भाजपातील फेरबदल

0
21

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सात महिन्यांपूर्वी स्वीकारलेल्या नितीन नबीन यांनी पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी अखेर काल घोषित केली. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डा यांनी नियुक्त केलेल्या मागील कार्यकारिणीपेक्षा ही नवी कार्यकारिणी कशी आणि किती वेगळी आहे त्याची छाननी आता सुरू झाली आहे. एकूण पाहिले तर काही ठळक गोष्टी नजरेत भरतात, ज्यांची दखल घ्यावीच लागेल. सर्वांत लक्षवेधी बाब म्हणजे अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर आपले केंद्रीय मंत्रिपद गमवावे लागलेल्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पक्षामध्ये दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा सन्मानाचे स्थान मिळाले आहे. स्मृती इराणींचे मंत्रिपद गेल्यानंतरही त्या गप्प बसल्या नव्हत्या. पक्षाच्या प्रचार मोहिमांमध्ये त्या सदैव सक्रिय राहिल्या. विशेषतः पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पक्षप्रचारातील त्यांचा सहभाग विलक्षण प्रभावी ठरला होता. त्या निवडणुकीत भाजपकडे त्या राज्याची सत्ता आली. त्या ऐतिहासिक विजयात योगदान दिल्याची बक्षिसी इराणी तसेच त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री राहिलेले बिप्लवकुमार देव यांना मिळाली आहे. स्मृती इराणींची राष्ट्रीय सरचिटणीसपदी झालेली निवड महिलांना भाजप किती मानाचे स्थान देतो ह्याची साक्ष देणारी आहे. ह्या फेररचनेतील दुसरी सर्वांत लक्षवेधी बाब आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले नेते राममाधव यांची पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणीत झालेली निवड. सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना एका बड्या उद्योगसमूहाला कंत्राट मिळावे म्हणून रा. स्व. संघाचे एक नेते आपल्याला येऊन भेटले होते असा आरोप मलिक यांनी केला होता. तो निर्देश राममाधव यांच्याकडे होता असे मानले गेले. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डा यांनी आपली टीम निवडताना राममाधव यांना बाजूला सारले होते. मात्र, नितीन नबीन यांनी राममाधव यांना पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आणले आहे. पूर्वी ते पक्षाचे सरचिटणीस राहिले होते आणि जम्मू काश्मीर, तसेच ईशान्य भारतात त्यांनी पक्षाचे काम वाढवले. जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांच्याच रणनीतीमुळे पक्षाला भरघोस जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्याची बक्षिसी राममाधव यांना पुन्हा एवढे मोठे पद देऊन दिली गेली आहे. एकीकडे नेत्यांना बक्षिसी देत असताना, दुसरीकडे कामात कमी पडलेल्या नेत्यांना समितीमधून नारळ देण्यासही भाजपने मागेपुढे पाहिलेले नाही. अमित मालवीय हे गेली अकरा वर्षे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख होते. अलीकडेच जेन झी चे आंदोलन झाले, त्यात भाजप आणि जेन झी यांचे नाते पार तुटलेले असल्याचे अधोरेखित झाले. त्यामुळेच बहुधा मालवीय यांची त्या पदावरून गच्छन्ती करण्यात आली आहे आणि छत्तीसगढचे दीपक म्हस्के यांच्याकडे ते पद दिले गेले आहे. मात्र, ह्यावेळी केवळ आयटी विभाग असे न संबोधता समाजमाध्यमांचे प्रमुखपद अधोरेखित केले गेले आहे. तेजस्वी सूर्या यांच्याजागी भाजयुमो प्रमुख म्हणून हेमांग जोशी यांना आणले गेले आहे. भाजपच्या नव्या कार्यकारिणीमधील एक नाव लक्षवेधी आहे ते आहे बी. एल. संतोष यांचे. नड्डा यांच्या कार्यकारिणीतही ते राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) ह्या महत्त्वाच्या पदावर होते आणि नितीन नबीन यांनीही त्यांना त्या पदावर कायम राखून त्यांच्या कार्याची पोचपावती दिली आहे. पक्षाचे रणनीतीकार म्हणून बी. एल. संतोष यांनी आजवर वेळोवेळी बजावलेल्या कामगिरीची ही पोचपावतीच मानावी लागेल. संसदेचे पावसाळी अधिवेशन आटोपल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होतील अशी अपेक्षा होती. अजून तरी त्याबाबत काही संकेत मिळालेले नाहीत, परंतु पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदारपदी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची झालेली निवड त्यांना बहुधा केंद्रीय मंत्रिपदावरून पायउतार केले जाईल ह्याचे संकेत मानले जात आहेत. गोयल हे पूर्वी भाजपचे राष्ट्रीय खजिनदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ती महत्त्वाची जबाबदारी पुन्हा सोपवली जाणार आहे, मात्र, एक व्यक्ती, एक पद ह्या पक्षतत्त्वास अनुसरून त्यामुळे त्यांना त्यांचे केंद्रीय मंत्रिपद गमवावे लागेल असे दिसते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील खांदेपालटाची गरज अधिक ठळक झाली आहे. त्यामुळे भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या फेररचनेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळातही फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपची नवी कार्यकारिणी पाहिली तर तिचे देशव्यापी स्वरूप, अनुभवी आणि नवीन चेहरे यांचा समन्वय याद्वारे पक्षाच्या संघटनात्मक कार्यात नवी जान आणण्याचे उद्दिष्ट आणि उत्तर प्रदेश, पंजाब आदींच्या आगामी महत्त्वपूर्ण निवडणुकांसाठी पक्षाला सज्ज करण्याची प्रेरणा स्पष्ट दिसते.