भांडवली बाजाराशी संबंधित कंपन्यांच्या वाढीसाठीनिफ्टी कॅपिटल मार्केट निर्देशांक

0
12
  • शशांक मो. गुळगुळे

शेअरबाजार आणि म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रात भविष्यात वाढीची मोठी संधी उपलब्ध आहे. प्रत्येक कंपनीच्या निर्देशांकावर आधारित इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा अनेक गुंतवणूकदारांसाठी सोपा आणि परिणामकारक पर्याय ठरू शकतो.

भांडवली बाजाराशी संबंधित कंपन्यांच्या वाढीचा वेध घेण्यासाठी ‘निफ्टी कॅपिटल मार्केट निर्देशांक’ हा महत्त्वाचा मानदंड ठरत आहे. शेअरबाजार, म्युच्युअल फंड डिपॉझिटरी, एक्स्चेंज, वेल्थ मॅनेजमेंट आणि भांडवली बाजाराशी निगडित इतर वित्तीय सेवा कंपन्यांची कामगिरी या निर्देशांकातून प्रतिबिंबित होते. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांना या निर्देशांकाची माहिती हवी.
राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) तयार केलेला ‘निफ्टी कॅपिटल मार्केट निर्देशांक’ हा भांडवली बाजाराशी संबंधित कंपन्यांच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करणारा निर्देशांक आहे. या निर्देशांकामध्ये एकूण 20 प्रमुख कंपन्यांची निवड केली जाते. मात्र या निवडीसाठी संबंधित कंपनी ‘निफ्टी 500′ निर्देशांकातील असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक कंपनीचे उपलब्ध बाजारमूल्यांकन आणि त्याची सहा महिन्यांची सरासरी विचारात घेतली जाते. त्यामुळे या निर्देशांकातील कंपन्या तुलनेने मोठ्या, स्थिर आणि क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जातात.
या निर्देशांकाची सुरुवात 9 सप्टेंबर 2024 रोजी झाली. प्रारंभी सतरा कंपन्यांचा यात समावेश करण्यात आला. निर्देशांकाचे पायाभूत वर्ष 1 एप्रिल 2019 असून, त्याचे प्रारंभिक मूल्य 1000 निश्चित करण्यात आले. निर्देशांकातील कंपन्यांचा आढावा दर सहा महिन्यांनी घेतला जातो आणि आवश्यकतेनुसार त्यात बदल केले जातात.
10 जुलै 2026 रोजी उपलब्ध बाजारमूल्यांकनानुसार या निर्देशांकातील प्रमुख कंपन्या पुढीलप्रमाणे होत्या-
कंपनी बाजारमूल्यांकन
(कोटी रुपयांत)

