भाजपची निवडणूक आयोगावर पुन्हा टिकेची झोड

0
52

राहुल गांधींना ‘रोड शो’साठी मान्यता

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना काल वाराणसीत ‘रोड शो’चे आयोजन करण्यास मान्यता दिल्याबद्दल भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगावर टिकेची झोड उठवली आहे. वाराणसीचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांना सभेचे आयोजन करण्यास मान्यता न दिलेल्या निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना रोड शो आयोजित करू दिला यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला त्यांच्या मतदारसंघात सभा घेऊ न दिल्यामुळे निवडणूक प्रक्रियेला मोठा डाग लागला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते अरुण जेटली यांनी व्यक्त केली. मोदी यांना ज्या भागात सभा घ्यायची होती तेथे राहुल गांधींना रोड शो करू देण्यात आला. यामुळे मोदींना परवानगी नाकारण्यामागे सुरक्षिततेचे कारण नव्हते ही बाब सिद्ध झाली आहे, असा दावा त्यांनी केला. यामागे राजकीय कारण असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. बेनियाबाग या भागात सुरक्षा व्यवस्थेविषयी जी कारणे आहेत ती फक्त भाजपालाच लागू आहेत इतर पक्षांसाठी नाहीत असेच निवडणूक आयोगाचे धोरण असल्यास त्यांना ते घेऊनच काम करावे लागेल अशी टिप्पणी त्यांनी केली.
राहुलना ५० रोड शो आयोजित करता येतात. याबाबत आमचा प्रश्‍न नाही. परंतु आम्हाला मान्यता न देणे आणि त्यांना ती देणे हे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी व्यक्त केली. भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनीही राहुल यांना मान्यता दिल्याप्रकरणी निवडणूक आयोगावर टिकास्त्र सोडले. वाराणसीच्या निवडणूक अधिकार्‍यांच्या पक्षपातीपणाचे हे आणखी एक उदाहरण असल्याचा दावा त्यांनी केला.

अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला

गेल्या एका महिन्याहून अधिक काळ चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा गदारोळ काल थांबला. नवव्या व अखेरच्या टप्प्यातील मतदान आता येत्या १२ रोजी होणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार व पं. बंगाल या राज्यांमधील ४१ जागांसाठी हे मतदान होणार असून त्यावर अनेक दिग्गजांचे भवितव्य अवलंबून असेल. ४१ पैकी बिहारात ६, उत्तर प्रदेशात १८ व प. बंगालातील १७ जागांवर मतदान होणार आहे.