पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचा सवाल
भाजप २०१२ साली सत्तेवर आल्यानंतर त्यावर्षीच्या अंदाजपत्रकातून सरकारने पणजीच्या विकासकामांसंबंधी पाच आश्वासने दिली होती. त्या आश्वासनांचे काय झाले याचे उत्तर आम्हाला भाजप सरकारकडून हवे आहे असे कॉंग्रेसचे प्रवक्ते यतीश नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.जी पाच आश्वासने देण्यात आली होती त्यात नेवगीनगर ते पाटो या दरम्यान चारपदरी पूल, बेती ते पणजीच्या दरम्यान मांडवीवरून पूल, पणजी महापालिकेला विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी, पणजीत मार्केट प्रकल्पाचा तिसरा टप्पा, रायबंदर येथे पीडीए मार्केट या प्रकल्पांचा समावेश होता. ज्या अर्थी २०१२ च्या अर्थसंकल्पातून ही आश्वासने देण्यात आली होती त्या अर्थी त्याच आर्थिक वर्षी ती विकासकामे पूर्ण व्हायला हवी होती. पण आता २०१५ साल उजाडले असताना अजून ती कामे पूर्ण झालेली नसून ती का झालेली नाहीत या पाच प्रश्नांची उत्तरे भाजप सरकारने द्यायला हवीत अशी आमची मागणी असल्याचे यतीश नाईक म्हणाले.
आता पणजीत होणार्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला भाजप सरकारकडून या प्रश्नांची उत्तरे हवी असल्याचे ते म्हणाले.