  1. आयसीआयसीआय सिक्युरिटीज 1,56,166
  2. बीएसई 1,55,246
  3. बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स 1,28,276
  4. एचडीएफसी एएमसी 1,18,360
  5. निप्पॉन लाइफ इंडिया एएमसी 77,527
  6. एमसीएक्स 70,650
  7. मोतीलाल ओसवाल
    फायनान्शिअल सर्व्हिसेस 58,971
  8. 360 वन 45,915
  9. न्युवामा वेल्थ मॅनेजमेंट 36,097
  10. आनंद राठी वेल्थ 35,646
  11. एबीएसएल एएमसी 33,160
  12. एंजल वन 31,612
  13. सीडीएसएल 29,927
  14. कॅम्स 19,621
  15. के-फिन टेक्नॉलॉजीस 15,574
  16. यूटीआय एएमसी 12,908
  17. इंडियन एनर्जी एक्स्चेंज 10,779
    हा निर्देशांक 10 जुलै 2026 रोजी बाजार बंद होताना 5540 अंशांवर होता. गेल्या एका वर्षात त्याने 5697 अंशांच्या उच्चांकापर्यंत मजल मारली, तर 4087 अंश या निचांकी पातळीपर्यंत घसरणही अनुभवली. या कालावधीत निर्देशांकाने सुमारे 21 टक्के भांडवलवृद्धी दिली. त्यामुळे भांडवली बाजाराशी संबंधित कंपन्यांच्या वाढीचा हा एक महत्त्वाचा निर्देशक ठरला आहे. येत्या काही महिन्यांत या निर्देशांकात काही बदल होण्याची शक्यता आहे. एसबीआय फंड मॅनेजमेंट या कंपनीचा या निर्देशांकात समावेश होऊ शकतो. राष्ट्रीय शेअरबाजाराच्या शेअरचाही या निर्देशांकात समावेश अपेक्षित आहे. नियमानुसार ‘बीएसई’चा शेअर ‘एनएसई’वर लिस्ट आहे. तसेच ‘एनएसई’चा शेअर ‘बीएसई’वर निर्देशांकासाठी पात्र ठरू शकतो. या निर्देशांकातील बहुतांश कंपन्या वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत. शेअर बाजारातील व्यवहार, म्युच्युअल फंड गुंतवणूक, डी-मॅट खाती, व्यवहारांची नोंदणी आणि सेटलमेंट या सर्व प्रक्रिया सातत्याने वाढत असल्याने या कंपन्यांचा व्यवसायही सातत्याने विस्तारत आहे. या कंपन्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा भांडवली खर्च तुलनेने कमी असतो. दुसरीकडे ‘सीडीएसएल’ आणि कॅम्स यांसारख्या कंपन्यांना त्यांच्या क्षेत्रात मजबूत स्पर्धात्मक स्थान किंवा मक्तेदारीसदृश्य स्थान लाभले आहे. त्यामुळे दीर्घकालीन वाढीची क्षमता त्यांच्यात दिसून येते. भारताची लोकसंख्या लक्षात घेतली तर शेअरबाजार आणि म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अजूनही तुलनेने कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रात भविष्यात वाढीची मोठी संधी उपलब्ध आहे. प्रत्येक कंपनीच्या शेअरचा स्वतंत्र अभ्यास करून गुंतवणूक करण्याऐवजी या निर्देशांकावर आधारित इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा अनेक गुंतवणूकदारांसाठी सोपा आणि परिणामकारक पर्याय ठरू शकतो. याचे उदाहरण म्हणजे टाटा निफ्टी कॅपिटल मार्केट इंडेक्स फंड. या योजनेची सुरुवात 24 ऑक्टोबर 2024 रोजी झाली. 30 जून 2026 रोजी या योजनेत सुमारे 900 कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापनाखाली होती. योजना तुलनेने नवी असल्याने तिच्या दीर्घकालीन कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी आणखी काही कालावधी आवश्यक असला तरी सुरुवातीच्या काळात तिने समाधानकारक भांडवलवृद्धी दिली आहे. कोणत्याही निर्देशांकाचा उद्देश विशिष्ट क्षेत्राची दिशा दाखविणे हा असतो. त्यामुळे प्रथम निफ्टी कॅपिटल निर्देशांकाची रचना आणि त्यातील कंपन्यांची वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित कंपनीचा सखोल अभ्यास करून थेट शेअरमध्ये किंवा निर्देशांकावर आधारित इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणुकीचा विचार करणे योग्य ठरेल. मात्र, कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांचा, जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेचा आणि कालावधीचा विचार करून पात्र गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. निर्देशांक हा गुंतवणुकीची दिशा दाखवितो, अंतिम निर्णय मात्र गुंतवणूकदाराने विवेकाने घ्यायचा असतो.

