भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? याच महिन्यात घोषणा शक्य

0
14

>> शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावे चर्चेत; मोदींच्या नागपूर भेटीनंतर हालचाली गतिमान

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नड्डा यांचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण? यासाठी चार नावांची चर्चा होत आहे. त्यात शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीनंतर अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे.

2014 मध्ये देशात भाजपची सत्ता आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह विराजमान झाले होते. यानंतर 2019 मध्ये जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. आता त्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे भाजपमधील चार महत्त्वाची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. याच एप्रिल महिन्यात भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल अशी चिन्हे आहेत.

अमित शहा यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर जे. पी. नड्डा यांना अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. नड्डा यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबरोबर प्रभावी कार्यसंबंध प्रस्थापित केले.
64 वर्षीय जे. पी. नड्डा यांनी भाजपाला लोकसभा आणि विधानसभा अशा 26 निवडणुकांमध्ये विजय मिळवून नवीन विक्रम प्रस्थापित केला. 2023 च्या अखेरीस भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांमधील सत्ता कायम ठेवली.

2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत नड्डा यांनी भाजप आता स्वयंपूर्ण असून, पक्षाला पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) आवश्यकता नाही असे विधान केले. त्यामुळे भाजप आणि आरएसएसमधील मतभेद उघड झाले आणि त्याचा परिणाम पक्षाच्या कामगिरीवर झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा 303 वरून 242 पर्यंत घसरल्या. तसेच विरोधकांनी संविधान बचावचा नारा दिल्यानंतर मागसवर्गीय समुदायातील मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यात 30 मार्च रोजी झालेल्या बैठकीत नवीन अध्यक्षांच्या नावावर चर्चा झाली. मोदी नागपूरहून परतल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा झाली. पंतप्रधानांनी विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह आणि संघटना सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी राज्यांच्या संघटनात्मक निवडणुकांबाबत चर्चा केली.

>> आता शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान ही चार नावे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्यापैकी कुणाला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळणार की भाजप धक्कातंत्राचा वापर करुन अनेपक्षित नाव समोर आणणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

>> सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष लवकरच देशातील अनेक राज्यांच्या अध्यक्षांची घोषणा करणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यांचा समावेश आहे. पुढील आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होऊ शकते. भाजपच्या राज्यघटनेनुसार निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक सुरू करता येत नाही. सध्या 13 राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्या असून उर्वरित 19 राज्यांच्या अध्यक्षांची घोषणा होताच राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

>> सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी जे. पी. नड्डा आणि बी. एल. संतोष यांना याच महिन्यात भाजप अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण करण्यास सांगितले आहे. भाजपने आतापर्यंत 13 राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी 19 राज्यांमध्ये निवडणुका पूर्ण कराव्या लागतात.