22.5 C
Panjim
Saturday, November 27, 2021

भाजपमध्ये नवा जोश

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताज्या गोवा भेटीने केले आहे. गेले काही महिने कॉंग्रेस, आम आदमी पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेसच्या हालचाली राज्यात वाढलेल्या असल्याने भाजपा कार्यकर्त्यांच्या मनांमध्ये जी अस्वस्थता आणि आगामी निवडणुकीतील जनतेच्या कलाबाबतची साशंकता शिरू लागली होती, ती दूर सारण्यासाठी अशा प्रकारची ऊर्जा कार्यकर्त्यांमध्ये भरण्याची नितांत आवश्यकता होती. शहा यांचा गोवा दौरा हा धारबांदोड्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारल्या जाणार्‍या न्यायवैद्यक विद्यापीठाच्या कोनशिला समारंभासाठी जरी होता, तरी त्यांनी ताळगावात पक्ष कार्यकर्त्यांच्या विशाल मेळाव्यास संबोधित करून या दौर्‍याला राजकीय परिमाण दिले आहे.
शहांच्या एकंदर वक्तव्यांमधून भारतीय जनता पक्षाची आगामी निवडणुकीबाबतची रणनीतीही पुरती स्पष्ट झाली आहे. राजकीय स्थैर्य आणि विकास ह्या दोन प्रमुख मुद्द्यांभोवतीच भाजपाचा प्रचार केंद्रित राहील असे एकूण शहांच्या विविध ठिकाणच्या विधानांतून दिसते. आगामी निवडणुकीनंतर राज्यामध्ये विविध पक्षांचे कडबोळे सरकार येऊ देऊ नका, तर भाजपाचे स्वबळाचे स्थिर सरकार सत्तेवर आणा असे आवाहन त्यांनी गोमंतकीय मतदारांना केलेले आहे. भाजपाचे स्थिर सरकार राज्यात सत्तेवर आले तर सध्या जो चौफेर विकास दिसतो आहे, त्याची गती दुप्पट करू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिलेली आहे.
आम आदमी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, कॉंग्रेसादी पक्ष भाजपा सरकारच्या कार्यकाळातील त्रुटींवर बोटे ठेवून ते प्रश्न निवडणुकीच्या रणांगणावर उतरविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. आम आदमी पक्षाने राज्यव्यापी रोजगार यात्रा काढली. सरकारी नोकर्‍या मंत्र्यांसंत्र्यांच्या वशिल्यानेच मिळू शकतात ह्या मुद्द्यावर त्यांनी भर देत जनतेला साद घातली. तृणमूल कॉंग्रेस तर भाजपविरोधात अधिक आक्रमक प्रचाराद्वारे मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कॉंग्रेस निवडणूक रणनीतीबाबत आणि विरोधकांची एकजूट करायची की नाही याबाबत अजूनही चाचपडताना दिसतो आहे. अशा वेळी भाजपा मात्र आपल्या सरकारची कामगिरी, राज्यात गेल्या दोन कार्यकाळांत आपल्या सरकारांनी घडवलेला विकास, दिलेले राजकीय स्थैर्य अशा सकारात्मक मुद्द्यांवर जोर देणार आहे असे शहा यांची विधाने सूचित करीत आहेत.
धारबांदोड्यातील कार्यक्रमात शहांनी काश्मीरमधील सध्याच्या हत्याकांडाकडे लक्ष वेधताना पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करण्याची आक्रमक भाषा केली. राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाविरुद्धची मोदी सरकारची कणखर नीती हाही गोमंतकीय मतदारांवर प्रभाव टाकणारा मुद्दा ठरू शकतो हे शहांना पुरेपूर ठाऊक आहे. सर्जिकल स्ट्राइकमागे मनोहर पर्रीकर यांचे योगदान होते. गोव्यामध्ये पर्रीकरांविषयी असलेले ममत्व ज्ञात असल्याने प्रत्येकवेळी त्यांचे स्मरण न चुकता केले जाताना दिसते. देश सुरक्षित ठेवण्यासाठी भाजप सरकारची किती आवश्यकता आहे हे मतदारांवर ठसविण्याचाही भाजपचा आगामी काळात प्रयत्न राहील.
राज्यातील सरकार भक्कम करण्यासाठी आयात करावे लागलेले परपक्षांतील आमदार ही सध्या भाजपसाठी डोकेदुखी बनलेली आहे. त्यातून पक्षाच्या प्रतिमेला जोरदार तडा गेला आहे. सरकारची कामगिरीही कोविड महामारीच्या सावटाखाली यथातथाच राहिली आहे. त्यामुळे उशिराने का होईना ‘स्वयंपूर्ण गोवा’, ‘सरकार तुमच्या दारी’ अशा उपक्रमांद्वारे जनतेच्या घराघरांत जाण्याचा जोरदार आणि निकराचा प्रयत्न सध्या चालला आहे. अगदी तुम्ही लस घेतली का? हे मतदारांना भाजपा कार्यालयांतून फोन करून विचारले जाते आहे. कोरोना काळात गोव्याची जनता तडफडत होती, तेव्हा तिची विचारपूस करायला हे फोन का गेले नाहीत? परंतु आपल्या चुका उमगल्याने आता जनतेला जवळ करण्याची आटोकाट धडपड भाजपाने चालवलेली आहे, याचे प्रमुख कारण राज्यातील पक्षाचे सरकार यावेळी अँटी इन्कम्बन्सीला सामोरे जाणार आहे. विजयाची हॅटट्रिक साधणे सोपे नसते. भल्याभल्यांना जनतेच्या रोषाचे तडाखे खावे लागले आहेत. त्यामुळे जनतेला जवळ करण्यासाठी हरेक प्रकारे भाजपा येणार्‍या काळात प्रयत्न करील. विरोधकांच्या एकत्र येण्याच्या प्रयत्नांनी भाजपामध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. अशावेळी आपली सर्वांत मोठी ताकद असलेल्या बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरण्याचा जोरकस प्रयत्न शहांच्या दौर्‍यातून झाला आहे. किमान आपले कार्यकर्ते विरोधकांच्या आक्रमक पावलांमुळे विचलीत होऊ नयेत यासाठी शहांची गोवा भेट अत्यावश्यक होती.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION