भाजप गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकेल ः डॉ. सावंत यांचा दावा

0
9

>> दिवाडी येथे भाजपच्या निवासी शिबिरास प्रारंभ

राज्यभरात सर्वत्र भाजपचे कार्य पोहोचले असून आगामी लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपचा विजय निश्‍चित आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या राज्यस्तरीय तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना दिवाडी – ओल्ड गोवा येथे काल केले.

या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, शिबिराचे समन्वयक गोरख मांद्रेकर आदींची उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या अनेक योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. सरकारच्या विविध योजना पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे. भाजपने सासष्टी तालुक्यात प्रवेश केला आहे. नावेली मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आला आहे. आता सासष्टी तालुक्यात भाजपचे आणखी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकार या डबल इंजीन सरकारमुळे गोवा राज्य विकासामध्ये पुढे जात आहे. कॉँग्रेस म्हणजे घोटाळा आणि भाजप म्हणजे विकास योजना, कॉंग्रेस पक्षाकडे ध्येयधोरण, नेते आणि नवीन संकल्पना नाहीत. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजप विजय निश्‍चित आहे, असे भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी सांगितले.

या शिबिरात भाजपचे मंत्री, आमदार, राज्य कार्यकारी सदस्य, विविध मोर्चांचे प्रमुख सहभागी झाले आहे. या निवासी शिबिरात संघटनात्मक बांधणी आणि इतर विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या तीन दिवसीय निवासी शिबिरात एकूण १५ सत्रे घेतली जाणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.