भाजप प्रवेशाचे वृत्त खोटे : गोविंद गावडे

0
12

प्रियोळ मतदारसंघाचे आमदार व मंत्री गोविंद गावडे हे आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, गावडे यांनी नंतर याविषयी खुलासा करताना हे वृत्त खोटे, निराधार व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोविंद गावडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा बर्‍याच महिन्यांपासून चालू आहे. गोविंद गावडे हे मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त काल व्हायरल झाले होते. मात्र, नंतर गावडे यांनी या वृत्ताचा इन्कार केला.

निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपली असल्याने विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळेच ते आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा पसरवू लागले आहेत, अशी प्रतिक्रिया गावडे यांनी दिली.

भाजप सोडणार नाही : काब्राल
वीजमंत्री नीलेश काब्राल हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त सोमवारी सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र काब्राल यांनी कॉंग्रेस पक्ष प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले आहे. भाजपला सोडचिठ्ठी देणार हे वृत्त खोडसाळ व दिशाभूल करणारे आहे. आपण भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असून, भाजप सोडून कुठेही जाणार नाही, असे काब्राल यांनी स्पष्ट केले.