भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस

0
129

भाजपला जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काही मतदारसंघात उमेदवार निश्‍चित करताना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. उमेदवारांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. भाजपच्या काही नेत्यांनी पक्षासमोर उमेदवार निवडीबाबत आव्हान उभे केले आहे. जिल्हा पंचायत उमेदवारीसाठी जोरदार चुरस असलेल्या ठिकाणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना उमेदवार निवडीचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या थिवी मतदारसंघातील कोलवाळमध्ये उमेदवारीवरून माजी आमदार किरण कांदोळकर यांनी जबर आव्हान उभे केले आहे. माजी आमदार कांदोळकर यांनी ४ मार्चला कोलवाळ मतदारसंघातून पत्नीला निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा यापूर्वी केलेली आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी जिल्हा पंचायतीच्या आठ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा काल केली. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या शिरसई मतदारसंघात दीक्षा खानोलकर, लाटंबार्से मतदारसंघात श्रुती सुरेश घाटवळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बेतकी खांडोळी मतदारसंघात शर्मेश भोसले, वेलिंग प्रियोळ मतदारसंघात शिवराम गणेश नाईक, गिरदोली मतदारसंघात संजना वेळीप, रिवण मतदारसंघात सुरेश किपेकर, पैंगीण मतदारसंघात शोभना वेळीप, सांकवाळ मतदारसंघात अनिता थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजप जिल्हा पंचायतीच्या ४३ जागा लढविणार आहे. त्यांपैकी ३९ ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तर, चार मतदारसंघात उमेदवारीच्या प्रश्‍नावरून मतभेद निर्माण झालेले आहेत. या चार मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा बुधवारपर्यंत सोडवला जाणार असून त्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित केली जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.