मोगल शासक औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात उद्भवलेला वाद आणि त्या पार्श्वभूमीवर नागपुरात काल उसळलेली दंगल अत्यंत दुर्दैवी आहे. वर्तमानातील महत्त्वाच्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी अशा प्रकारे इतिहासातील मढी उकरून काढण्यात येत असतात. औरंगजेबाच्या कबरीसंदर्भातील सध्याच्या वादाविषयीही असेच म्हणता येईल. ही कबर खुलताबादेत गेली चारशे वर्षे दुर्लक्षित स्थितीत उभी आहे. परंतु ह्या वादामुळे ती एकाएकी प्रकाशात आली. औरंगजेब हा मोगल शासक खरा, परंतु एक क्रूरकर्मा म्हणूनच त्याची भारताच्या इतिहासात नोंद आहे. तरी देखील आजही अनेकांना अधूनमधून औरंगजेबाचा पुळका येत असतो आणि ते त्याचे उदात्तीकरण करीत असतात ही देखील खरोखर अनाकलनीय बाब आहे. नुकताच ‘छावा’ हा चित्रपट येऊन गेला. छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाच्या आदेशावरून चाळीस दिवस कसे अत्यंत हालहाल करून, डोळे काढून, जीभ छाटून, शरीराची चामडी सोलून पराकोटीच्या क्रौर्याने हत्या करण्यात आली ते देशासमोर नव्याने गेले. त्यातूनच औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याची कबर सरकारी खर्चाने का जपली जाते आहे असा सवाल करीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासारख्या कडव्या हिंदुत्ववादी संघटना पुढे सरसावल्या. सरकारने ही कबर उद्ध्वस्त करावी अन्यथा बाबरी ढाँचा जसा करसेवेद्वारे उद्ध्वस्त करण्यात आला, तशाच प्रकारे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा आततायी इशाराही ह्या संघटनांनी दिला. वास्तविक, केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार भाजपचे आहे. भाजप काय, विहिंप काय, बजरंग दल काय किंवा रा. स्व. संघ काय हे सगळे एकाच परिवारातील घटक आहेत. असे असताना विहिंप आणि बजरंग दलाने अशा प्रकारची मागणी पुढे करून आपल्याच पक्षाच्या सरकारला अडचणीत आणणे आश्चर्यकारक आहे. औरंगजेबाची कबर हटविण्याची ही मागणी पुढे येण्यास निमित्त ठरले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक भाषण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलून गेले की ह्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे उदात्तीकरण व्हायला हवे, औरंगजेबाचे नव्हे. ते त्यावेळी असेही म्हणाले की आपल्याला औरंगजेबाची कबर कशासाठी हवी आहे? भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने ती कबर संरक्षित केलेली असल्याने केंद्र आणि राज्य सरकारवर तिच्या संरक्षणाची जबाबदारी येऊन पडली आहे. फडणवीस जे बोलले ती वस्तुस्थिती जरी असली, तरी शेवटी इतिहासात घडून गेलेल्या घटनांच्या स्मृती – मग त्या कितीही कटू का असेनात, अशा पुसता येत नसतात. औरंगजेबाची कबर हे एका अर्थी मराठ्यांच्या पराक्रमाचे स्मारक आहे. जो औरंगजेब मराठ्यांची नावनिशाणी पुसून टाकण्यासाठी धडपडला, स्वतः दक्षिणेत ठाण मांडून बसला, त्याला आपल्या हयातीत मराठी सत्तेची नावनिशाणी काही पुसता आली नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर मराठ्यांची सत्ता संपेल असे त्याला वाटले होते, परंतु छत्रपती राजाराम महाराज, ताराराणीच्या नेतृत्वाखाली आणि संताजी धनाजीच्या पराक्रमाच्या रूपाने मराठी सत्तेचा दरारा कायम राहिला. शेवटी औरंगजेबालाच दख्खनेत देह ठेवावा लागला. आपल्या 89 वर्षांच्या आयुष्यात औरंगजेबाने आपल्या क्रौर्याचे आणि विकृत मानसिकतेचे दर्शन घडवले. काशी विश्वनाथापासून मथुरेच्या केशवदेवाच्या मंदिरापर्यंत असंख्य मंदिरांचा विद्ध्वंस करून, हिंदूंवर जिझीया कर लावून आणि हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचार करून त्याने केवळ आपल्या जुलमांचा इतिहासच मागे ठेवला आहे. त्यामुळे त्याच्यासारखा हुकूमशहा हा कोणासाठीही वंदनीय असूच शकत नाही. परंतु औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनाचे निमित्त करून समाजमाध्यमांमध्ये अफवा पसरवल्या गेल्या आणि परिणामी हिंसक दंगल उसळली. अत्यंत पूर्वनियोजितपणे केल्यागत ही दंगल झाली. दगडफेक काय, पेट्रोल बॉम्बचा वापर काय, पोलिसांवरील प्राणघातक हल्ले काय, ज्या प्रकारे ही दंगल भडकवण्यात आली ती पाहता त्यामधील समाजकंटकांचा सहभाग स्पष्ट दिसतो. जो औरंगजेब ना नात्याचा, ना गोत्याचा, ज्याच्या क्रौर्याच्या कहाण्यांनी इतिहासाची पानेच्या पाने भरली आहेत, त्याच्या बाजूने केवळ धर्माचे नाते जोडून लोक उभे राहतात ही देखील शोकांतिकाच आहे. 89 वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य औरंगजेब जगला. काबूलपासून बंगालपर्यंतच्या 21 सुभ्यांमध्ये त्याचे साम्राज्य विस्तारलेले होते, परंतु तरीही त्याची ओळख क्रूरकर्मा म्हणूनच आहे आणि राहील. मग त्याची कबर असली काय नसली काय! त्याने काय फरक पडतो? त्यामुळे इतिहासातील ही भुते उकरण्यात काहीही हशील नसेल.