणि पाने यांचा डेरा असतो. या झाडात आम्ल बर्‍याच प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सावटाखाली अन्य छोटी झाडे वाढू शकत नाहीत. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात एप्रिल ते जून या कालावधीत याची पाने गळून जातात. लगेच नवी पालवी फुटते. छोट्या पर्णिकांनी मिळून पान बनते. या पर्णिका जाडसर असतात. त्या सुरुवातीला तजेलदार हिरव्या रंगाच्या असतात. पण लवकरच त्यांचा रंग गडद होऊ लागलो आणि नंतर त्या निस्तेज मळकट हिरव्या रंगाच्या होतात. या झाडाला फुले येतात. पण ती सहसा लक्षातही येत नाहीत. पण ती खूप सुंदर आणि सुगंधी असतात. ती गुलाबी, बैंगणी किंवा फिकट पिवळ्या रंगाची असतात. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात आणि बर्‍याचदा त्यानंतरही ही फुले येतात. पिकलेल्या चिंचांचे आकडे निरनिराळ्या आकाराचे असतात. काही लांब आणि सरळ, तर काही वळलेले, काही छोटे आणि चपटे. चिंचेच्या आकड्याचे कवच सुरुवातीला हिरवे असते. मागाहून त्यावर तपकिरी छटा असलेली लव असते. नंतर हे कवच गडद तपकिरी किंवा लालसर काळे होते. हे कवच सहज फुटणारे असते. कवचाच्या आत गर असतो. त्याची चव आंबट-गोड असते. गराच्या आत बिया असतात. या बियांना चिंचोके म्हणतात. चिंचेच्या लाकडाचा उपयोग कोळसा, कुंभाराचे चाक फिरविण्याची काठी, लाकडी हातोडा आणि फर्निचर बनविण्यासाठी करतात.

चिंचेचा उपयोग मुख्यत्वे करून स्वयंपाकात- आमटीसाठी- करतात. चिंचोक्यांचे पीठ करून त्याच्या चपात्याही केल्या जातात. कापड कडक करण्यासाठी लागणारी कांजी (स्टार्च) बनविण्यासाठी या पिठाचा उपयोग होतो. वस्त्रोद्योगातही या पिठाचा उपयोग होतो. चिंचोक्यांमध्ये ‘पेक्टिन’ हे रासायनिक द्रव्य असते.

दैनंदिन जीवनाबरोबरच धार्मिक जीवनातही चिंचेचे महत्त्व आहे. तुलसीविवाहाच्या शुभ घटकेला तुलसीवृंदावनात ऊस, दिनोची काठी यांसह कच्च्या चिंचा आणि आवळे ठेवण्याचा संकेत पाळला जातो.
कोकण, गोवा आणि कारवार तसेच केरळमधील पश्‍चिम किनारपट्टीच्या प्रदेशांत आंब्याप्रमाणेच फणस हे लोकप्रिय फळ आहे. फणसाचे झाड सदाहरित असते. त्याचे खोड काळ्या रंगाचे, क्वचित ठिकाणी पापुद्रे गेल्यामुळे लाल तपकिरी रंगाचे दिसते. दाट तजेलदार हिरवा पर्णसंभार असतो. नव्याने बहरात आलेल्या फणसाच्या वृक्षावर आणि जुन्या खोडांवरदेखील फणस लटकलेले असतात. हा लेकुरवाळा फणसवृक्ष अत्यंत देखणा असतो. फणसाचे प्रामुख्याने ‘रसाळ’ आणि ‘कापा’ असे दोन प्रकार आहेत. एप्रिल-मेच्या मोसमात आंब्याप्रमाणे खवैय्यांची फणसांवर उडी पडत असते. साठे आणि सुकविलेले गरे यांमुळे वर्षभराची बेगमीही होत असते. काही ठिकाणी चाराच्या पानांप्रमाणे फणसाच्या पानांच्या पत्रावळी केल्या जातात. याच्या लाकडाचा उपयोग त्याच्या टिकाऊपणामुळे फर्निचर करण्यासाठी होतो. त्याचा रंग पिवळसर असतो.

कच्च्या फणसाची भाजी गोमंतकात आणि अन्य ठिकाणी लोकप्रिय आहे. फणसाचा अवशिष्ट भाग- ज्याला चार म्हटले जाते, तो गुरांना पेंडीसह चारा म्हणून दिला जातो.

