Home बातम्या भटकी गुरे पकडण्याचे सत्र चालू

भटकी गुरे पकडण्याचे सत्र चालू

0

पणजी महापालिकेकडून १२४ गुरे ताब्यात

आतापर्यंत पणजी महापालिकेने दक्षिण गोव्यातील राष्ट्रीय महामार्गावरील १२४ भटक्या गुरांना ताब्यात घेऊन त्यांना काले फार्ममध्ये पाठवून दिल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. पंचायत क्षेत्रातील रस्त्यांवरही भटकी गुरे वाहन अपघातास कारण ठरत असल्याने त्यांचाही बंदोबस्त करण्याची विनंतीपत्रे महापालिकेला येत आहेत.

गेल्या दि. ३० जून पासून भटकी गुरे पकडण्याची मोहीम सुरू केली होती. महापालिकेकडे या मोहिमेसाठी लागणारे एकच हायड्रॉलिक वाहन आहे. दुसरे वाहन आणण्याची तयारी सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

भटकी गुरे पकडण्यासाठी संयोजक, वाहन चालक व पाच कर्मचारी मिळून सातजणांचे पथक असते. आता पर्यंत या पथकाने सांकवाळे, वेर्णे, टायटन बिर्ला, सांगे व सावर्डे या भागातून जाणार्‍या महामार्गावरील गुरे पकडण्याचे काम केले आहे. उत्तर गोव्यातील भटकी गुरे पकडणे अद्याप सुरू केलेले नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

भटक्या गुरांमुळे अनेक रस्ता अपघात होऊन अनेकजण दगावण्याचे प्रकार घडले आहेत. भटकी गुरे शेतांचीही नुकसानी करीत असल्याने ही गंभीर समस्या बनल्याने सरकारच्या पशुसंवर्धन खात्याने वरील गुरे पकडून काले फार्ममध्ये पाठविण्याची योजना तयार करून योजनेची अमलबजावणी सुरू केली आहे.

काले फार्ममध्ये या गुरांची काळजी घेतली जाते. गुरांच्या मालकांनाही दंड ठोठावण्याची तरतूद या योजनेत आहे. पंधरा दिवसांच्या आत कोणीही गुरांसाठी दावा न केल्यास वरील गुरे लिलावावर विकण्याचा सरकारला अधिकार आहे. सात दिवसांच्या आत मालकाने दावा केल्यास ३०००/- रू. दंड व खर्च तसेच सात दिवसांनंतर दावा केल्यास संबंधितांना दंड म्हणून ५०००/- रुपये व खर्चाची रक्कम भरावी लागते. सरकारच्या या मोहिमेचा बराच परिणाम दिसून आल्याचे महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.