भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस
पणजी पोटनिवडणुकीसाठीचा आपला जाहीरनामा काल जाहीर करताना भाजपने पणजी हे एक स्मार्ट शहर बनवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात सदर मुद्द्याला सर्वांत वरचे स्थान दिले आहे.यासंबंधी माहिती देताना भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळयेकर म्हणाले की, पणजी शहर सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज व स्मार्ट शहर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. सुरळीत वाहतूक, स्वच्छ परिसर, पार्किंगची सोय, पाटो प्लाझा ते मळा भागाला जोडणारा नवीन नेवगीनगर पूल, बांबोळी ते दोनापावला चौपदरी रस्ता पूर्ण करणे, शहरा अंतर्गत फिरती बस सेवा जाळे, कांपाल येथे फुटबॉल मैदान, रुआ-द-औरे खाडीच्या तटावर फूड कोर्ट व म्युझिकल फाउंटेन, मळा तलावाचा विकास व पीडीए बाजार संकुल पूर्ण करून ५० टक्के दुकाने मळ्यातील रहिवाशांना राखून ठेवणे, पणजीत बाजार संकुलाच्या तिसर्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण करणे, रायबंदर येथे नवीन सुसज्ज मासळी बाजार, दर्जात्मक वीज पुरवठ्यासाठी रायबंदर येथे भू अंतर्गत स्मार्ट ग्रीड उभारणी, विजेची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन ईडीसी वीज उपकेंद्राचे जीआयएस वीज उपकेंद्रात रुपांतर, पणजी शहरात पाण्याची नवीन पाईपलाईन पणजीतील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ओपा पाणी प्रकल्पात वाढ, रायबंदर येथे नवीन सांडपाणी, निचरा प्रकल्प, पाटो येथील कचरा प्रकल्पाचे स्थलांतर, वाहतुकीवर आणि सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, आमदाराच्या पणजीतील कार्यालयातून नागरिकांच्या अडचणी आणि समस्या ऐकून घेण्यासाठी नागरिक केंद्रित मदतवाहिनी, महत्त्वाच्या ठिकाणी वायफाय, कदंब बसस्थानकावर संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस चौकी, मिरामार किनारा, पाटो पुलाखाली स्थानिक जातीची झाडे लावून शहराचे गार्डन सीटीत रुपांतर, सांतइनेज नाल्याची साफसफाई, मतदारसंघातील पूरप्रवण विभागात पूरनियंत्रणासाठी आवश्यक त्या पूरनिवारण उपाययोजना व आकस्मिक निर्माण होणार्या संकटांना तातडीने तोंड देण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन योजना आराखडा अशा आश्वासनांचा पाऊसच जाहीरनाम्यात पाडण्यात आला आहे.
पणजी शहरातील नागरिकांशी चर्चा करूनच हा जाहीरनामा तयार करण्यात आला असल्याचे यावेळी बोलताना सिद्धार्थ कुंकळयेकर व प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. रुफीन मोंतेरो, वनिता भिंगी, पांडुरंग कवळेकर, शेख शौकत अली, अरुण नारायणदास, सज्जन वेर्लेकर, वैदेही नाईक व पुंडलिक राऊत देसाई हे उपस्थित होते.

