भागीदार्‍यांनी गाजला आयएसएलचा सहावा मोसम

0
142

इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) सहावा मोसम लक्षणीय आणि संस्मरणीय ठरला. देशातील प्रमुख फुटबॉल लीग असे आयएसएलचे स्थान निर्माण होत आहे. या स्पर्धेतील कामगिरीला यंदा प्रथमच एएफसी चँपीयन्स लीग गटामधील प्रवेशाच्या रुपाने बक्षीस नक्की झाले. हे घडत असताना तरुण खेळाडूंनी प्रेरणादायी कामगिरी केली. मैदानावर तसेच मैदानाबाहेर काही लक्षणीय भागीदार्‍या जुळून आल्या.

आधी तरुण खेळाडूंकडे वळूयात. सर्वप्रमथ सुमीत राठीचे नाव घ्यावे लागेल. २० वर्षांच्या या केंद्रीय बचावपटूने अँटोनिओ हबास यांच्या एटीके संघात स्टार्टिंग लाईनअपमध्ये आपले स्थान हक्काचे बनविले. संघात दाखल झाल्यापासून निर्भय बचावाच्या जोरावर त्याने ही मजल मारली. स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या एटीकेसाठी तो १२ सामने खेळला. यात त्याने ११ स्टार्ट मिळविल्या. एटीकेच्या चिवट बचावामुळे त्यांच्याविरुद्ध २१ सामन्यांत केवळ १९ गोल झाले. या संघाने विक्रमी तिसर्‍यांदा जेतेपद मिळविले. सुमीतला आयएसचा सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू हा पुरस्कार मिळणे उचित ठरले.
बंगळुरू एफसीचा सुरेश सिंग वांगजाम हा आणखी एक तरुण खेळाडू चमकला. त्याच्या कामगिरीची अमाप प्रशंसा झाली. मोसमाच्या मध्यास कार्लेस कुआद्रात यांनी त्याला संधी दिली आणि तेव्हापासून १९ वर्षांच्या या खेळाडूने संघात नियमित स्थान मिळविले. कुआद्रात यांनी सांगितले की, सुरेश आमच्या संघासाठी बराच उपयोगी पडला. तो चमकदार कामगिरी करतो आहे. तो आक्रमणाच्या संधी निर्माण करीत होता आणि बचावासाठीही मदत करीत होता. त्याच्यासाठी मोसम प्रभावी ठरला. राष्ट्रीय संघातही त्याला लवकरच संधी मिळेल याची खात्री आहे. एफसी गोवाचा मानवीर सिंग, केरला ब्लास्टर्सचे जीक्सन सिंग, महंमद रकीप, नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा रेडीम ट्लांग, ओडिशा एफसीचा शुभम सारंगी असे तरुण खेळाडूही चमकले. परदेशी खेळाडूंनीही उच्च दर्जाचा खेळ केला. त्यांनी भागीदारी जमविल्या आणि त्यामुळे आयएसएलचा मोसम प्रेक्षणीय ठरला. विजेत्या एटीकेसाठी रॉय कृष्णा आणि डेव्हिड विल्यम्स केवळ अप्रतिम ठरले. फिजीचा कृष्णा आणि ऑस्ट्रेलियाचा विल्यम्स यांनी संघाला गरज असेल तेव्हा धडाका केला. खास करून बाद फेरीत बंगळुरूविरुद्ध कृष्णाने एक, तर विल्यम्सने दोन गोल केले. कृष्णाने १५ गोल-सहा ऍसिस्ट, तर विल्यम्सने सात गोल-पाच ऍसिस्ट असे योगदान दिले. एटीकेचे प्रशिक्षक हबास यांनी सांगितले की, आम्ही स्पर्धेच्या पहिल्या टप्यात आठ ते नऊ वेळा आमच्या संघाचे स्वरुप बदलले. त्यानंतर आम्ही ३-५-२ असे स्वरुप ठेवले, याचे कारण विल्यम्स आणि रॉय हे दोन फार महत्त्वाचे खेळाडू आमच्याकडे होते. त्यामुळे आम्हाला ह पद्धत वापरावी लागली.

उपविजेत्या चेन्नईन एफसीसाठी रॅफेल क्रिव्हेलारो आणि नेरीयूस वॅल्सकीस ही जोडी चालली. अंतिम फेरीपर्यंतच्या स्वप्नवत वाटचालीत या जोडीचा मोलाचा वाटा होता. नेरीयूसने १५ गोल व सहा ऍसिस्ट, तर रॅफेलने सात गोल व आठ ऍसिस्ट असे योगदान दिले. नेरीयूसला गोल्डन बूट बहुमान मिळाला.

ह्युगो बुमूस (११ गोल, १० ऍसिस्ट), फेरॅन कोरोमीनास (१४ गोल, ४ ऍसिस्ट) यांची जोडीही गाजली. त्यांना समन्वय साधण्यासाठी संवादाची गरज नव्हती. कोरोमीनासने आयएसएलच्या इतिहासात सर्वाधिक गोल केले आहेत, तर ह्युगो हा सुद्धा हिरो ठरला आहे. या जोडीमुळे एफसी गोवा साखळीत अव्वल स्थान मिळवू शकला. अशीच एक जोडी केरला ब्लास्टर्ससाठी चमकली. बार्थोलोम्यू ओगबेचेने १५, तर रॅफेल मेस्सी बौलीने ८ गोल केले. ब्लास्टर्स बाद फेरी गाठू शकला नाही, पण ही जोडी गाजली. मैदानाबाहेरही काही भागीदारी झाल्या. मँचेस्टर सिटीची मालकी असलेल्या सिटी फुटबॉल ग्रुपने मुंबई सिटी एफसीमध्ये मोठा हिस्सा विकत घेतला. या करारामुळे भारतीय फुटबॉलला चालना मिळेल. एटीकेने शतकी इतिहास असलेल्या मोहन बागानशी करार केला. आता पुढील मोसमात नवा क्लब आयएसएलमध्ये सहभागी होईल.
प्रीमियर लीगनेही आयएसएलबरोबरील समन्वय करार वाढविला. त्यामुळे भारतीय फुटबॉलची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून प्रीमियर लीगचा पाठिंबा कायम राहील. फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमीटेडच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी सांगितले की, प्रीमियर लीगबरोबरील आमच्या भागिदारीतील पुढचे पाऊल आयएसएल आता टाकणार आहे. भारतीय फुटबॉलच्या प्रगतीसाठी गेल्या सहा वर्षांच्या कालावधीतील आमची भागीदारी अत्यंत समाधानकारक ठरली आहे. युवा खेळाडूंची प्रगती, प्रशिक्षण आणि पंच या क्षेत्रांत भरीव प्रयत्न करण्यासाठी आम्ही ही भागीदारी आणखी भक्कम करु. हा मोसम रंगतदार आणि लक्षणीय ठरला. त्यामुळे भारतीय फुटबॉलच्या सरस भविष्याचा पाया आणखी भक्कम झाला.