भटक्या श्वानांच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

0
1

फोंडा येथील दुर्दैवी घटना; भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर; बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

फोंड्यातील बोणबाग-बेतोडा व तळे-दुर्गाभाटच्या सीमारेषेवर शुक्रवारी सकाळी भटक्या श्वानांच्या हल्ल्यात 19 महिन्यांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर चिमुकली आपल्या राहत्या घरातून रस्त्यालगत आली असता त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या भटक्या श्वानांनी तिच्यावर हल्ला करत चावे घेतले, त्यात तिचा मृत्यू झाला. या परिसरात भटक्या श्वानांचा वाढता संचार इतर मुलांसाठी धोकादायक बनला असून, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 19 महिन्यांची चिमुकली आपल्या आईसह मामाच्या घरी आली होती. शुक्रवारी सकाळी 6 वाजता घरातील मंडळींनी साफसफाईसाठी दार उघडले. त्यावेळी चिमुकली खेळता खेळता घरातल्यांचा डोळा चुकवून रस्त्यावर पोहोचली. त्या ठिकाणी आधीपासूनच ठाण मांडून असलेल्या भटक्या श्वानांनी चिमुकलीवर हल्ला केला. जवळपास 7 ते 8 श्वानांनी तिच्यावर हल्ला केला. त्या श्वानांनी चिमुकलीच्या मानेवर आणि अन्य ठिकाणी असंख्य चावे घेतले. तिचा आक्रोश तिथून मार्गस्थ होणाऱ्या लोकांनी ऐकून भटक्या श्वानांना हाकलून लावले. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तिला नजीकच्या उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले; पण उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. यानंतर चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक, नगरसेवक रितेश नाईक, केतन भाटीकर व अन्य लोकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटना घडलेल्या परिसरात लोक सर्रास रस्त्याच्या बाजूला कचरा टाकतात. त्यामुळे अन्नाच्या शोधात असलेल्या भटक्या श्वानांचा आणि मोकाट गुरांचा या ठिकाणी मोठा संचार दिसून येतो. तसेच गवे सुद्धा अन्नाच्या शोधात या परिसरात दिसून येत आहेत. शुक्रवारी सकाळी घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. भटक्या श्वानांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कृषीमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष आनंद नाईक, नगरसेवक रितेश नाईक व केतन भाटीकर यांनी चिमुकल्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला.