भारताच्या खात्यात एकूण २० पदके

0
101

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेची सांगता २० पदकांसह केली. काल सोमवारी अखेरच्या दिवशी सत्येंद्र सिंग व संजीप राजपूत यांनी ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. भारताने या स्पर्धेत ६ सुवर्ण, ७ रौप्य व ७ कांस्यपदकांची कमाई केली.

सत्येंद्र व राजपूतसह चैन सिंग यानेदेखील थ्री पोझिशन्स प्रकाराच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. सत्येंद्रने ११६२ गुणांसह तर अनुभवी राजपूतने ११५८ गुण घेत तिसर्‍या स्थानासह अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. पात्रता फेरीत चैन यानेदेखील राजपूतएवढेच गुण घेतले. परंतु, त्याची १० गुणांची संख्या कमी असल्याने चौथा क्रमांक मिळवून त्याने ८ खेळाडूंच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम फेरीत सत्येंद्रने ४५४.२ तर राजपूतने ३५३.२ गुण घेत उत्तम कामगिरी केली. चैनला तिसरे स्थान मिळविण्याची संधी होती. पण, ऑस्ट्रेलियाच्या डॅन सम्पसन याने त्याला मागे टाकत कांस्यपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात बिरेनदीप सोधी याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविणारा तो एकमेव भारतीय खेळाडू होता.