भाजपचे दोन्ही उमेदवार दोन-तीन दिवसांत जाहीर

0
12

>> दिल्लीत नावांवर चर्चा; काँग्रेसचे उमेदवार आठवडाभरानंतर घोषित होणार

सत्ताधारी भाजपच्या उच्चस्तरीय समितीने पक्षाच्या उत्तर गोवा व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर चर्चा केली आहे. समितीकडे पाठवण्यात आलेल्या नावांमधून कुणाला पक्षाची उमेदवारी द्यावी, त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेऊन पक्ष पुढील दोन-तीन दिवसांत आपल्या उमेदवारांची नावे कोणत्याही क्षणी जाहीर करणार असल्याचे काल पक्षाने स्पष्ट केले. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज (दि. 29) महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यात उमेदवारांची नावे निश्चित होतील. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांवरही दिल्लीत चर्चा झाली आहे; मात्र काँग्रेसचे दोन्ही उमेदवार जाहीर होण्यासाठी आणखी एक आठवठ्याहून अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबर बैठक घेऊन उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांच्यासाठीच्या पक्षाच्या उमेदवारांसंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. त्या पार्श्वभूमीवर पक्ष गुरुवार दि. 29 फेब्रुवारीनंतर दोन्ही मतदारसंघांसाठी आपल्या उमेदवारांची नावे घोषित करण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना व्यक्त केली.

उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईकच?
दरम्यान, उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून या निवडणुकीतही उत्तर गोव्याचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांनाच उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तर गोव्यासाठी पक्षाने दयानंद मांद्रेकर, दयानंद सोपटे आणि दिलीप परुळेकर यांची नावेही उच्चस्तरीय समितीकडे पाठवलेली आहेत.

दक्षिण गोव्यातून उमेदवारी कोणाला?
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाने माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत व काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांची नावे पाठवलेली आहेत.

गोव्यातील काँग्रेस उमेदवारांच्या नावांवरही चर्चा
काँग्रेस पक्षाच्या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांवर नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा झाल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. मात्र असे असले तरी पक्षाच्या उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघांसाठीच्या उमेदवारांची घोषणा आठवडाभरानंतरच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली. गोवा काँग्रेसने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार ॲड. रमाकांत खलप, विजय भिके, राजन घाटे व महेश म्हांब्रे यांची नावे पाठवलेली आहेत. दक्षिण गोव्यासाठी विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर आणि विरियातो फर्नांडिस यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेली आहेत.

हिल्या टप्प्यात भाजपचे 100 उमेदवार जाहीर होणार
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक गुरुवारी (दि. 29) दिल्लीत होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी 100 ते 120 जागांसाठी उमेदवार निश्चित करू शकतो. या बैठकीत 2014 च्या लोकसभा आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने गमावलेल्या जागांवर नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.