Home बातम्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड

0

आज होणार औपचारीक घोषणा

भाजपचे कार्यवाहक अध्यक्ष नितीन नबीन हे आता पक्षाचे 12 वे राष्ट्रीय अध्यक्ष होतील. काल सोमवारी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात नामांकन प्रक्रिया पार पडली. नितीन यांचे नाव आज मंगळवारी 20 जानेवारी रोजी औपचारिकपणे जाहीर केले जाईल. या पदासाठी फक्त नितीन नबीन यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले आहे. नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ एकूण 37 नामांकन पत्रे दाखल करण्यात आली होती. नामांकन पत्रांची छाननी करण्यात आली आणि सर्व वैध आढळले.

या नामांकन प्रक्रियेदरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, नितीन गडकरी यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनी नितीन यांच्या समर्थनार्थ नामांकन पत्र सादर केले. भाजपने 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी अधिसूचना जारी केली. 14 डिसेंबर 2025 रोजी नितीन यांची पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सर्वात तरुण अध्यक्ष
आतापर्यंत भाजपमध्ये 11 नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यापैकी लालकृष्ण अडवाणी यांनी तीन वेळा काम केले आहे, तर राजनाथ सिंह यांनी दोनदा हे पद भूषवले आहे. नितीन नबीन हे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

गोव्याचे भाजप नेते दिल्लीत

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, पेयजल खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, खासदार सदानंद शेट तानावडे, उपसभापती व आमदार जोशुआ डिसोझा, आमदार नीलेश काब्राल, कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर, धाकू मडकईकर, पक्षाचे गोव्यातील कार्यकारिणी सदस्य दत्ता खोलकर, संजीव देसाई, सर्वानंद भगत आदी मंडळी यावेळी हजर होती.