भाजपच्या एकूण 38 उमेदवारांची घोषणा
भाजपने येत्या 20 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 9 उमेदवारांचा समावेश असलेली तिसरी यादी काल जाहीर केली. भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 38 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.
भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मगोपला तीन जागा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच, काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचे जाहीर केलेले आहे.
भाजपने दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या शिरोडा मतदारसंघात सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांची कन्या डॉ. गौरी सुभाष शिरोडकर हिला उमेदवारी दिली आहे. शिरोडा मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहे.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बोरी मतदारसंघात पूनम चंद्रकांत सामंत (महिला), गिरदोळी मतदारसंघात गोकुळदास महादेव गावकर (एसटी), खोला मतदारसंघात तेजल अजय पागी (महिला ओबीसी) यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या धारगळ मतदारसंघात श्रीकृष्ण रवींद्र हरमलकर (सर्वसाधारण), तोरसे मतदारसंघात राघोबा लाडू कांबळी (ओबीसी), सांताक्रुझ मतदारसंघात सोनिया विद्देश नाईक (महिला ओबीसी), सर्वण कारापूर मतदारसंघात महेश अनंत सावंत आणि मये मतदारसंघात कुंदा विष्णू मांद्रेकर (महिला) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
जिल्हा पंचायतीच्या उर्वरित मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत, असे भाजपचे सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले
आहे.

