सत्ताधारी भाजपकडून काल राज्यभरात ‘सेवा ज्योती यात्रा’ काढण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातून या यात्रेचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून या यात्रेेचे उद्घाटन केले. एकाच वेळी उत्तर गोवा, दक्षिण गोवा व कुशावती जिल्हा अशा तिन्ही जिल्ह्यांतून ही यात्रा काढण्यात आली.
‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पाला बळकटी देत विकसित भारताच्या उभारणीला योगदान देणे हे या यात्रेेचे उद्दिष्ट आहे. सेवा व जनकल्याणाच्या भावनेतून पुढील वाटचाल करण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001 साली एक सामान्य भाजप कार्यकर्ता म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आणि नंतर स्वकष्टाने ते देशाचे पंतप्रधान बनले. आपल्या ‘सबका साथ सब का विकास’ या मंत्राच्या व संकल्पनेच्या आधारे त्यांनी देशातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करुन घेतले, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.
सेवा ज्योती यात्रेच्या माध्यमातून राज्यातील घराघरांत सेवा, समर्पण व गरीब कल्याणाचा मंत्र पोचवण्यात येणार असून, या संकल्पाला अधिक बळकटी देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विविध मतदारसंघांमध्ये आयोजित ह्या सेवा ज्योती यात्रेत पक्षाचे आमदार, मंत्री, कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