सुरूचे झाड मूळचे ऑस्ट्रेलियामधले. आता भारताच्या संपूर्ण किनारी प्रदेशात ते आढळते. भरपूर सूर्यप्रकाश आणि वालुकामय जमीन त्याला अनुकूल ठरते. समुद्रकिनार्‍यावर मोकळ्या जागेत ते जोमाने वाढते. निळ्या समुद्राच्या फेसाळणार्‍या लाटा, भव्य किनारा आणि त्यावरील सुरूंचे बन यांमुळे त्या आसमंताची शान वाढते. शिवाय समुद्राची गाज, लाटांचे नर्तन आणि वार्‍याच्या लहरींबरोबर सुरूवृक्षांच्या शंकूच्या आकाराच्या तुर्‍यांना प्राप्त झालेली लय हे दृश्य मनोहारी असते. गोव्यातील तळपणच्या किनार्‍यावर, अन्य काही ठिकाणी आणि पेडणे महालातील केरीच्या किनार्‍यावर सुरूंचे विस्तीर्ण पट्‌ट्यातील बन लक्ष वेधून घेते. त्यामुळे त्या किनार्‍याचे वैभव वाढलेले आहे. कोकणच्या समुद्रकिनार्‍यावर सुरूंची बने मोठ्या प्रमाणात आढळतात. शिरोड्याच्या समुद्रकिनार्‍यावर काजूची झाडे आणि सुरूंचे बन आहे. भाऊसाहेब खांडेकरांचे ते साहित्यचिंतनाचे सुखनिधान होते आणि चिंतनासाठी एकान्तस्थळीची भिकेडोंगरीही त्यांना अत्यंत प्रिय होती.

सुरू वृक्ष अनेक दृष्टींनी उपयुक्त आहे. तो पर्यावरणाचा समतोल सांभाळतो. उष्ण कटिबंधात जमिनीची धूप थांबविण्यासाठी या झाडाचा उपयोग करतात. काही ठिकाणी ही झाडे ठराविक उंचीवर कापून त्यांचा कुंपण म्हणून उपयोग करतात. काही ठिकाणी इमारतींसाठी फारशीऐवजी या वृक्षाच्या लाकडी फळ्या वापरतात. सुरूच्या सालीपासून तयार केलेला रंग कोळी लोकांची जाळी रंगविण्यासाठी करतात.
* संदर्भ ः १. प्रमुख भारतीय वृक्ष ः पिप्पा मुखर्जी, २. भारतातील सर्वसामान्य झाडे- प्रीतमलाल वि. बोले आणि योगिनी वाघानी, डब्ल्यू.डब्ल्यू.एफ.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

दसरा आणि सीमोल्लंघन

प्रा. रमेश सप्रे पूर्वीची सांस्कृतिक कोवळीक जाऊन आजकाल याला बाजारू स्वरूप आलंय. संस्कृती कुठे नि केव्हा निसटली हे...

सांवल्यांचें गाणें

डॉ. सोमनाथ कोमरपंत जास्तीत जास्त सुलभ शब्दांमधून भाषेचा गोडवा अनुभवायला लावणारी, अवतीभवतीच्या निसर्गाविषयी ओढ लावणारी, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव...

घसरलेल्या व्याजदरांमुळे वैयक्तिक बचतीत घसरण

शशांक मो. गुळगुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळावी म्हणून घसरलेल्या व्याजदरांमुळे जनतेचे उत्पन्न कमी झाले आहे. पण उद्योगधंद्याना उभारी मिळावी...

मीलन प्रकृती-पुरुषाचे

पौर्णिमा केरकर जमिनीत जे पिकलेले आहे त्याला मातृतत्त्व आणि पुरुषतत्त्वांच्या मीलनाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ग्रामदेवी सातेरी स्त्रीतत्त्वाचे प्रतीक...

दसरा सण मोठा…

मीना समुद्र घट हे मानवी देहाचेच प्रतीक आणि तेवता दीप म्हणजे त्या देहात जागणारे चैतन्य. ते चैतन्य कामाधामातून...

ALSO IN THIS SECTION

दसरा आणि सीमोल्लंघन

प्रा. रमेश सप्रे पूर्वीची सांस्कृतिक कोवळीक जाऊन आजकाल याला बाजारू स्वरूप आलंय. संस्कृती कुठे नि केव्हा निसटली हे...

सांवल्यांचें गाणें

डॉ. सोमनाथ कोमरपंत जास्तीत जास्त सुलभ शब्दांमधून भाषेचा गोडवा अनुभवायला लावणारी, अवतीभवतीच्या निसर्गाविषयी ओढ लावणारी, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव...

घसरलेल्या व्याजदरांमुळे वैयक्तिक बचतीत घसरण

शशांक मो. गुळगुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळावी म्हणून घसरलेल्या व्याजदरांमुळे जनतेचे उत्पन्न कमी झाले आहे. पण उद्योगधंद्याना उभारी मिळावी...

मीलन प्रकृती-पुरुषाचे

पौर्णिमा केरकर जमिनीत जे पिकलेले आहे त्याला मातृतत्त्व आणि पुरुषतत्त्वांच्या मीलनाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ग्रामदेवी सातेरी स्त्रीतत्त्वाचे प्रतीक...

दसरा सण मोठा…

मीना समुद्र घट हे मानवी देहाचेच प्रतीक आणि तेवता दीप म्हणजे त्या देहात जागणारे चैतन्य. ते चैतन्य कामाधामातून...