म्युच्युअल फंडाचा डायरेक्ट की रेग्युलर फॅन
गेल्या काही वर्षांत देशातील फिनटेक कंपन्यांनी आणि मोबाईल ॲपनी सर्व गुंतवणूकदारांना मोबाईलच्या एका क्लिकवर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. शून्य कमिशन, थेट गुंतवणूक आणि कागदपत्रांशिवाय दोन मिनिटांत एसआयपी सुरू करा, अशा घोषणांमुळे कोट्यवधी तरुण आणि नवोदित गुंतवणूकदार या फ्लॅटफॉर्मकडे आकर्षित झाले. ‘ॲम्फी’च्या ताज्या आकडेवारीनुसार देशात ‘एसआयपी’चा ओघ सातत्याने वाढत असला तरी ‘एसआयपी’ बंद होण्याचे प्रमाण फार आहे. जितक्या नव्या ‘एसआयपी’ सुरू होत आहेत तितक्याच किंवा त्याहून अधिक अगोदरच्या ‘एसआयपी’ बंद केल्या जात आहेत. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या वर्तनाचा अभ्यास केला असता एक लक्षात येते की, केवळ कमी खर्चासाठी ‘डायरेक्ट फ्लॅन’ निवडणारे अनेक गुंतवणूकदार बाजारातील मानसिक दबावाला बळी पडतात, तर ‘रेग्युलर प्लॅन’मधील गुंतवणूकदार तुलनेने अधिक काळ गुंतवणुकीत राहतात. डायरेक्ट प्लॅनद्वारे स्वतः गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांपैकी केवळ 12.4 टक्के गुंतवणूकदार पाच वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवणूक सुरू ठेवतात. उर्वरित 87.6 टक्के गुंतवणूकदार पाच वर्षांच्या आतच ‘एसआयपी’ बंद करतात. याउलट म्युच्युअल फंड वितरक किंवा मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागारांच्या माध्यमातून रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांपैकी 21 टक्क्यांहून अधिक गुंतवणूकदार पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सातत्याने गुंतवणूक करतात. फिनटेक प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सक्षम आहेत. फिनटेक ॲपवर दररोज नवे फंड, स्टार रेटिंग, टॉप गेनर व विविध शिफारसी दिसत असतात, त्यामुळे अनेक गुंतवणूकदार वारंवार फंड बदलण्याच्या मोहात पडतात. परिणामी दीर्घकालीन गुंतवणुकीतील सातत्य तुटते. बाजारातील घसरण किंवा वैयक्तिक आर्थिक अडचणींमुळे गुंतवणूकदार ‘एसआयपी’ बंद करण्याचा निर्णय घेतो तेव्हा वितरक त्याला परिस्थिती समजावून सांगतो आणि चुकीचा निर्णय टाळण्यास मदत करतो. अनेकदा हीच वेळेवर दिलेली साथ भविष्यातील लाखो रुपयांच्या संपत्तीचे संरक्षण करते. तंत्रज्ञान हे गुंतवणुकीचे प्रभावी साधन आहे, मात्र आर्थिक प्रवास यशस्वी करण्यासाठी केवळ साधन पुरेसे नसते. योग्य वेळी योग्य दिशा दाखविणारा, बाजारातील अस्थिरतेत मानसिक आधार देणारा आणि दीर्घकालीन शिस्त कायम ठेवणारा अनुभवी मार्गदर्शक आवश्यक असतो. ‘डायरेक्ट प्लॅन’मध्ये 0.5 ते 1 टक्का खर्चाची बचत होते, पण या बचतीच्या नादात गुंतवणूकदार पाच वर्षांच्या आतच ‘एसआयपी’ बंद करत असेल तर चक्रवाढीचा सर्वात मोठा फायदा तो गमवितो. याउलट रेग्युलर प्लॅनमध्ये वितरकाला काही प्रमाणात कमिशन दिले जात असले तरी त्याच्या सततच्या मार्गदर्शनामुळे गुंतवणूक 15 ते 20 वर्षे अखंड सुरू राहिली तर अंतिम निधी डायरेक्ट प्लॅनमधील अपूर्ण गुंतवणुकीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असू शकते.