भाजपकडून दक्षिणेत महिला उमेदवाराचा शोध

0
22

गाभा समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती; पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या सूचनेनंतर गोवा भाजपकडून हालचाली

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवार म्हणून काही महिलांची नावे निवडण्याची सूचना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आम्हाला केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल राजधानीत झालेल्या पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र पक्षाने यापूर्वी पुरुष उमेदवारांची जी नावे पाठवली होती, ती फेटाळण्यात आले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्रीय नेत्यांच्या सूचनेनंतर गोवा भाजपने ‘जिंकण्याची क्षमता’ हा निकष विचारात घेऊन संभाव्य महिला उमेवारांचा शोध सुरू केला आहे.

पक्षाने मडगावचे आमदार दिगंबर कामत, केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर, दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर, काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर व माजी आमदार दामू नाईक यांची नावे केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली होती. त्यापैकी दिगंबर कामत व रमेश तवडकर यांनी आपणास राष्ट्रीय राजकारणात रस नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे दक्षिण गोव्यासाठीच्या उमेदवारीसाठी नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर व दामू नाईक यांची यांचीच नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती. अशातच अचानक केंद्रातील भाजप नेत्यांनी या मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवार म्हणून काही महिलांची नावे पाठवण्याची सूचना आम्हाला केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर पक्षाने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी संभाव्य महिला उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठीची प्रक्रिया हाती घेतली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाजप महिला कार्यकर्त्या, पक्षाच्या हितचिंतक असलेल्या महिला आणि पक्षाच्या राज्य परिवारातून ह्या संभाव्य महिला उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विचारसरणी, जिंकण्याची क्षमता निकष
पक्षाच्या विचारसरणीशी ज्या महिलांची विचारसरणी जुळते अशा महिलांचीच संभाव्य उमेदवार म्हणून निवड करण्यात येणार असली तरी ‘जिंकण्याची क्षमता’ हा महिला निकष या निवडीसाठी असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संभाव्य पुरुष उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण
पक्षश्रेष्ठींनी दक्षिण गोवा मतदारसांसाठी संभाव्य उमेदवार म्हणून काही महिलांची नावे पाठवून देण्याची सूचना केल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पुरुष उमेदवारांमध्ये चिंतचे वातावरण पसरले आहे.

पक्षश्रेष्ठींकडून कुणाच्याही नावाची शिफारस नाही
संभाव्य उमेदवार म्हणून आतापर्यंत एकाही महिलेचे नाव पुढे आलेले नाही आणि पक्षश्रेष्ठींनी देखील कुणाच्या नावाची शिफारस केली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पक्षाची छाननी समिती संभाव्य महिला उमेदवारांच्या नावाची यादी तयार करेल आणि ती संसदीय निवड समितीकडे पाठवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीत उमेदवार जाहीर
दक्षिण गोवा मतदारसंघासाठीच्या भाजप उमेदवाराचे नाव पक्षाच्या उमेदवारांच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या यादीत असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. भाजपने यावेळी 33 टक्के उमेदवारी महिलांना देण्याचे ठरवले आहे, असेही ते म्हणाले.

4 संभाव्य महिला उमेदवारांची नावे चर्चेत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह सुवर्णा तेंडूलकर, शेफाली वैद्य व विद्या गावडे या महिलांचे नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत जोडले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.