गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने काँग्रेस मुख्यालयासमोर मुख्य रस्ता अडविणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री रोहन खंवटे, आमदार व इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी तिसवाडीचे न्यायदंडाधिकारी आणि विभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे आझाद मैदानावर काल केली. आझाद मैदानावर शांततेत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जातो. मात्र, काँग्रेस मुख्य़ालयासमोर मुख्य रस्ता अडवून आंदोलन करणाऱ्यांवर ही कारवाई का नाही असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अमित पालेकर यांनी तिसवाडीचे दंडाधिकारी आणि पोलीस विभाग अधिकाऱ्यांना आझाद मैदानावर काल केला. बुधवारी संध्याकाळी आझाद मैदानावर विद्यार्थ्यांच्या निदर्शनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवून विद्यार्थ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

