ज्येष्ठ भाजप नेते व गोवा प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष अनिल रघुवीर होबळे (70) यांचे काल दुपारी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. शनिवार दि. 26 रोजी सकाळी 11 वाजता मेरशी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 2015 ते 2019 या काळात ते गोवा प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष होते. तसेच भंडारी समाजाचे नेते असलेले अनिल होबळे हे 2009-2018 पर्यंत भंडारी समाजाचे उपाध्यक्ष होते. होबळे यांनी तीन वेळा सांताक्रूझ मतदारसंघातून गोवा विधानसभेची निवडणूक लढवली होती. 1994 साली त्यांनी अपक्ष म्हणून, तर 1999 साली मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. 2002 साली भाजप उमेदवारीवर निवडणूक लढवली होती; पण तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2002 साली त्यांचा अवघ्या 40 मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी व्हिक्टोरिया फर्नांडिस या विजयी झाल्या होत्या. अनिल होबळे यांनी गोव्यात भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी मोलाची कामगिरी बजावली होती. होबळे यांनी गोवा राज्य अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे अध्यक्षपदही भूषवले होते. त्यावेळी त्यांनी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी भरीव असे कार्य केले होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजपच्या विविध नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

