भारतच मॅच फिक्सिंग माफियांचे आश्रयस्थान

0
177

>> आकिबने केले खळबळजनक आरोप

मॅच फिक्सिंगमुळे गेल्या काही वर्षात पाकिस्तानी क्रिकेटचे नाव बदनाम झालेले आहे. नुकताच त्यांचा आक्रमक सलामीवीर फलंदाज उमर अकमल हा दोषी आदळून आलेला आहे. असे असूनही पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आकिब जावेदने मात्र खळबळजनक आरोप केले आहेत. भारत हेच मॅच फिक्सिंग माफियांचे आश्रयस्थान असल्याचा आरोप त्याने केला आहे.

आकिब जावेदने १९९०च्या दशकात मॅच फिक्सिंगबद्दल आवाज उठवला होता. वसीम अक्रम, वकार युनिस, सलीम मलिक या खेळाडूंचे मॅच फिक्सिंग संदर्भात नाव घेतल्यानंतर अकीब जावेदला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या, असे त्याने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंगची बरीच प्रकरणे उपस्थित झालेली आहे. त्यामुळे या मॅच फिक्सिंग माफियांचे आश्रयस्थान भारतच आहे, असा आरोप आकिबने केला.

जे लोक त्यांच्याविरोधात आवाज उठवतात त्यांची कारकीर्द कोणत्या ना कोणत्या प्रकारे संपवून टाकली जाते. मला मॅच फिक्सिंगविरोधात बोलल्यानंतर फिक्सर्सकडून अनेकदा धमकीचे फोन आले होते. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकही दिली होती. मॅच फिक्सिंग करण्यासाठी केवळ चार-पाच खेळाडूंची गरज असते आणि १९९०च्या दशकात ते फार कठीण नव्हते, असे अकीब जावेद म्हणाला.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ज्या प्रकारे मॅच फिक्सिंगचा आरोप असलेला मोहम्मद आमीर याला पुनरागमनाची संधी दिली, ते पाहून तर मॅच फिक्सिंग करणार्‍यांना प्रोत्साहनच मिळेल. बर्‍याच वेळा संघाकडे दमदार कामगिरी करणारे खेळाडू होते, पण अनेक वेळा संघाने जाणूनबुजून वाईट खेळ केला, असा आरोपही त्याने केला.