भारताचे सलग दोन पराभव

0
161

नेशन्स कप ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसर्‍या व चौथ्या फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. युरोप व चीन संघाविरुद्ध भारताचा २.५-१.५ अशा समान फरकाने पराभव झाला.
चीनविरुद्धच्या लढतीत भारताच्या विश्‍वनाथन आनंद याने आपल्यापेक्षा सरस प्रतिस्पर्धी असलेल्या डिंग लिरेन याच्याविरुद्धचा पहिला डाव ५४ चालींत बरोबरीत सोडवला. पी. हरिकृष्णा यानेदेखील आपल्यापेक्षा वरचढ यू यांग यी याला गुण विभागून घेण्यास भाग पाडले. कोनेरू हंपी व तिची पारंपरिक प्रतिस्पर्धी होऊ यिफान यांच्यातील डावदेखील बरोबरीत सुटला.

भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू विदित गुजराती याला स्पर्धेतील सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. वांग हाओविरुद्धच्या या पराभवामुळे चीनने लढत २.५-१.५ अशी खिशात घातली. तत्पूर्वी, तिसर्‍या फेरीत युरोपविरुद्ध गुजराती याचा लेवोन अरोनियन याच्याविरुद्धचा झालेला पराभव भारतासाठी मारक ठरला.
पहिल्या बोर्डवर विश्‍वनाथन आनंदने मॅक्सिम वाचिएर लाग्रेवला बरोबरीस भाग पाडले. हरिकृष्णाने जान क्रिस्तोफ डुडा याला तर हंपीने ऍना मुझिचुक हिच्याविरुद्ध डाव बरोबरीत सोडवला.