Home बातम्या भाजपच्या गोव्यातील राष्ट्रीय बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींचे नाव निश्‍चित होणार?

भाजपच्या गोव्यातील राष्ट्रीय बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींचे नाव निश्‍चित होणार?

0

वरील बैठकीसाठी ३५० भाजपचे नेते गोव्यात दाखल होणार असून राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह एक दिवस अगोदर म्हणजे दि. ६ रोजी गोव्यात दाखल होतील. भाजप कार्यकारिणीच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली २७ जणांचे पथक स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती पार्सेकर व प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली. तब्बल अकरा वर्षानंतर प्रदेश भाजपला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गोव्यात आयोजित करण्याची संधी मिळाल्याचे ते म्हणाले.

दि. ७ रोजी १७२ राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची बैठक सुरू होईल व ती दुसर्‍या दिवशी २ वाजेपर्यंत चालू राहील. त्यानंतर प्रत्यक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दि. ८ व ९ रोजी होईल. या बैठकीस गोव्याच्या ६ जणासह ३६० प्रतिनिधी उपस्थित राहतील, असे पार्सेकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यावर बैठकीत चर्चा होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे केंद्रित झाले आहे.

दि. ९ रोजी सभेचे आयोजन करण्याची पक्षाची तयारी होती. परंतु पावसाळी वातावरणामुळे जाहीर सभा घेण्याचे टाळले. त्यामुळे ताळगाव येथील कम्युनिटी हॉलमध्ये कार्यकर्त्यांचे संमेलन होणार असून या संमेलनात राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, नेत्या सुष्मा स्वराज, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मार्गदर्शन करतील.

या संमेलनात राज्य व जिल्हा कार्यकारिणी, ४० मंडळ समित्या व बुथ अध्यक्षांची उपस्थिती असेल, असे पार्सेकर यांनी सांगितले. गोव्याला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणूनही पदाधिकार्‍यांच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष तेंडुलकर यांनी सांगितले.

३५० प्रतिनिधी येणार.

२७ जणांचे स्वागत पथक.

११ वर्षानंतर गोव्यात बैठक.

९ रोजी ताळगावात कार्यकर्ता संमेलन.